“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..!”
या ओळींचा आज महापूर येणार..आजचा मराठीचा ‘दिन’ केला की आपले कर्तव्य पार पाडले एवढीच त्यामागील भूमिका..
मराठीतून बोलणं मागासलेपणाचं लक्षण आहे असं आपण मराठी माणसांनीच ठरवून टाकलंय त्यामुळे, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ या ओळीला एक सुंदर ओळ या पलीकडे काहीच अर्थ उरत नाही. या ओळीत अर्थ भरणं सर्वस्वी आपल्या हातात आहे..निदान मोबाईल कंपन्या वा अन्य मार्केटींग कंपन्यांकडून येणाऱ्या फोनवर किंवा जिथे जिथं आपण पैसे खर्च करणार आहोत अशा हाॅटेल, माॅल/दुकान, रिक्शा/टॅक्सी, इंटेरीअर डिझायनर/काॅन्ट्रॅक्टर इत्यादीसारख्या अनेक ठिकाणी आपण कटाक्षाने फक्त आणि फक्त मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला तर समोरच्याला मोडकं तोडकं का होईना पण मराठीत बोलण्यावाचून पर्याय राहाणार नाही; आणि खरोखर जर का आपण हे करू शकलो तर मात्र, “बोलतो मराठी” ही ओळ सिद्ध होईल..ही एक छोटीशी सुरूवात करणे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ती जर आपण आजपासूनच केली तर पुढील वर्षी याच दिवशी आपण अभिमानाने म्हणू शकू की, “जाहलो खरेच धन्य ‘ऐकतो’ही मराठी..!”
मुलांशी आग्रहाने आपल्या भाषेत बोला. आपली भाषा आपली हजारो वर्षांची परंपरा, संस्कृती व (आपण मऱ्हाटी असल्यामुळे) आपला बाणा आपल्या शब्दांतून पुढच्या पिढीकडे नकळत पोचवत असते..आताच्या मुलांशी त्यांचे पालक आग्रहाने इंग्रजीतून बोलत असतात. परिणामी आपल्या भाषेतून पुढच्या पिढीकडे आपोआप संक्रमित होणारी आपली संस्कृती (व देशभर प्रखर म्हणून प्रसिद्ध असलेला तो ‘मऱ्हाटी बाणा’ही) आपणच मारत चाललोय..आपली नविन पिढी बिन-कण्याची होतेय त्यामागे हे देखील एक कारण आहे.
‘A’ अॅपल मधला व ‘B’ बॅट मधला हे कळण्यापेक्षा ‘अ’ आईतला आणि ‘ब’ बाबांमधला हे कळणं जास्तं महत्वाचे अाहे..! आपण वेळीच सावध न झाल्यास ‘मराठी दिना’ ऐवजी मराठीचे ‘दिवस करण्याची’ वेळ लवकरच येईल हे मात्र नक्की..!!
सर्व मराठी माणसांना मराठीचा ‘अभिमान’ अंगी वागवण्याची होण्याची बुद्धी लाभो या शुभेच्छा..!!
‘मराठी भाषा दिना’च्या आपणा सर्वांना शुभेच्छा..!!
जाता जाता-
लोकलमध्ये भांडताना मराठी माणूस नेहेमी इंग्रजीचा आधार घेताना दिसतो..खरंतर भांडण्यात तलवारीची धार असणारी मराठीइतकी धारदार भाषा अलम हिन्दुस्थानात दुसरी नसावी..मराठी माणसाने आतापर्यंत जे काही या देशात मिळवलंय ते भांडूनच (आठवा, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा) ..मराठ्यांना दिल्लीश्वर बिचकून असतात ते काय उगीच? अंगाला भाल्यासारख्या आरपार छेदून समोरच्याला गारद करणाऱ्या शिव्या मराठी व्यतिरिक्त केवळ पंजाबीत सापडतात (भांडणारे दोघेही मराठी असतील आणि मातृभाषेतून भांडत असतील तर मात्र कान बंद करून घ्यावेत)..असं असताना भांडणात परकीय भाषांचा आधार का घ्यावा हे कळत नाही..निदान भांडण, शिवी-गाळ तरी आपल्या भाषेतून करण्यास काय हरकत आहे..
–गणेश साळुंखे
9321811091
Leave a Reply