कार्गो डिस्चार्ज करून जहाज काळ्या समुद्राकडे निघाले होते. रशिया किंवा जॉर्जिया या देशांपैकी कुठल्या तरी एका देशात कार्गो लोडींग साठी कंपनीने मार्गस्थ व्हायला सांगितले होते. फ्रांसचा किनारा सोडल्यापासून चौथ्या दिवशी जहाज इस्तंबूलला पोहचणार होते. रविवार असल्याने दुपारी बिर्याणी खाऊन सगळे इंजिनियर्स दुपारची मस्त झोप काढायच्या मूड मध्ये होते. सकाळी सव्व्वा दहा वाजता इंजिन कंट्रोल रूम मध्ये टी ब्रेक सुरु असताना ब्रिज वरून फोन आला. जुनियर इंजिनियरने फोन उचलला आणि निरोप सांगायला चीफ इंजिनियर जवळ आला. बडा साब कॅप्टन ने सांगितलं आहे की अकरा वाजता क्रु मेस रूम मध्ये संपूर्ण शिप क्रु ची मिटिंग ठेवायची आहे तशी अनाउन्समेन्ट पण करतील परंतु त्याअगोदर साडे दहा वाजता कॅप्टन ने तुम्हाला शिप्स ऑफिस मध्ये चर्चा करायला बोलावले आहे.
मिटिंग कशासाठी असेल आणि कॅप्टन चीफ इंजिनियर सोबत काय चर्चा करणार याची कल्पना फक्त इलेक्ट्रिक ऑफिसरलाच आली होती.
अकरा वाजता सगळे अधिकारी आणि खलाशी क्रु मेस रूम मध्ये हजर झाले. रविवार असल्याने मेस रूमला लागून असलेल्या गॅली मधून शिजत असलेल्या चिकन बिर्याणीचा सुगंध दरवळत होता. बिर्याणी सोबत लागणारे पापड फ्राय करून स्टीवर्ड आणि चीफ कुक सुद्धा मिटिंग मध्ये येऊन बसले.
चीफ ऑफिसरने सुरवात केली, तुम्हा सर्वांपैकी कोणाला एखाद्या बद्दल काही तक्रार असेल तर चीफ इंजिनियर किंवा कॅप्टन कडे येऊन तसे सांगावं. पण अशाप्रकारे कोणाला त्रास देऊ नये. मागील दोन दिवसापासून कॅप्टन च्या केबिन मध्ये रोज रात्री कोणत्याही वेळेला फोन करत आहे. रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत तीन चार वेळेला कोणत्याही वेळी ब्लँक कॉल करून कॅप्टनची झोपमोड केली जातेय. आज सर्वांना वॉर्निंग दिली जातेय जर असा प्रकार पुन्हा घडला तर त्याला आपल्या जहाजावरून आणि कंपनीतून काढले तर जाईलच पण संपूर्ण शिपिंग इंडस्ट्री मध्ये ब्लॅकलिस्टेड सुद्धा केलं जाईल. जहाजावर प्रत्येक केबिन आणि महत्वाचे जागी असलेले फोन हे कम्युनिकेशन साठी आहेत. कोणाला त्रास देण्यासाठी नाहीयेत.
चीफ ऑफिसरचे बोलणे मध्येच थांबवून कॅप्टनने बोलायला सुरवात केली. तो बोलू लागला, आपण मागील दोन दिवस फ्रान्स च्या लव्हेरा या पोर्ट मध्ये होतो, तिथल्या पोर्ट ऑथॉरिटीने शोर लिव्हची परमिशन दिली नसल्याने कोणालाच बाहेर जाता आले नाही. जर ह्या कारणामुळे कोणी नाहक त्रास देत असेल तर कृपया असं करू नका. याव्यतिरीक्त दुसरे कारण असेल तर ते सुद्धा सांगावं परंतु अशा प्रकारे माझीच काय इतर कोणाचीही झोपमोड करू नका.
इलेक्ट्रिक ऑफिसरला रात्रीच कॅप्टन ने टेलिफोन एक्सचेंज मधून कुठल्या फोन वर कुठून कॉल येतो ते समजेल का असं विचारल्यावर त्याने तसं सांगता येईल की नाही त्याकरिता जहाजावर बसवलेल्या टेलिफोन एक्सचेंज यंत्रणा असलेली माहिती पुस्तिका वाचावी लागेल त्याशिवाय काही सांगता येणार नाही असं बोलून वेळ मारून नेली होती. कॅप्टन ला त्याची झोपमोड करणारा सापडला असता तर आजच्या मिटिंग ऐवजी झोपमोड करणाऱ्याची इस्तंबूल वरून घरी पाठवायची सेटिंग केली असती. परंतु इलेक्ट्रिकल ऑफिसरच्या फोन ची घंटी वाजवणारऱ्याचा शोध घेण्यासाठी नकार घंटे नंतर त्याने नाईलाजाने सकाळी मिटिंग लावली.
खरं म्हणजे कॅप्टन च्या जहाजावरील वागण्याच्या आणि बोलण्याचा सगळ्यांनाच त्रास होत होता. एरवी अरेरावी करून नेहमीच तोऱ्यात बोलणारा कॅप्टन दोन दिवस झोपमोड झाल्याने काकूळतिला येऊन असं करू नका म्हणून विनवणी करत होता. कॅप्टन ची झोप उडवणारा जहाजावरचा हिरो आहे तरी कोण याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. एकूण सत्तावीस जणांपैकी कोण कुठून रात्री अपरात्री कॅप्टन च्या केबिन मध्ये कॉल करत असेल, रात्री बारा ते चार चा वॉच करणारे की पहाटे चार ते आठ चा वॉच करणारे. की कॅप्टनचे वागणे सहन न झाल्याने त्याची झोपमोड करण्यासाठी स्वतः न झोपणारा एखादा अवलीया. एक जण असेल की त्याच्यासोबत आणखीन कोणी असतील, ऑपेरेशन झोपमोड करण्याचे प्लॅनिंग आणि एग्झिक्यूशन करणारे नेमके आहेत तरी कोण असा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. बारा वाजायला आले होते, बिर्याणीच्या दरवळणाऱ्या वासाने सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते. कॅप्टन कधी एकदा मिटिंग संपवतो आणि बिर्याणीवर ताव मारून झोप काढतो असं सगळ्यांना झाले होते. मिटिंग आटपल्यावर चीफ इंजिनियर इलेक्ट्रिकल ऑफिसरला बाजूला घेऊन त्याच्या कानात कुजबुजु लागला, कॅप्टन च्या केबिन मध्ये जाणारे ब्लँक कॉल आजच्या मिटिंग नंतर बंद होतील न होतील पण एकदा आल्यावर सहा महिने एन आर आय टाइम पूर्ण होईपर्यंत जहाजावर ठाण मांडून राहणारा कॅप्टन चार दिवसांनी स्वतःच इस्तंबूल हुन दोन महिने पूर्ण व्हायच्या आतच घरी जायचंय असं बोलतोय. त्या दोघांतील कुजबुज ऐकून कॅडेट आणि सेकंड मेट एकमेकांना बघून गालातल्या गालात हसत होते. कारण सेकंड मेट रात्री बारा ते चार च्या वॉच मध्ये तर कॅडेट पहाटे चार ते आठ वॉच मध्ये. दोघेही कॅप्टनच्या लहान लहान गोष्टीतील आक्रस्ताळीपणाला वैतागले होते.
जहाजावर कोण कुठल्या प्रकारे बदला घेऊन कोणाला कसा धडा शिकवेल याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही. कोण कोणाचा बाहेरून शत्रू आणि आतून मित्र असतो याचा कोणालाच थांगपत्ता नसतो. एकूणच जहाजावर घडणाऱ्या बहुतांश घटना सहजा सहजी पकडता येत नाहीत.
जहाजावर प्रत्येकाच्या केबिन मध्ये मग तो खलाशी असो वा अधिकारी सगळ्यांच्या बेडजवळ झोपेत असताना सुद्धा हात पोहचेल अशी फोनची व्यवस्था केलेली असते. सगळ्या फोन जवळ जहाजावरील प्रत्येक व्यक्तीच्या आणि भागातील फोन नंबर ची लिस्ट लावलेली असते.
जहाजावरील इमर्जन्सी मध्ये जिथे जिथे आवश्यक असेल तिथे फोन असतो. इंजिन रूम किंवा जास्त आवाज असलेल्या ठिकाणी हेड सेट आणि माईक फोन ला जोडलेले असतात. मेस रूम, जिम, स्टोअर रूम अशा प्रत्येक ठिकाणी फोन असतोच असतो. फोनचा रिसिव्हर व्यवस्थित ठेवला नाही किंवा कोणी मुद्दाम काढून ठेवला तर ब्रिजवर एक अलार्म सुद्धा वाजतो ज्यामुळे कोणाला फोन बंद करून ठेवायची पण चोरी असते.
मला मेसेज मिळाला नाही किंवा संपर्क झाला नाही असं जहाजावर कोणालाही बोलता येत नाही कारण कोणत्या क्षणी कोणती इमर्जन्सी येईल हे कोणालाही ठाऊक नसते.
एखादा लहान प्रॉब्लेम किंवा घटना अपघातात रूपांतरीत होण्यापूर्वी तो जहाजावर सगळ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी टेलिफोन हे महत्वाचे कम्युनिकेशन मिडीयम आहे.
जहाज खराब हवामानात किंवा वादळ वाऱ्यात कितीही हेलकावत असले तरी सगळे फोन व्यवस्थित चालू राहतात अशा प्रकारचे फोन आणि यंत्रणा जहाजावर असते.
माझ्या एका जहाजावर तर पस्तीस वर्षांपूर्वी बसवलेली टेलिफोन यंत्रणा अजूनही व्यवस्थित कार्यारत असलेली पहायला मिळाली. वर्षा दोन वर्षांत फेकून द्यावे लागणारे स्मार्ट फोन पेक्षा बोटाने गरा गरा आकडे फिरवून डायल करणारे फोन जहाजाची चाळीशी आली तरीही ट्रिंग ट्रिंग करताना बघून नवल वाटतं.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर.
B.E.(mech ), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply