पेट्रोलियम खनिज तेलाचा रंग व स्वरूप पाहता, त्याला ‘काळे सोने’ असे संबोधिले जाते. त्याची वाढती गरज लक्षात घेता, वास्तविक ते औद्योगिक क्षेत्राला ‘जीवन देणारे रक्त’ असं म्हटल्यास वावगे न ठरो. फार फार जुन्या काळापासून प्राणी व वनस्पतींच्या जमिनीत गाडल्या गेलेल्या अवशेषातून हायड्रोकार्बन तेले निर्माण झाली व ती जमिनीत तसेच समुद्राच्या तळाशी काळ्या जाडसर तेलाच्या स्वरूपात साचली गेली. वाढत्या लोकसंख्येमुळे, माणसाची अन्नधान्याची गरज वाढत गेली. पिकांची योग्य वाढ होण्यासाठी व विपुल प्रमाणात अन्नधान्य पिकविण्यासाठी खतांची गरज असते, तर किडामुंगीपासून त्यांचे करण्यासाठी संरक्षण कीटकनाशके वापरावी लागतात. हे दोन्ही रासायनिक पदार्थ पेट्रोलियमजन्य रसायनापासून निर्माण केले जातात. पेट्रोलियम तेले ही कीटकांसाठी विष असतात. म्हणून तेले व पाणी यांच्या मिश्रणांचा फवारा मारला जातो. १९४३ साली डी.डी.टी. (डायक्लोरोडायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन) हे प्रथम पेट्रोलियमजन्य कीटकनाशक वापरले गेले. त्यानंतर बी. एच. ई. (ब्रोमोहायड्रो इथेन), एल्ड्रिन, एंडोन यांसारख्या कीटकनाशकांचा उगम बेंझिन, ओलेफिन, सायक्लोपेन्टिलीन या खनिजजन्य रसायनापासून झालेला आहे.
डायएल्ड्रिनसारखे रसायन कीटकापासून मेंढरांचे रक्षण करण्यासाठी वापरतात. त्याचप्रमाणे डायक्लोरोप्रोपेलीन, डायक्लोरोओपेन, इथिलीन डायब्रोमाइड इ. पेट्रोलियम रसायनांचा वापर जमिनीतील हानिकारक जीव-जिवाणूंचा नायनाट करण्यासाठी होतो. पेट्रोलियमपासून मिळणारी नॅफ्थालिक आम्ल व बुटेडिन युक्त रसायने कवकाचा बीमोड करण्यास उपयोगी ठरतात. केरोसिन व सफेद स्पिरिटचा वापर पिकांना पोहचविणाऱ्या तणांचा हानी नाश करण्यासाठी होतो. वनस्पतींना पोषक ठरणारी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम ही मूलद्रव्ये पेट्रोलियम खनिजातून मिळतात. खनिज वंगणातून मेण मिळविले जाते. त्याचा वापर | मेणबत्त्या तयार करणे, कागद-कापड जलरोधक बनविणे, बूट पॉलिश करणे, खाद्यपदार्थांची साठवणूक, रबरावरील प्रक्रिया, धातूवरील नक्षीकाम, मलम तयार करणे इ. अनेक ठिकाणी होतो.
गंधक, डिटर्जंट, नायलॉन, पॉलिस्टर, विविध प्रकारचे प्लास्टिक; अशा असंख्य पदार्थांच्या निमित्ताने रसायनांची खाण म्हणजे जमिनीतले हे काळे तेल होय.
जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply