एका शिस्तबध्द जीवनाला सुरुवात झाली होती. जानेवारी-१९८२ मध्ये प्रशिक्षण संपवून मी पुन्हा ठाणे जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून हजर झालो.
ठाणे ग्रामिण आणि ठाणे शहर आयुक्तालय असे दोन विभाग झालेले असल्याने आमच्या १८२ उमेदवारांच्या बॅचमधील ५१ पोलीस कर्मचाऱ्यांची ठाणे ग्रामिण या विभागात नेमणुक झाली.
जालना येथे पोलीस प्रशिक्षण घेऊन कवायत, कायद्याच्या परीक्षा देऊन पोलीस शिपाई या पदावर रुजू झालो. परंतु पोलीस स्टेशनमधील कामकाजाचा शुन्य अनुभव गाठीशी असतांना आमची रवानगी पोलीस स्टेशनला झाली.
हातात नियुक्तीचा आदेश, आदेशात पोलीस स्टेशन ‘विरार’.
विरार पोलीस स्टेशन नांव वाचलं. पुन्हा डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह? ‘विरार’ आहे कुठे? त्यावेळी आजच्या सारखी गुगल नेटवर्क, मोबाईल ऑन केला की, लगेच विरार कुठे आहे, ते दिसण्याची सुविधा नव्हती.
‘किटपेटी!’ किटपेटी, म्हणजे पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या पोलीस अंमलदारांना त्यांचा सर्व सरंजाम ठेवण्यासाठी लागणारी एक पत्र्याची मोठी पेटी दिली जाते ती.
काकांकडून तसेच आणखी काही लोकांना विचारुन, विरारची माहिती घेतली, किटपेटी उचलली आणि लोकलच्या माध्यमातून विरारचा मार्ग धरला.
सकाळी ०९.०० वा. विरार रेल्वे स्टेशनला उतरुन विरार पोलीस स्टेशनची माहिती घेऊन साडेनऊ वाजता आयुष्यात प्रथमच पोलीस ठाण्याची पायरी चढणार होतो.
विरार रेल्वे स्टेशनवर उतरुन बाहेर आलो. तेथे टांगेवाले उभे होते. एका टांग्यात पेटी ठेवली व आमची स्वारी विरार पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाली. पोलीसठाण्यात प्रवेश करुन हातातली पेटी खाली ठेवली व समोर असलेल्या एका वयस्कर हवालदारांना कडक सॅल्युट केला. ते हवालदार होते श्री. अघटराव.
त्या हवालदारांनी माझं नाव-गांव विचारुन आस्थेने चौकशी केली. त्यांनी बघितलं, हा नवखा जवान, अजून दाढीमिशी आलेली दिसत नाही. त्यांनी मला बसायला सांगितलं. माझा पहिलाच दिवस होता. मी कावराबावरा होऊन पोलीस ठाण्याची इमारत, त्यातली माणसं न्याहाळत होतो. मनावर प्रचंड दडपण होतं. तसं ट्रेनिंग सेंटरमध्ये पोलिसांची कर्तव्य शिकविली होती, पण आता प्रत्यक्षात मी कर्तव्यावर हजर झालो होतो.
विरार पोलीस स्टेशन हे रेल्वे लाईनवरच विरार स्टेशनच्या पश्चिमेला आहे. त्या काळात ३०-३५ अंमलदार, व पोलीस स्टेशनच्या हद्दीत पन्नास गावं होती. विरारच्या हद्दीतून मुंबई-अहमदाबाद हा महामार्ग जातो. तसेच अहमदाबाद-दिल्ली या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे मार्गाचा काही भाग विरार पोलीसस्टेशनच्या हद्दीत येत असल्याचं, हवालदार श्री. अधटराव यांनी मला समजावून सांगितलं.
त्यांनी मला पोलीस ठाण्याचे प्रमुख वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक श्री. रेणगुंटवार साहेब यांच्या समोर हजर केलं. त्यांचं व्यक्तीमत्त्व बघितल्यानंतर त्यांच्या नजरेला नजर भिडविण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. सहा फुटांपेक्षा जास्त उंची, झुपकेदार मिशा ते घोगऱ्या आवाजात मला जुजबी प्रश्न विचारून म्हणाले, ‘नवीन आहात खात्यात, शिकून घ्या, तपासणीची माहिती घ्या, गुन्हेगारांची माहिती पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरुन बघून घ्या,’ अशा अनेक सूचना करुन ते म्हणाले, ‘भरपूर वर्षे काढायची आहेत खात्यात तरुण आणि होतकरु दिसता, फौजदार परीक्षा देऊन फौजदार होण्यासाठी प्रयत्न करा.’ मी, ‘जी सर’ म्हणून मानवंदना देऊन केबिनमधून बाहेर आलो.
मी दिवसभर पोलीस ठाण्यातली वेगवेगळी रजिस्टर्स पहात होतो. हजर असलेल्या सहकाऱ्यांची ओळख करुन घेतली. हवालदार अधटराव यांनी मला दिवसभर त्याच्या सोबत मदतनीस म्हणून ड्युटीला नेमलं होतं.
रात्री नऊवाजता हजेरी झाल्यानंतर माझी दिवसपाळी ड्युटी संपल्याचं सांगितलं. माझा पहिलाच दिवस असल्यानं बाजूच्या एका रुममध्ये मी कपडे बदलून फ्रेश झालो. समोरच एक खानावळ होती, तिथे मी आणि अधटराव हवालदार दोघांनी जेवण केलं. अधटराव हवालदार हे ठाणे अंमलदार ड्युटी करायचे. विशेष म्हणजे ते देखिल ठाण्यात रहायला होते.
त्या काळात दूर रहायला असलेले अंमलदार चोवीस तास ड्युटी करुन मग घरी जात. त्या दिवशी माझी ड्युटी संपली आणि अधटराव यांच्या बरोबर मदतनीस म्हणून जाधव नावाचे अंमलदार हजर झाले. मी त्यांच्याशी ओळख करुन घेतली. थोडा वेळ गप्पा केल्या. त्यांचे अनुभव ऐकले आणि साधारण रात्री अकरा वाजता मी पोलीस स्टेशनमधील एका रुममध्ये झोपण्यास गेलो.
अंथरुणाला पाठ टेकली. आज पहिला दिवस व्यवस्थीत ड्युटी झाली, म्हणून देवाला हात जोडून डोळे मिटले.तेवढ्यात रात्रपाळीचे जाधव मी झोपलेल्या ठिकाणी धावत आले. मला म्हणाले, ‘पाटील उठ, चल लवकर. आपणाला जायचं आहे. ड्रेस कर, चल, उठ, आवर लवकर.’
त्या अंमलदारानं मला काही एक पुढे विचारु न देता ड्रेस करायला सांगितल्यानं, मी उठून पुन्हा वर्दी अंगावर चढवली. पेटीतील बॅटरी, काठी घेऊन ठाणे अंमलदार अधटराव यांच्या समोर आलो. त्यांच्या समोर अगोदरच दोन माणसं बसली होती. त्यापैकी एक सांगत होता, ‘साहेब, हायवेवर जंगलात मुंबईकडे जाणाऱ्या बाजूला एका ट्रकने एका रिक्षा टेम्पोला धडक दिली आहे साहेब. टेम्पोचा ड्रायव्हर जागेवरच पडला आहे.’
अधटराव हवालदारांनी त्याचा चार ओळींचा जबाब नोंदवून म्हणाले, ‘पाटील, तू आणि जाधव यांच्या सोबत हायवेवर जाऊन बघा आणि तिथंच थांबा. उद्या सकाळी लवकर पंचनामा करायला बिट हवालदार पाठवतो.’
ते काय सांगत आहेत, याकडं माझं लक्ष कमी होतं, माझी उत्सुकता वाढली होती. कसा झाला असेल अपघात? आपण काय करायचं? जाधव मला म्हणाले, ‘चल पाटील.’ मी, जाधव आणि ती दोन माणसं असे आम्ही चौघेजण एका रिक्षातून विरारमधून निघालो. रात्रीचे साडेअकरा वाजून गेलेले, विरार गावचा परिसर रात्रीच्या अंधारात सामसुम होता. आम्ही बसलेल्या रिक्षाचा आवाज तेवढा येत होता. जवळ जवळ अर्धा तास रिक्षा चालत होती. मुंबई अहमदाबाद हायवेच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल. मधून मधून एखादा ट्रक भरधाव वेगाने जात होता.
एका ठिकाणी हायवेवर रिक्षा थांबली. आम्ही चौघेही खाली उतरलो. रिक्षामधले दोघे आम्हा दोघांना सोडून परत विरारला निघून गेले. काळाकूट्ट अंधार, जंगलात रातकीड्यांचा आवाज, भयानक परिस्थिती. मी हातातील बॅटरी चालू करुन प्रकाश केला. रोडच्या एका बाजूला एक ट्रक आणि त्यांच्या समोरुन रिक्षा.
टेम्पोला धडक दिल्याने, रिक्षा टेम्पोचा पुढचा भाग दबून त्याच्या आत ड्रायव्हर सीटवरील व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती.
असा चेहरा रक्ताने माखलेला, बघण्याचा माझा पहिलाच प्रसंग ‘बापरे?’ माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले.
‘काय रे पाटील घाबरलास काय?’ जाधवनं विचारलं.
मी मान हलवत ‘नाही’ म्हणालो. पण ते दृष्य पाहून माझ्या पोटात गोळा आला होता.
जाधवनं आजुबाजूचे मोठ-मोठे दगड स्वतः उचलून मला दोन दगड उचलायला सांगितले. मला कळेना जाधव काय करतोय ते? जाधवने त्या दोन्ही गाड्यांच्या रोडच्या बाजूला दगड लावून ठेवत मला म्हणाला, ‘अरे, रात्रीची वेळ आहे. हा हायवे आहे. रात्रीच्या गाड्या जोरात चालतात ना, म्हणून हे दगड बाजूला लावायचे. मग गाड्या हळूहळू जातात. नाहीतर अजून एक अपघात आणि आपण दोघे त्या रिक्षा टेम्पोतल्या ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसू.’ जाधव हे वाक्य सहज बोलून गेला.
मी मनात म्हटलं, हा किती डेंजर माणूस आहे? अजिबात घाबरत नाही. मला लहानपणी गावाकडच्या काही गोष्टी आठवल्या. त्यावेळी गावात सांगायचे, ‘बुधगाव रस्त्याला पठाणाच्या घराचे जवळ एक माणूस अपघातात कधीतरी मेला होता. त्याचं भूत दिसतंय अधुन मधून.’
म्हणून त्या रस्त्याला आम्ही अंधारात कधी जात नसू. जाधवनं मला टपली मारली, म्हणाला, ‘ए पाटील तू थांब इथं, मी बाजूच्या गावात जावून बैलगाडीची सोय करुन येतो. सकाळी हे प्रेत घेऊन जावं लागणार वसईला. पोस्टमार्टम करायला.’ जाधव म्हणाला.
‘मग मी एकटा थांबू इथं?’ मी विचारलं.
‘नाही, नाही तू एकटा कसा? तो काय टेम्पोतला ड्रायव्हर आहे की तुझ्या सोबतीला.’ जाधव म्हणाला.
असल्या त्या गंभीर वातावरणात पण जाधव जोक मारुन निर्वीकारपणे हसत होता.
मी विचार करीत होतो.
इतकी भयाण काळोखी रात्र, त्यात जंगल, कधीतरी एखादी म्हणाला, गाडी ‘सॉय’ आवाज करीत निघून जायची. कुणी माणूस नाही, की वस्ती नाही.
जाधव हातात काठी घेऊन बाजूच्या गावाकडे निघाला. जातांना त्याने पुन्हा माझ्या पायात साप सोडला, म्हणाला, ‘ए पाटला, झोपू नकोस, अधून-मधून त्या टेम्पोवर बॅटरीचा प्रकाश टाकत रहा. नाही तर जंगलातला एखादा कोल्हा किंवा श्वापद त्या रिक्षावाल्याचं प्रेत ओढून नेतील लक्ष ठेव.’ असं बोलत तो एकटाच पायवाटेने बाजूच्या गावाकडे निघून गेला.
श्री. व्यंकटराव पाटील
सहायक पोलीस आयुक्त
(निवृत्त)
Leave a Reply