बोलिला वेद, मर्म ताडिले
ओळखूनी धर्म, कार्य घडिले
धूसर दिशा अंधुक झाली
लोभापायी राज्य पडिले!!
अर्थ–
पुराणात जे सांगितले, ते पूर्वीची लोकं जगली, त्या प्रमाणे त्यांनी आयुष्य घडवले, वैद्यकीय माहिती, व्यवसाय शिक्षण, शिवाय वेगवेगळ्या विषयांतील ज्ञान पुराणात शिकायला मिळते आणि त्याचा उपयोग आपल्या आधीच्या लोकांनी योग्य प्रकारे घेतला. त्याच बरोबर धर्म राखावा, यासाठी कार्य तसे घडावे लागते. तेव्हा नाईलाजाने प्रतिकार करणे आले. मग एकमेकांच्या पदरातले ओरबाडण्याचे दिवस आले. त्यातून युद्धे झाली, जीव गेले, रक्तपात झाला, राजनीती, रणनीती, युद्धनीती, कुटनीती, स्वराज्यनिती जन्माला आली.
पण जसजशी वर्षे लोटू लागली, माणसाचा प्रगतीच्या दिशेने वेगवान प्रवास सुरु झाला. मग जगण्याची दिशा, कारणं, पद्धत, सवय सारंच बदलून गेलं. पुराण अजूनही शाबूत आहे, धर्म आपलं स्थान टिकवून आहे पण प्रगतीच्या मार्गावर तेजीने घोडदौड करणाऱ्या या बुद्धिवान माणसाची जगण्याची नीती मात्र पूर्ण बदलून गेली आहे. इतिहास शिकवतोच परकीयांना थोपवण्या आधी स्वकीयांचा छुपा हल्ला जो परतवून लावेल तोच त्याचे राज्य टिकवू शकतो. नुकतेच महत्व प्राप्त झालेल्या पैशाने 20व्या शतकात केवळ पैशामुळे सत्ता पालटल्या गेल्या, आता तर पैशाशिवाय जगणं हे मृत्यु शी मैत्री करण्यासारखं आहे. तेव्हा नीती कोणतीही असो त्यात आपलं अस्तित्व तर लोप पावणार नाही ना याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply