नवीन लेखन...

रैना

ईश्वरानं तसं काही सूचित केलेलं नसतानाही काही शब्दांच्या माथी अकारण काळिमा आलेला आहे. त्यातला एक शब्द काळा रंग. तिच्या काळ्या रंगाशिवाय रात्रीचं रात्रपण अपूर्ण आहे. निरपराध असताना देखील रात्रीनं, आपल्या सख्याचा दोषापराध, काळ्या रंगाचा तो कलंक,अल्पांशानं आपल्या अंगावर घेतला आहे. आपण नाही का म्हणत – दिवसाढवळ्या अमका अमका अत्याचार झाला. म्हणजे जणू काही रात्री हलकी फुलकी पापं चालून जावीत. भरबाजारात, भररस्त्यात, दिवसाच्या लख्ख उजेडात, चारचौघांसमोर कोणी डोळाही ओलावू नये; मात्र रात्रीच्या अंधारात, घराच्या कोण्या कोपर्‍यात, जीव दाटून आलेलं विशेष काही नसावं.

सगळं जग स्वार्थी असतं मात्र त्यात एका निस्वार्थ नात्याला जागा अवश्य असते. नेमकं तेच नातं ईश्वराला पाहवलेलं नसतं. मात्र नसलेली व्यक्ति नाही असं प्रत्यक्षात नसतंच. रात्रीच्या एकांताच्या वेळी ती हरवलेली व्यक्ति इतकी प्रतिक्रियाशील होऊन जाते कि ती नाहीये असा निष्कर्ष काढणं अवघड होऊन जातं. ती कशी दिसेल, कशी बसेल, कशी बोलेल, काय बोलेल, काय करेल, तिने काय घातलेलं असेल, तिचे अविर्भाव कसे असतील, ती कशी वागेल हे सगळं इतकं सुस्पष्ट ठावं असतं कि हे सगळं आपण कल्पना करतोय हे देखील विसरून जायला होतं. तिथे बाह्य जगाच्या दृष्टीनं जो एकांत आहे त्याचं अनुभवकर्त्यासाठी खर्‍या अर्थानं सहवासात परिवर्तन झालेलं असतं. ही विरहदायी व्यक्ति कोणाची आई असेल, पिता असेल, पत्नी असेल, मित्र असेल, प्रेयसी असेल वा अजून कोणी असेल; अस्सल प्रेमाच्या ठिकाणी ही रात्रीभेट कधीकधी अवश्य होते. ही विरहकर्ती, ती अदृश्य भेटकर्ती आणि त्यांचं भावविश्व कसं असेल हे डोकाऊन पाहावयाचं असेल तर बिती ना बिताई रैना हे गाणं एकवार एकांतात बसून अवश्य ऐकावं.

Biti na bitai raina

१९८७-८८? तेव्हा मी सातवी-आठवीत असेन. आमच्या घरमालकाच्या पोरींबरोबर उदगीरमधल्या कॅटल क्लास वस्तीतून मी दुधाच्या केटल्या घेऊन नविन बंगल्याबंगल्यांच्या सुखवस्तू निडेबन वेशीकडं जायचो. तिथे एखाद्या त्यातल्या त्यात फ्रेंडली बंगलेवाल्याकडं सगळ्या केटल्या टेकवायच्या नि त्या पोरींचं दूध वितरण चालू व्हायचं. कदाचित दुधाच्या नफ्यात मला हिस्सा नाही म्हणून पायपीट करायचे कष्ट मला न देता तिथेच बसून केटल्यांचे संरक्षण करण्याचे सोपे काम मी करावे असा विचार त्या करत आणि मी कदाचित पोरींचा सहवास हाच पुरेसा मोबदला मानत असेन. त्या उच्चभ्रू लोकांच्याकडे टीवी असे नि घरात प्रवेश नसला तरी बाहेरूनच खिडकीतून आत पलंगावर बसलेल्या लोकांच्या मानांमधल्या दर्‍यांतून त्यांच्या फुलझाडांच्या कुंड्यांमधे पाय ठेवायला जागा शोधत टीवी पाहण्याची मुभा मला होती. अशा प्रकारे मी खिडकितून टीवी पाहत असताना पहिल्यांदा मला टीवीतही खिडकीतून पाहणारी ती पोरगी नजरेस पडली. तिच्या घरातल्या त्या पापुद्रे आलेल्या भिंती, काही जागी टवके पडलेले, त्या भिंतींचा उडालेला रंग, घरात इतकंही काही नीटनीटकं न ठेवलेलं सामान, घरातले अंधारलेले कोपरे, आजारलेलं एक माणूस आणि अगदी साधे कपडे घालून मेकप न करता बसलेली एक साधी पोरगी – हे सिनेदृश्य असलं तरी भपकेबाज असं काहीच नव्हतं त्यात. उलट एक खूप जवळीक वाटलेली. आजही वाटते. घरी येणारांसमोर घर एका विशिष्ट प्रेझेंटेबल अवस्थेत असावं असा हव्यास बरीच मंडळी धरतात नि भेटीगाठीच टाळतात हे निदर्शनाला आल्यापासून या पोरीच्या घराबद्दलची आपुलकी थोडी वाढलीच आहे.

बीती ना बिताई रैना, बिरहा की जाई रैना
भीगी हुयी अँखियोंने लाख बुझाई रैना

त्यावेळेस मला रैना म्हणजे काय ते माहित नव्हतं, आता मला रैना शब्दाचा मी तेव्हा काय अर्थ काढायचो ते आठवत नाही. पण काहीतरी संपत नाहीय असं ती म्हणतेय हे कळे नि नक्कीच ते सुसह्य नव्हतं हे तिच्या नि तिच्या पित्याच्या भावसंवादातून उमजे. रैना म्हणजे काहीतरी विझवायची ज्वालाग्राही गोष्ट असावी. आणि ती ज्वाला विझली कि शांत झोप येत असावी. मात्र कितीही रडून झालं तरी ती ज्वाला काही विझत नाहीय इतका त्या मुलीला आपल्या आईचा विरह होतोय. आता चाळीशीत आल्यावर मला कदाचित लोकांना आई नसण्याची सवय झालीय. म्हणजे क्रिकेटमधे आपण टॉस जिंकतो वा हारतो, नाणं पाहायचं, अल्पसं हळहळायचं नि पुढे कामाला लागायचं. तशी कोणाला आई असते वा नसते, ऐकायचं, ‘ओह सॉरी’ म्हणायचं आणि पुढे कामाला लागायचं. तसं तेव्हा नव्हतं. एखाद्याला आई नसणं म्हणजे नक्की काय काय नसणं हे तेव्हा कळत असे नि व्यक्तिच्या दु:खाची संपूर्ण अनुभूती येत असे. प्रेमगीतं आवडायचं वय ते (तुम्हाला हे थोडं लवकर झालं असं वाटेल, पण असो तो विषय), पण त्या मुलीनं आपल्या देवाघरी गेलेल्या आईला गायलेली ही बॉलिवूडी रॅरिटी मला फार भावून गेली. आई नसणं म्हणजे फक्त मातृदत्त सुखं नसणं ही माझी अनुभूतीची मर्यादा हे गाणं त्या कोवळ्या वयात विस्तारित करून गेलं. भविष्यात मिळणारी सुखं गेली ते गेलीच मात्र भूतकाळात मिळालेली सुखं देखिल पिच्छा सोडत नाहीत. ती वारंवार त्यांचा नॉन-रेप्लिनेशेबलपणा कसा अद्वितीय आहे हे सांगून पिडतात. ते तर सोडाच, भूतकाळात ज्या सुखांना सुख हे लेबल लावलेलंच नव्हतं ती सुखं वर्तमानात देखील त्यांचे चेतासंदेश किती प्रबल आहेत हे वेळोवेळा सिद्ध करतात.

बीती हुयी बतियाँ कोई दोहराये
भूले हुए नामों से कोई तो बुलाये
चाँद की बिंदी वाली, बिंदीवाली रतिया
जागी हुयी अखियों में रात ना आयी रैना

इंजिनिअरिंगच्या परीक्षा संपल्यात. पुण्यावरनं लातूरला जाणारा मी एकटाच आहे. एक महिन्याची सुट्टी आहे. लालडब्ब्याची बस इंदापूरपुढे कुठेतरी एका ढाब्यावर थांबते. सलग तासंतास बसून कंबरडे ताणलेले सगळे प्रवासी तिथे उतरतात. ढाब्यावरही आणि बसमधेही फार काही लोक नाहीत. हायवेवरून ४-५ मिनिटांनी एखादी गाडी जातेय. ढाब्यापुढे बाजा मांडलेल्या आहेत. दणकून भूक लागलेली आहे. बाजूला एखादं कुटुंब एकमेकांना आग्रह करण्यात, खाऊ घालण्यात मग्न झालं आहे. सगळीकडे अंधारलेलं आहे. ढाब्याच्या प्रत्येक खाटेला एक कंदिल दिला आहे. फक्त काउंटरवर विजेचा दिवा असावा. कमीत कमी बिलामधे जास्तीत प्रमाणात नक्की काय येतं इतका मेनू परिचय नसल्यामुळं नि वेटरला तसं थेट विचारणं हिमतीबाहेरचं असल्यामुळं माझं देखील काहीतरी ऑर्डर करून झालंय. शिवाय किती मिनिटात जेवण उरकायचं आहे त्याची धास्ती कंडक्टरने लावून दिली आहेच. तितक्यात ढाब्याच्या खांबावर लटकावलेला रेडिओ त्या न सरणार्‍या रैनेचं गीत गाऊ लागतो नि माझं या गीताचं दुसरं श्रवण चालू होतं. यावेळेस मात्र मी पहिल्यापेक्षा फार स्मार्ट माणूस झालो आहे. कॉलेजमधल्या हिंदी मुलांमुळे माझी हिंदी पक्की झाली आहे. तिला आता कोणी हसत नाही. काश्मिरच्या रैना आडनावाच्या मुलानंच मला रैना म्हणजे रात्र असा अर्थ सांगीतलेला आहे. गाण्याच्या प्रारंभीच्या तंतूवाद्याच्या आघातांची ताकद अफाट आहे. त्या एकेका आघातामधे काहीतरी गूढ, गुह्य, गुप्त आहे. त्या एकेका पडघमामधे हृदयाचा एकेक कप्पा खोलत आतवर खोल शिरायचं सामर्थ्य आहे. त्या ढाब्यावरच मला माझं हृदय अंतर्बाह्य दाखवलं जातंय. वास्तविक माझ्या आयुष्यात कोणीही माझ्यापासून तसं दूर गेलेलं नाही. टच्चूड, पण माझी स्वतःची आई तर अगदी धडधाकट आहे. पण तरीही गाणं ऐकताना काहीतरी कालवाकालव होतेय. हे जितकं मातृविरहगीत आहे तितकंच ते भावविरहगीतही आहे हे मला जाणवतं. मी मला नक्की काय सोडून गेलं म्हणून सैरभैर होऊन शोध घेऊ लागतो. सात्विक, समाधानी लोकांच्या हरितप्रदेशातून मी कोरड्या, असंतुष्ट लोकांच्या मरुभूमीत येऊन पडलोय का? लहानपणीची गावं आपण नक्की कशासाठी सोडली? आपण जिथे आहोत तिथलं सगळं आपल्याला आवडतं का? आजूबाजूचं सगळं आवडायला हवं असा विचारच विपरित आहे असं मानणार्‍या लोकांत कदाचित आपण केवळ स्वतःसच स्वतःचं कुढणं माहित असलेले ‘सामान्य’ व्यक्ति तर नाहीत? आपण वयाने मोठे झालो आहोत म्हणून असं होतंय कि आपण स्थलांतरित झालो आहोत म्हणून असं होतंय? जास्त जाण आली कि जगाचा वाईटपणा जास्त प्रकर्षानं जाणवायला लागतो. तसं झालंय का आपलं? मूळात सगळं चांगलंच आहे, वा सगळं चांगलंच होईल, वा सगळं चागलं आपण स्वतः करू शकू असा शाळकरी आशावाद आता चार सहा महिन्यांत जबाददारी अंगावर घ्यायची वेळ आली आहे तेव्हा मूर्खपणा का वाटतोय? जगासाठी आपल्याला काय काय करायचं होतं? ते सगळं करण्याला आपण मुकून एका सिमित चक्राला बांधले जाणार. अस्वस्थ करत होतं सगळं. एरवी मन विषाची सवय झालेल्या शरीरासारखं असतं, पण हे रात्रीगीत ऐकलं कि ते गाणं ते विष सगळं ढवळून काढतं आणि ते चांगलंच उफाळून येतं, भिनतं. ती रात्र खरोखरंच अवघड असते. खिडकीतून मी अंधारच्या सावल्या पाहत मी मी, लोक, जग, ईश्वर कोण कुणीकडे का चाललंय याचा विचार करत असतो, बस लातूरकडे मार्गस्थ झालेली असते. सकाळी मी फार थकून उठलेला असतो, न जाणारी रात्र खरोखरीच फार लांब असते याची पहिली सिद्धता मला मिळालेली असते.

युग आते हैं और युग जाए
छोटी छोटी यादों के पल नहीं जाए

पेट्रोल नि डिझेलचा वास मारणारी गोंगाटी शहरं मला आवडत नाहीत म्हणून मी कूलू नि मनाली दोन्ही शहरं गैरसोयीची पडावीत अशा मधल्या जागी थांबलोय. हे वातावरण दिल्लीच्या दमट, उष्ण आणि रोगट वातावरणाच्या माणसासाठी स्वर्ग आहे. बायको, मुलगा, मित्र, त्याचे कुटुंबीय यांच्यासोबत खूप भटकंती केलीय. हिमालयामधे कार चालवण्याचा आनंद घेतला आहे. संध्याकाळचं जेवण झालंय. अंती तोंडात क्षणात विरघळतील असे टपोर गुलाबजाम खाऊन झालेत. त्याचा सुवासिक पाक देखील मनसोक्त चाटून झालाय. सूर्यास्त केव्हाचा झालाय नि समोरची बर्फाच्छादित पहाडे दिसताहेत कि नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या खूप खूप खाली एखादा दिवा तिथे काहीतरी आहे याची साक्ष आहे. मी एकटाच बाहेर फिरायला आलोय. मी खूप थकलोय, पण रात्रीचं, एकांताचं, शांततेचं सौंदर्य पाहायचं अजून उरलंय. अलिकडे एकांत मिळणं बंदच झालेलं आहे. मागे एकट्यानी कधी काय केलं ते आठवतच नाही. कष्ट, कर्म, ताण आणि सुख, स्वच्छंदीपणा यांनी आठवड्याचं आणि वर्षाचं २:५ आणि ३०: (३६५-३०) असं आपापसांत विभाजन करून घेतलं आहे. त्यातला सुखकाल चालू आहे म्हणून मी जाम खुष आहे. वस्तीपासून दूर मी एका दगडावर येऊन बसतो. खाली खोल घळईत दोन उंचच्या उंच समांतर पर्वतांच्या रांगांमधून व्यास नदीचा ओघ वाहत आहे. पाण्याचे अणूरेणू हातात हात घालून एकमेकांना जुन्यापुराण्या प्रवासाच्या गोष्टी सांगताहेत. दिवसा भीडेने चेपलेल्या त्या कणांना रात्रीच्या वेळी खूप आत्मविश्वास आला आहे. बेरात्री घाटांमधे निघालेल्या एखादा द्वाड ट्रक त्यांना बोलण्यात व्यत्यय न होईल याची काळजी घेत गुमान चालला आहे. त्याचा वाहता प्रकाश नागमोडी वळणांच्या रस्त्यावर कधी दिसतोय, कधी दिसत नाहीय इतकीच काय ती त्याच्या असण्याची साक्ष. त्या प्रकाशात उजळून निघालेली झाडं त्या वाहनाला आपल्या विस्ताराची, रादर त्याच्या क्षुद्र आकाराची, अहंपूर्वक जाणिव करून देतात नि क्षणार्धात गडप होतात. हा लपंडाव पाहत मी बराच वेळ पाण्याच्या कणांचं बोलणं ऐकत असतो. त्यांना कुठं जायचं असेल? त्यांचा प्लॅन काय? त्यांना अथांग महासागरात कुठेतरी पडून राहायला जास्त आवडत असेल कि कोण्या झाडाच्या मूळातून पानाकडे शिरायला आवडत असेल? आम्हा माणसांबद्दल त्यांचं काय मत असेल?

अशावेळी सहसा मी गाणी ऐकतच नाही नि ऐकली तर भावगीतं ऐकतो. पण यावेळेस का कोण जाणे, वाटलं आपल्या यादीतल्या शेकडो गाण्यांपैकी एखादं गाणं रँडमली वाजवावं. कमाल म्हणजे पुन्हा व्हायोलिनवर बिती ना बिताई रैना चालू झालं.

http://(https://www.kkbox.com/hk/en/album/Cx-a6FsPk5fBGu0FG4Oo0091-index.html)

आवडीचं म्हणून हे गाणं कित्येकदा ऐकलं होतं, मात्र वाद्यसंगीत म्हणून क्वचित. पुन्हा ते पडघम वाजले नि अंतःकरणाची सगळी पटलं उघडली. तसा मांजर जसं दूध पितं तसं मी हे गाणं ऐकतो. ते दूध देणारी गाय कोणती, ते गरम कोणी केलं, थंड कोणी केलं, बशीत कोणी घातलं, आणून कोणी दिलं याच्याशी मला काही देणं घेणं नसतं.

काळ नावाचं असं सवतं काही असतंच का? या ब्रह्मांडाच्या बाहेर नेऊन न्याहाळून पाहू शकू असा काळ नावाचा कोणता पदार्थ आहे का? कि जे सामान्यतः इंट्यूशन होतं कि अन्य बाबींतील बदलांच्या गतींचे जे परस्परसंबंध आहेत त्यांच्यावरच काळ असण्याचा सोयीचा आरोप केला गेला आहे? आईनस्टाइननं तर काळ आणि अवकाश यांचं संयुज असतं आणि ते वाकतं, मंदावतं, थांबतं, धावतं असं सांगीतलं आहे. जगातल्या सर्वात बुद्धीमान माणसानं सांगीतलं आहे तर काळ नावाचं एक सवतं सत्य असावं खरं. काळाचा हा सापेक्षतावाद मला कधीही झेपला नाही. पण रात्र सरण्यामधला सापेक्षतावाद जो कवीनं सांगीतला आहे तो चटकन उमजतो नि भावतो. युगं सरतात पण आठवणींचे काही क्षण त्यांच्यापेक्षा दीर्घायुषी वाटतात. तशी आयुष्याची डिटेल्ड समरी करायला सांगीतली तर माझं तास दोन तासांत सांगून होईल, पण अशा काही मोजक्या आठवणी आहेत, मी मलाच सांगत राहीन आणि माझ्यातलाच एक दुसरा मी ऐकतच राहील आणि ती गोष्ट कधीच संपणार नाही. आता मी अशा क्षणांचं रवंथ करायला चालू करतो. विसरलेले क्षण, न विसरता येणारे क्षण, विसरलेले लोक, न विसरता येणारे लोक, आयुष्यात विशेष स्थान असलेल्या जागा, परतून न जायच्या जागा, विसरलेल्या सवयी, विसरलेले स्वभावपदर, न विसरता येण्यासारखे काही जणांचे शब्द, … बरंच काही आठवत राहतं. मनात एक काहूर उठतं. हे गीत जितकं विरहगीत आहे तितकंच ते वादळगीत देखील आहे. आठवणींच्या पिटार्‍यातून कितीतरी सिनेमांच्या क्लिप्स रिमिक्स होऊन अव्याहतपणे सुसाटपणे डोळ्यासमोर पळायला लागतात. पापण्यांच्या खालच्या पेशींना मेंदू संदेश देणारच असतो तितक्यात बायकोचा फोन येतो नि वादळ शमवून मी हॉटेलकडे चालू लागतो. तिच्या पदराखाली मी ५-१० मिनिटानी निवांत झोपणार असतो. किमान हिच्या आठवणींत मला हे गाणं कधीच ऐकायला लागू नये असं इश्वराला मनोमन घोकत मी हॉटेलमधे पोचतो नि हुरहुर शांत झाल्यावर रैना नकळत सरून जाते.

झूठ से काली लागे, लागे काली रतिया
रूठी हुयी अखियों ने, लाख मनाई रैना

घरात मी एकटाच असाच टीवीचे चॅनेल चाळत असतो. परिचय, हे गाणं ज्यात आहे तो सिनेमा लागलाय. सिनेमा पाहावा का ठेवावा असा विचार मी करतोय. भावूकतेचे जास्त संदर्भ माहित झाले तर भाव कोरडे होतात असा अनुभव आहे. नेहमीप्रमाणे आल्याड पल्याड करत मी मधे मधे काही सीन पाहतोय. आपल्या मातेला नि पित्याला आपले कठोर हृदयाचे आजोबा घरातून काढून टाकतात म्हणून मनात अढी ठेऊन असलेल्या नातीस त्या कठोर आवरणाखाली दडलेल्या आजोबांच्या मृदू, प्रेमळ आत्म्याचा परिचय होतो अशी छोटीशी कथा! त्यातल्या नातीने नि तिच्या वडिलांनी त्यांच्या बिकट परिस्थितीच्या काळात मरण पावलेल्या आईच्या आठवणीत हे गाणं. पुन्हा तंतूनाद होतात नि पुन्हा हृदयाचे कप्पे उघडले जातात. एकटं गाठून माझ्या अंतःकरणाला निर्वस्त्र करण्याची या गाण्याला सवयच जडलीय. आयुष्यात फार काही शत्रूसंग्रह केलेला नाहीय परंतु ज्यांच्याबद्दल अवधारणा आहेत असे लोक नाहीतच असं नाही. आपण खरोखरच लोकांशी न्याय्यपणे वागलो आहोत का असा विचार मी करतो. एकेका प्रतिमापतिताची फ्रेम माझ्या डोळ्यासमोरून सरकतेय. अगोदर चांगले वाटलेले, नंतर वाईट वाटलेले. अगोदर वाईट भासल्याने दूर ठेवलेले, नंतर फार छान निघालेले. गळेपडू म्हणून तिटकारलेले. कोरडे म्हणून टाळलेले. इन्कंपॅटिबल म्हणून चार हात दूर ठेवलेले. जोखमीचे वाटले म्हणून अव्हेरलेले. हलकीशी घमेंड दाखवल्यामुळे आयुष्यभरासाठी मित्र बनण्याचे पोटेंशिअल नाही असे मानलेले. मी चांगले वागत असतानाही तिढा ठेऊन वागणारे. अंगावर काहीतरी जबाबदारी टाकतील असे वाटलेले असे आणि असले बरेचशे. आयुष्यात कधी एका जागी स्थिर राहिलो नाही. खूप सर्कल्स बदलली. जास्त तापमान आणि जास्त दाबाखाली जास्त तास लागणार्‍या प्रक्रिया आयुष्यात कधीच झाल्याच नाहीत. जे काही घडलं ते फटाफट घडलं. माणसांबद्दल मत बनवायला फार काही वेळ नव्हता. आपण फार ओपन आहोत, लिबरल आहोत, फ्रेंडली आहोत असा समज नक्की किती सुयोग्य आहे हे क्रॉसचेक करून पाहावं असं कधी वाटलं नाही. ज्यांच्या भिन्न भिन्न ऋण प्रतिमा आहेत असे कितीतरी चेहरे मी नजरेसमोरून घालतो. मी यश पावतो, माझं काही भलं होतं तेव्हा त्यांच्याकडे एक अवहेलनात्मक कटाक्ष टाकतो नि माझे पाठीराखे, माझ्या गुडबूक्समधली माणसं,जी या विघ्नचिंतकांच्या कितीतरी पट आहेत, ती जोरजोरात हर्षोल्लास करत असतात. हे सगळे उत्सव समारंभ माझ्या मनातल्या स्टेडियममधे होत असतात. आयुष्यात प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी हे स्टेडियम खच्चून भरलेलं असतं. माझे सवंगडी भरपूर जल्लोष करत असतात. तिथली ही दुष्ट लोकांची पराभूत टिम हिरमसून गेलेली असते. माझ्या यशाचं त्यांना दु:ख असल्याची मला पूर्ण खात्री आहे. नि माझ्या बाजूच्या लोकांसमोर, लोकांसोबत त्यांना हिणवताना होणारा आनंद सार्थक आहे असंच मी मानत असतो. असंच मानत मी आयुष्य जगत आलेला असतो, मग ती मंडळी माझ्या दैनंदीन आयुष्यात नसोत नाहीतर या जगात नसोत! अचानक ती न सरणारी रैना मला आठवण करून देते कि ही हारकी टिम तुला कोणी लागत नाही का? किमान त्यातले काही? ती नाठाळ नात बनून किती दिवस राहायचं? कधीतरी त्या आजोबाच्या आत्म्याकडे निरपक्षपणे का नाही पाहायचं? मी पुन्हा त्या विघ्नचिंतकांच्या केसेसच्या फाईल्स उघडतो. बर्‍याच ठिकाणी मला माझा अहंकार, टोकाची प्रतिक्रिया, दाबून ठेवावा लागलेला राग, माहिती नसल्यामुळं करून घेतलेले गैरसमज, पूर्वग्रहदोष, संकुचित अस्मिता, ईर्ष्या, लोभ, स्वार्थ यांची एक तटस्थ म्हणून वकीली करता येत नाही. माझीच काही वर्तनं उघडीनागडी पडलेली दिसतात. रैना मला माझं निरपेक्ष निरीक्षण करण्याची जादूई शक्ती देते. जिथे माझ्याच ऋणगुणांचा परिणाम आहे अशा सगळ्या मंडळीना मी अल्लाद उचलून स्टेडियममधे माझ्या मित्रमंडळींमधेच कुठेतरी अ‍ॅडजस्ट करतो. ईथून पुढे आपण काही साजरं करू तेव्हा ते त्यांच्या नाकावर टिच्चून वैगेरे साजरं करायचं नाही असा निर्धार मी करतो. त्या केसेस मी क्लोज करतो. तरी काही केसेस उरतातच. त्या क्लोज करणं अवघड जातंय हे मला स्पष्ट दिसतंय. ही उरलेली अल्प स्वल्प मंडळी माझ्यासोबतच नव्हे तर जनरलीच दुष्ट असल्याचं मला पक्कं माहित आहे. त्यांना चांगलं मानणं बौद्धिक काँप्रोमाइज ठरेल. तरीही ही मंडळी आनंदानं जगतात, त्यांचं माझ्याइतकंच मोठं सर्कल असतं, कधीकधी त्यांना महाजनपद लाभतं, प्रसिद्धी लाभते , नि आपल्या दुष्टपणाचा कुठला गम त्यांना असल्याचं त्यांना दिसतच नाही. कैकदा मीच त्यांच्यासाठी गौण असतो. त्यांना लाभणारी सुखशांती लाभावी कि लाभू नये याबद्दल मी काय विचार करावा? मी या केसेसचं काय करायचं म्हणून बुचकाळ्यात पडलेलो आहे. रात्र उशिरापर्यंत चढलेली आहे.मी त्यांच्याबाजून विचार करायचाय कि माझ्या यात मला खूप संभ्रम व्हायला लागलाय. ज्यांना जी सहानुभूती द्यायला हवी, न्याय्य स्थान द्यायला हवं ते मी कदाचित देत नसेन म्हणून मी अस्वस्थ होतो आहे. मला काही उत्तर काढता येत नाहीय. एक मात्र कळलं आहे कि नक्की काय करायचं आहे हे जाणण्यासाठी मला माझ्याच आत्म्याचा अधिकचा परिचय हवा आहे.

— अरुण भास्करराव जोशी

लेखकाचे नाव :
अरुण भास्करराव जोशी
लेखकाचा ई-मेल :
arunjoshi123@gmail.com

Avatar
About अरुण भास्करराव जोशी 2 Articles
मी ललित, मराठवाड्याचे ललित, विज्ञान, राजकारण, ईशान्य भारत, सामाजिक चळवळी, भारतीय परंपरा या विषयांवर लिहितो. मी एम् बी ए आहे नि पायाभूत क्षेत्रात करार व वित्त यांचे काम पाहतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..