नवीन लेखन...

ब्लाइंड स्पॉट

 

एक छोटेखानी कार्यक्रम ..
अगदी जवळचे नातेवाईक-मित्रमंडळी अशा फक्त ५०-६० जणांच्या उपस्थितीत.

मृदु आवाजात लावलेलं संगीत, मागे फुलांची सजावट आणि व्यासपीठावर मध्यभागी ठेवलेल्या सोफ्यावर बसलेल्या मायलेकी.

आता कार्यक्रम सुरू करण्यासाठी लेकीने माईकचा ताबा घेतला.

“ नमस्कार मंडळी !!”

“ आज आमच्या आईच्या कौतुक सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून आलात त्यासाठी सगळ्यांचे खूप आभार. तशी ती इथल्या प्रत्येकाची बहीण, मामी, मावशी, आत्या , मैत्रीण अशी कोणी ना कोणीतरी आहेच. तिच्यावरच्या प्रेमापोटीच तर तुम्ही इतक्या आयत्या वेळेस कळवून सुद्धा आला आहात पण तरीही सगळ्यांना प्रश्न पडला असेलच की आज हे तिचं कौतुक नेमकं कशासाठी आहे ??? …. ती काही कोणी मोठी उद्योजिका किंवा मोठ्या हुद्दयावर वगैरे नाही. बाकी समाजाच्या दृष्टीने तिने काही अनन्यसाधारण कामगिरी वगैरे केली नाहीये. पण इतरांसाठी ती चारचौघींसारखी सामान्य महिला असली तरी मी आणि माझ्या दादासाठी ती काय आहे हे आम्ही शब्दात व्यक्त नाही करू शकत !!” .
समोर बसलेल्या आपल्या भावाकडे बघत ती म्हणाली..

“ आमचे बाबा गेले तेव्हा मी जेमतेम तिसरीत आणि दादा पाचवीत. त्यानंतर ज्या धीराने आणि जिद्दीने आईने आम्हाला वाढवलंय नाss .. खरंच .. आई तुझ्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोचलो आहोत. इतक्या वर्षात आई स्वतःसाठी कधीच जगली नाही. तिचा प्रत्येक दिवस फक्त आमच्या उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेत गेला . इथे बसलेले बहुतांश जण त्याचे साक्षीदार आहेतच. या सगळ्यात तिचा कधी म्हणावा असा सन्मान झाला नाही की कुठला मोठा समारंभ. म्हणूनच आम्हा भावंडांना वाटलं की कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्हा सगळ्यांना बोलावून आपल्या माणसांमध्ये हा कौतुक सोहळा करावा !! .. थोडासा अनौपचारिक, थोडासा औपचारिक ! अर्थात तिच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे ती काही यासाठी होकार देत नव्हतीच … पण तिला तयार करण्याचं सगळं श्रेय तिचे लाडके जावईबापू आणि प्रेमळ सूनबाईना. आता आम्हा बहिणभावाचा भाव जरा कमी झालाय म्हणा …. हो ना आई …. हाहा !! …… आणि हो .. आज आईचा वाढदिवस वगैरे नाहीये तरीही या समारंभासाठी आजचा दिवस का निवडला हेही कुतूहल असेल सगळ्यांना …. आईss तूच सांग ना त्याबद्दल जरा !! ” …. मुलीने आईकडे माईक सोपवला आणि खाली खुर्चीवर दादाच्या बाजूला येऊन बसली .

“ अगं काय तू ?? …. तुम्हाला कार्यक्रम करायला परवानगी काय दिली तर हा केवढाला मोठा घाट घातलात ? … मला अवघडल्यासारखं वाटतंय हे असं स्टेज वर वगैरे बसून … सवय नाही मला असली कधी!! ”
“ काय आई सगळी आपलीच तर माणसं आहेत .. तू बोल बिनधास्त .. नाहीतर कार्यक्रम तुझा आणि आमच्या बहिणाबाईच बोलत बसतील. हाहाहा !!” .. खुर्चीत बसलेल्या मुलाने आईसाठी जरा वातावरण हलकं फुलकं केलं.
“ हांss … हे बाकी बरोबर बोललास बघ .. हाहा !!” … आई पुढे बोलू लागली

“ खरं आहे मुलांचं .. आधी नव्हतेच मी तयार पण सगळ्यांनी आग्रह केल्यावर विचार केला की आजवर इतकी वर्ष मुलांना काय हवं नको ते बघण्यात , त्यांच्या आवडी निवडी जपण्यात घालवली मग हे ही करू त्यांच्या इच्छेसाठी. फक्त म्हंटलं करायचं असेल तर मग आजच्याच दिवशी करा. अनेक वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला घडलेला एक प्रसंग सांगते म्हणजे कळेल तुम्हाला सुद्धा. आज अगदी प्रकर्षाने आठवण येते बघा ह्यांची !!” . आई आता अगदी मनमोकाळेपणणे बोलत होती.

“ सगळ्यांना माहितीच आहे की हे अगदी अकस्मात गेले. पण ते जायच्या बरोबर आठ दिवस आधी आम्ही गाडीतून कुठेतरी जात होतो. एके ठिकाणी रस्ता असा काही होता की पुढे रस्ता मोकळा आहे वाटत असताना अचानक समोरून एक गाडी कुठून तरी प्रकट झाल्यासारखी वेगात आली आणि मी एकदम दचकून ओरडलेच. पण हे मात्र शांत. जसं काही त्यांना ती गाडी येणार हे आधीच माहिती होतं. मी घाबरलेले बघून ते म्हणाले
“ अगं .. गाडी चालवताना असं होतं बरेचदा. रस्त्यावरच्या अशा जागांना म्हणतात ब्लाइंड स्पॉट !”.
मी कुतुहलाने विचारलं .. ब्लाइंड स्पॉट ???? ते काय असतं ?”

“ अशी अनेक ठिकाणं असतात की जिथे आपल्याला समोरचं पूर्ण किंवा अजिबात दिसत नसतं. विशेषतः नागमोडी वळणावर, तीव्र चढावर वगैरे . पण त्या बिकट परिस्थितीत तुमच्या गाडी चालवण्याचा कस लागतो. दृष्य स्पष्ट नाही म्हणून तिथे थांबूनही चालत नाही. काळजी घेत, अंदाज बांधत पुढे जावंच लागतं. तरच इच्छित स्थळी पोचता येतं ना ? .. कधीकधी तर त्या अल्पावधीत सिक्स्थ सेन्स वगैरे सुद्धा वापरावा लागतो बरं का ss .. म्हणूनच बहुतेक त्याला ब्लाइंड स्पॉट म्हणत असावेत !!”

“ बाप रे !! .. एवढं सगळं असतं ?? .. चालू दे मग तुमचं.. मी गाणी ऐकते !!” … असं म्हणत ड्रायव्हिंग मधलं तत्वज्ञान आहे, आपला काही संबंध नाही म्हणून मी विषय संपवला.

नंतर आठवड्याभरातच हे अगदी अकस्मात गेले. सगळे दिवस वगैरे झाले आणि एक दिवस मी फार विवंचनेत होते. सगळं संपलं असं वाटायला लागलं. त्यांचं नोकरीत नुकतंच प्रमोशन झालं होतं त्यामुळे फार काही साठवलेलं नव्हतं. असलेलं किती दिवस पुरणार होतं ? . पदरात दोन लहान मुलं. त्यांचं शिक्षण, इतर गरजा , पुढे जाऊन त्यांची लग्न वगैरे .. सासू सासरे आमच्या लग्नाआधीच गेले होते त्यामुळे घरात सोबतीला सुद्धा कोणीच नाही.. माझी आई कायमची थोडीच राहणार होती. त्यात मुलांना वडिलांची उणीव भासू द्यायची नाही. कसं करणार होते मी सगळं या विचाराने पार खचून गेले होते. बाप रे !! .. आत्ता नुसतं आठवून सुद्धा काटा आला बघा अंगावर माझ्या !!”.

समोर ठेवलेल्या ग्लासातलं पाणी पिऊन आई पुढे बोलू लागली.

“ नुसता गर्द काळोख आहे समोर असं वाटायला लागलं. काही सुचेना. म्हणून शांतपणे डोळे मिटून बसले आणि अचानक नुकताच घडलेला आम्हा दोघांचा तो गाडीतला संवाद आठवला. असं वाटलं की माझी आत्ताची परिस्थिती अगदी तशीच आहे. त्या ब्लाइंड स्पॉट सारखी. ह्यांनी तेव्हा सांगितलेला शब्द न् शब्द मला आत्ता चपखल लागू होत होता. माझ्या आयुष्याच्या प्रवासातल्या रस्त्यावर आलेला हा ब्लाइंड स्पॉट. थांबू शकत नाही. पुढे जायचंच आहे. धीराने तोंड द्यायचं आहे. कदाचित पुढचा रस्ता खडतर असेल. कदाचित पुढेही असे ब्लाइंड स्पॉट येऊ शकतील. पण मुलांच्या संगोपनाचं ध्येय्य गाठायचंच आहे. या अशा सगळ्या विचारांनी अंगात एकदम नवचैतन्य संचारलं. मला या कठीण प्रसंगात उभारी मिळावी म्हणूनच बहुधा तो प्रसंग घडला असावा. हेच नियतीचे संकेत असावेत असं वाटलं. मी ताडकन डोळे उघडले. मनाने एकदम बदलून गेले होते मी. त्या ब्लाइंड स्पॉटवर मात करायला एकदम सज्ज !!“. …. आई एकदम स्तब्ध झाली

मुलगी उठली आणि म्हणाली

“ हो आई .. आम्ही बघितलेत ना तुझे कष्ट. तुझा त्याग. तू सुरुवातीला पापड-लोणची, खाद्यपदार्थ वगैरे केलंस. त्यात फार यश आलं नाही. पण तू डगमगली नाहीस. शिवणकाम सुरू केलंस. बाळांचे, लहान मुलांचे कपडे, हलव्याचे दागिने, फॅन्सी कापडी पिशव्या, रुखवताच्या गोष्टी. काय काय केलंस तू ?? गोधड्या, दुपटी रात्री रात्री जागून शिवल्यास. तू झोपेत आम्हाला कुरवाळायचीस ना तेव्हा तुझ्या हाताला पडलेले घट्टे जाणवायचे गं ss !! डोळ्यातून पाणी यायचं पण कधी दाखवलं नाही कारण आम्हाला त्रास होतोय असं वाटून तू कुरवाळणं थांबवशील म्हणून !! “… आज मात्र लेकीला अश्रु आवरले नाहीत.
तिला धीर देत दादा उभा राहिला.

“ आई … तू नंतर नंतर प्रदर्शनात स्टॉल लावायचीस. कधीकधी विचित्र अनुभव सुद्धा यायचे तुला. दिवसभर तिथे उभं राहून दमून भागून आलीस तरी रात्री आमचा अभ्यास घ्यायला एकदम फ्रेश. कमाल आहेस तूआई . मनावर दगड ठेवून नाईलाजाने काही जणांकडून कर्ज घेतली होतीस पण राब राब राबून थोड्या वर्षातच सगळी फेडलीस. आईची माया , शिस्त , कणखरपणा , संस्कार या सगळ्याचा ताळमेळ तू योग्य साधलास म्हणून आज आम्ही समाजात ताठ मानेनं उभे आहोत. अभिमान वाटतो आई आम्हाला तुझा. बरं हे सगळं आम्हाला माहिती असेलेलं. दिसत असलेलं हिमनगाचं टोक. त्या व्यतिरिक्त तू कितीतरी वादळांना तोंड दिलं असशील. तू आम्हाला कसलीच झळ पोचू दिली नाहीस. तुझ्या वाटेत आलेले ब्लाइंड स्पॉट आम्हाला कधी कळू दिले नाहीस !!”.

बोलता बोलता एव्हाना दोन्ही भावंडं आईच्या दोन्ही बाजूंना कधी जाऊन बसली ते समजलंच नाही. काहीसा औपचारिक समारंभ अचानकपणे घरगुती गप्पांसारखा झाला होता. आईचा आपल्या लेकरांशी प्रेमळ संवाद सुरू होता. त्यात गुंग झालेल्या उपस्थित नातेवाईकांना सुद्धा अगदी भरून आलं होतं. भावाबहिणीची मान लाडक्या आईच्या खांद्यांवर होती. आईचे हात दोघांच्या गालावर अलगद फिरत होते .. सोफ्याच्या मागच्या बाजूला जावई आणि सून आपापल्या लहान बाळांना घेऊन ते भावूक दृश्य पहात उभे होते. तेवढ्यात फोटोग्राफरच्या फ्लॅशनी व्यासपीठ एकदम प्रकाशमान झालं. कोणालाही काहीही सूचना न देतासुद्धा फोटोसाठी मिळालेली इतकी उत्तम आणि निरागस फ्रेम कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी फोटोग्राफर सोडेलच कशी? फोटोसाठी सगळ्यांचेच मोबाईल बाहेर आले.

त्या माऊलीचा ब्लाइंड स्पॉट पासून सुरू झालेला अंधःकारमय प्रवास आता आनंददायी अशा लखलख चंदेरी तेजाच्या दुनियेपर्यंत येऊन ठेपला होता.

— क्षितिज दाते , ठाणे

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..