” शब्द हे तुम्हाला अज्ञात प्रदेशात नेणारे पूल बांधत असतात ” असे हिटलर त्याच्या भाषणांत नेहमी म्हणत असे. माझा एक वर्गमित्र ( ज्यांना वर्गमैत्रिणी नसतात त्यांना नाइलाजाने वर्गमित्र असतात. ज्याप्रमाणे ज्यांना सुंदर मेहुण्या नसतात त्यांना श्रावण न पाळणारे दोन भरभक्कम मेहुणे असतात त्याचप्रमाणे.) जवळपास दर सोमवारी दहा मिनिटांच्या पाणी पिण्याच्या सुट्टीत ( कारण मोठ्या मधल्या सुट्टीत तो वर्गमैत्रिणींबरोबर नंतर होणाऱ्या गाण्याच्या वर्गासाठी गाण्याचा रियाझ करीत असे.) तो मला सुट्टीच्या दिवशी पाहिलेल्या सिनेमाचा एखादा धारदार संवाद ऐकवीत असे. ‘ शनिवारी ( रीना रॉयफेम ) शत्रुघ्न सिन्हाचा ” विश्वनाथ ” पाहिला ‘ असे तो ( बाकावर उभे राहून ) बादशहाने सिंहासनावर बसून खाली दरबारात हात बांधून उभे असलेल्या ‘ पाचहजारी ‘ मनसबदारांकडे कनवाळूपणे पहावे तसे माझ्याकडे पहात मला सांगत असे. पुरावा म्हणून ” जली को आग कहते है , बुझी को राख कहते है , जिस राखसे बारुद बने उसे विश्वनाथ कहते है ” हा संवाद माझ्या तोंडावर फेकून व मी काही विचारायच्या आधीच ” खामोश ” असे ओरडून तो ( हिटलरच्या सांगण्याप्रमाणे ) मला ” विश्वनाथ ” च्या अज्ञात प्रदेशात सोडून स्वतः मात्र वर्गमैत्रिणींच्या ( ज्ञात ) प्रदेशात ताठ मानेने व गात्या गळ्याने जात असे.असो.
तुम्ही राजकपूर-नूतन आणि मोतीलालचा ‘ अनाडी ‘ नक्कीच बघितला असणार.( आणि चुकून राहिला असेल तर लगेच पहा.) त्यात एक सुरेख प्रसंग आहे. उद्योगपती मोतीलाल सवयीप्रमाणे संध्याकाळी हॉटेलमध्ये जात असताना,गाडीतून उतरताना अवधानाने त्याचे पैशाचे गलेलठ्ठ पाकीट रस्त्यावर पडते. भुरट्या चोरांच्या तावडीतून ते पाकीट सोडवून घेतलेला प्रामाणिक राज कपूर आपल्या फाटलेल्या कपड्यांनीशी पाकीट परत करण्यासाठी मोतीलालसमोर उभा रहातो. हॉटेलच्या मध्यभागी काही उच्चभ्रू जोडपी पाश्चात्य नृत्य करीत असतात. त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत मोतीलाल राज कपूरला विचारतो ” जानते हो , ये लोग कौन है ? ” राज कपूरचा अर्थातच नकार येतो. त्यावर मोतीलाल म्हणतो ” ये वह लोग है जिन्हे सडकोंपर बटवे मिले और जिन्होंने लौटाये नही !”
१९५९ साली पडद्यावर आलेल्या या संवादातून मोतीलाल माणसाच्या संधीसाधू व चंगळवादी प्रवृत्तीवर आणि पैसा हाच परमेश्वर मानणाऱ्या संपूर्ण समाजाच्याच बथ्थड व बोथट झालेल्या नैतिकतेवर एक चरचरीत आसूड ओढतो. समाजाला आरसा दाखविणारा हा संवाद मग एका सिनेमापूरताच मर्यादित रहात नाही आणि आज साठ वर्षांनंतर तर त्या आरशातले समाजप्रतिबिंब अधिकच विद्रुप आणि भेसूर झालेले दिसत आहे.
‘ मि. अँड मिसेस ५५’ मधे चित्रकार असलेल्या नायक गुरुदत्तची श्रीमंत आणि गरीबातली दरी दाखविणारी चित्रे पाहून हबकलेली ललिता पवार त्याला विचारते ” तुम कम्युनिस्ट हो ? ” आणि तो थंडपणे उत्तर देतो ” नही , कार्टुनिस्ट हू !” आणि प्रेक्षागृहात हास्याची एक मंद लकेर उठते. एक दीडदमडीचा टांगेवाला आपल्याला शर्यतीचे आव्हान देतो आहे हे सहन न झालेला जीवन दिलीपकुमारला ‘ नया दौर ‘ मधे डीवचतो ” बात मे पलटना मत ! ” तेव्हा शेपटीवर पाय पडलेल्या नागासारखा दिलीपकुमार फुत्कारतो ” अरे थूक देना उस मुहपे जो बात पे पलट जाय !”. आणि अन्यायाविरुद्ध लढायची दुर्दम्य इच्छा असूनही प्रत्येक वेळेस बाहेरच्या उजेडात दुर्दैवाने वळल्या न गेलेल्या मुठी थिएटरमधल्या काळोखात मात्र नकळत वळल्या जातात.
पण आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आपल्या कारकीर्दीचा भवसागर पोहून जाणाऱ्या जॉण्टी ऱ्होड्सप्रमाणे केवळ आपल्या संवादफेकीच्या शैलीच्या जोरावर आपली अभिनय कारकीर्द निभावून नेणाऱ्या संवादसम्राटाचे नाव आहे राजकुमार. सिनेमा वक्त. फटाकडी नायिका साधनाचे लग्न पुळचट सुनील दत्तबरोबर ठरल्याचे कळल्यावर संतापलेला राजकुमार ( राजकुमारच का , आमचा सुभाषकाका देखिल हे पाहिल्यावर वेडापिसा झाला होता ) घरातले काचेचे दिवे पिस्तूलाने फोडून आपल्या भावनांना वाट करुन देतो. इतक्यात भडकलेल्या आगीत तेल ओतण्यासाठी तिथे खलनायक रेहमान येतो आणि राजकुमारला कोरडी सहानुभूती दाखवितो.त्यावर राजकुमार त्याला सुनावतो ” चिनॉयसेठ , राजा के गम को किराये पे रोनेवालोंकी जरुरत नही !” आणि प्रेमभंगाच्या क्लेशदायक प्रसंगातून कधी ना कधी गेलेले समस्त पडदाप्रेमी शिट्या व टाळ्यांच्या गजरात राजकुमारला घाऊक सहानुभूती दर्शवितात.आणि सिनेमा सुपरहिट होतो. याच सिनेमातील ” जिनके अपने घर शिशेके हो वह दुसरोंपर पत्थर नही फेका करते !” हा संवाद तर कधी जाहिरातीच्या तर कधी विनोदाच्या आवरणाखाली गेली पंचावन्न वर्षे आमचा पाठलाग करतोच आहे की.
मात्र आजही EVM किंवा ( विरोधकांचा खूपच आग्रह असल्यास ) बॅलेट पेपरवरही मतदान घेतले तरीही आजवरचा सर्वात प्रेक्षकप्रिय संवाद म्हणून ,शशी कपूरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा, ‘ दीवार ‘ मधला ” मेरे पास माँ है !” हा निर्गुण , निराकार व निरुपद्रवी संवाद पहिल्याच फेरीत विजयी होईल याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही.
नंतर पडद्यावर अमिताभचा एकछत्री अंमल सुरु झाला आणि त्याच्या इमेजला साजेसे , संपूर्ण पडदा गिळंकृत करणारे प्रसंग आणि संवाद सहाजिकच लिहिले जाऊ लागले. ” मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता !” च्या काळात तर लोकं रेल्वे स्टेशनवरच्या बूटपॉलिशवाल्याला , उगीचच शोभा नको म्हणून, एक ट्रेन चुकवून का होईना पण हातात पैसे देऊ लागल्याचे मी स्वतः पाहिले आहे. माझ्या एका शामळूसदृश मित्राने खूप विचारांती आणि जवळजवळ दोन महिने लिफ्टच्या दरवाजात पाय टाकून तो अडवण्याचा आणि उघडण्याचा सराव करुन ,सोसायटीच्या लिफ्टमध्ये त्याच्या भावी पत्नीला प्रपोज करुन चकित केले होते. कारण एकच….” सुना है लिफ्ट के दिवारोंके कान नही होते !”.( माझा मित्र आता OTIS LIFTS मधे मेंटेनन्स मॅनेजर आहे.)
” मेरे जख्म जल्दी नही भरते मि. आर. के. गुप्ता “( त्रिशूल ), “आदमी ऐसा तो जिंदगी मे दोईच टाईम भागता है ,एक तो ऑलिम्पिक का रेस हो या फिर पुलिस का केस हो “( अमर अकबर अँथनी ) आणि ” हम जहाँ खडे होते है लाईन वहासे शूरु होती है !” ( कालिया ) हे व असे टाळीबाज संवाद अमिताभच्या तोंडून ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी तिकीटबारीवर दोन दोन किलोमीटरच्या रांगा लावल्या आणि निर्मात्यांच्या चार पिढ्यांचं कल्याण केलं.
सिनेमांतील संवादांचा विषय निघावा आणि नाना पाटेकरचे नाव येऊ नये म्हणजे दर्जेदार लेगस्पिन गोलंदाजांची चर्चा होत असताना शेन वाँर्नचा उल्लेख न करण्यासारखे आहे. फक्त एकच उदाहरण देतो. बघा पटते का ?साल १९९४. या एकाच वर्षी अंदाज अपना अपना ,१९४२ अ लव्ह स्टोरी आणि क्रांतिवीर हे तीनही सिनेमा थोड्याफार अंतराने प्रदर्शित झाले. विचार करा, राजकुमार संतोषी, आमीर खान, सलमान खान, करिष्मा कपूर आणि रविना टंडन ही नामावळी एका बाजूला आणि विधु विनोद चोप्रा,अनिल कपूर, मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ ( आणि आर. डी. बर्मन ) ही जबरदस्त टीम दुसऱ्या बाजूला. या दोन हेवी वेट संघांच्या मुकाबल्यात खरे तर ‘ बी ‘ ग्रेडचा दिग्दर्शक म्हणून हिणवल्या गेलेल्या मेहुलकुमारच्या ‘ क्रांतिवीर ‘ चा ( नाना पाटेकर, उताराला लागलेली डिंपल व परेश रावल ) खरे तर पार भुगाच व्हायचा. पण ट्रेड गाईडचे आकडे सांगतात की ‘ क्रांतिवीर ‘ धो धो बरसला आणि त्या महापुरात इतर दोन्ही सिनेमे कुठल्याकुठे वाहून गेले. माझ्या अल्पमतीप्रमाणे ‘ क्रांतिवीर ‘ चालण्यात त्यातल्या नानाच्या , ‘ अखबारवाली बाई ‘ डिंपलला उद्देशून म्हणालेल्या ” ….और तुम्हारे अखबारपर सुबह बच्चे * * * है ! ” या आणि अशाच इतर वास्तवदर्शी संवादांचा सिंहाचा वाटा होता.
” नापाक रोमन ! ” ( यहुदी ) अशी गोळीबंद आवाजात साद घालून ( साक्षात ) दिलीपकुमारची बोलती बंद करणाऱ्या सोहराब मोदींपासून ( त्यांचे सिनेमे ” ऐकण्यासाठी ” थिएटरवर अंध प्रेक्षक गर्दी करत अशी एक आख्यायिका सांगतात ) ते अतिशय नैसर्गिक संवादफेक करणाऱ्या आजच्या इरफान खान पर्यंतच्या कलाकारांनी करोडो सामान्य सिनेरसिकांच्या भावनांना शब्दरुप दिले. कित्येक भाबड्या प्रेमीजीवांच्या पंखांना गरुडबळ दिले आणि रिकाम्या ओंजळीने थिएटरमधे गेलेल्या लाखो प्रेक्षकांना प्रसंगी त्याच ओंजळीची वज्रमुठ करण्याची प्रेरणा देखील दिली.
” विश्वनाथ ” आणि ” कालिचरण ” चे संवाद जोशात ऐकवणारा माझा वर्गमित्र आता ‘डिजिटल मार्केटिंग’ मधला आंतरराष्ट्रीय तज्ञ समजला जातो.तेव्हा इतरांचे संवाद ऐकवणाऱ्या माझ्या मित्राशी ” संवाद ” साधण्यासाठी आता देशविदेशातील विद्यार्थी गोळा होतात. परवा असेच तो ‘ ऑनलाइन व्हिडिओ लेक्चर ‘ देऊन आल्याचे कळल्यावर मी त्याला फोन केला आणि आमच्यात अतिशय प्रेमळ संवाद झाला.
” कितने स्टुडंटस् थे ? “……मी.
” एकसो बीस थे सरदार “…तो.
“वो एकसो बीस और तुम सिर्फ एक , बहोत बेइन्साफी है ये , इसकी सजा मिलेगी , बराबर मिलेगी! “……….मी.
” मैने आपका बटाटा पोहा खाया है सरदार “……..तो.
” अब गाली खा “…..मी.
हिंदी सिनेमा आता पूर्वीसारखा इनोसंट राहिला नाही अशी भलेही अधूनमधून आवई उठत असेल पण आम्ही मात्र अजूनही तितकेच इनोसंट राहिलो त्यात या ” शोले ” मधल्या संवादाचा निश्चितच खारीचा वाटा असावा.
संदीप सामंत.
८ – ३ – २०२०
Leave a Reply