आज सकाळी उठल्यावर का कोणास ठाऊक हे गाणं मनात आलं.(काल रात्री आशा, लता ,हृदयनाथ कार्यक्रम पाहून झोपल्याचा हा परिणाम असावा.) माझं अतिशय आवडतं गाणं!
१९७२ च्या भुसावळमध्ये अमरदीप टॉकीज ला प्रीमियर रिलीज झालेला हा चित्रपट (खरं तर युद्धपट!) सकाळी सहापासूनचे शो! धर्मेंद्र,राजेंद्र आणि माला सिन्हा ! अवचित हे गाणं भेटलं आणि भिडलं. ” जितनी सागर की गहराई , जितनी अंबर की उंचाई ” अशी प्रेमाची ग्वाही देणारं !
हमखास यू -ट्यूब वर शोधायला गेलो. एका ठिकाणी व्हिडिओ नॉट अव्हेलेबल ! दुसरीकडे फक्त लिरिक्स ! तिसऱ्या प्रयत्नाला गाणं मिळालं आणि डोळे मिटले. (आजकालची) भलतीच बेसुरी मंडळी ते गात होते. माझ्या कानांची क्वालिटी इतकी खराब झाली की काय म्हणून डोळे उघडले. मग कळलं हे लता -रफीचे आवाज नाहीत.
सगळीकडे भेसळ ! स्वतःची प्रत,लायकी न लक्षात घेता आजकाल जो तो गात सुटलाय आणि ते व्हिडीओ अपलोड करत सुटलाय. म्हणून माझ्या सर्चला १०६००० रिझल्ट्स मिळाले.
अरे बाबांनो, मूळ ते एकच गाणं आहे आमच्या कानात बसलेलं – ५० वर्षांपासून आणि ते तिथून हलायची सुतराम शक्यता नाही. ते फक्त गाणं नाही- कमलाकर आणि लिलू (लीलाधर) बरोबर जाऊन (घरच्यांच्या विनवण्या करून ) सकाळी सहाचा पाहिलेला मी पहिला आणि शेवटचा चित्रपट आहे तो !
“आज गा लो मुस्कुरालो, महफिले सजा लो ” हेही आमचं आवडतं गाणं आहे त्यात ! “आँखे ” (धर्मेंद्र आणि माला सिन्हा) ग्रेट की त्याचा समवयस्क “ललकार ” (तीच जोडी) ग्रेट यावर गल्लीत तावातावाने चर्चा झडल्यात आमच्यात!
बाकी सगळ्या “प्रती” – त्यांच्यात ते आठवणींचे सुगंध कोठून ?
एकदाचे मूळ गाणे सापडले आणि दोनदा ऐकल्यावर मन शांत झाले.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply