बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२० रोजी इंदोर येथे झाला. त्यांचे वडील मिलमध्ये काम करत होते. त्यांची मिल बंद झाल्यावर ते कुटूंब मुंबईला आले. त्या कुटुंबामध्ये १५ जण होते. जमालुद्दीन काझी हे दुसरे मूल असल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी आली. त्यांचे शिक्षण सहावी पर्यंत झाले होते. त्यांनी अनेक प्रकारची कामे केली, नोकऱ्या केल्या .
एके दिवशी त्यांच्या वडिलांच्या ओळखीने बद्रुद्दीन काझी यांना मुंबईच्या ‘ बेस्ट ‘ च्या बस मध्ये कंडक्टरचे काम मिळाले. बद्रुद्दीन यांना अभिनयाची आवड असल्यामुळे बसमधील तिकिटे फाडता फाडता ते अनेक गमती करून लोकांचे मनोरंजन करत असत. एकदा त्या बसने सुप्रसिद्ध अभिनेते बलराज सहानी प्रवास करत होते . त्यांनी बद्रुद्दीन काझी यांचा विनोदीपणा , हावभाव पाहून त्यांना सुप्रसिद्ध अभिनेते , दिग्दर्शक गुरुदत्त यांच्याकडे जाण्यासाठी सुचवले. त्यावेळी बलराज सहानी स्क्रिप्ट लिहीत होते. गुरुदत्त यांनी बद्रुद्दीन काझी यांना दारुड्याचा अभिनय करावयाला सांगितला . त्यांनी तो इतका प्रभावीपणे केला की गुरुदत्त खुश झाले . त्यांनी बद्रुद्दीन काझी यांना त्यांच्या ‘ बाझी ‘ ह्या चित्रपटामध्ये काम दिले. त्या आधी बद्रुद्दीन काझी यांनी चित्रपटांमधून गर्दीत उभे राहण्याची एक्सट्रा म्हणून कामे केली होती. त्याबद्दल त्यांना ५ रुपये मिळत असत. गुरुदत्त यांनी बद्रुद्दीन काझी यांचे नाव बदलून ‘ जॉनी वॉकर ‘ असे ठेवले आणि ते याच नावाने पुढे मशहूर झाले. गुरुदत्त यांनी त्यांच्यासाठी चित्रपटांमधून प्रसंग लिहिले. ते एकदा कोलकत्याला असताना त्यांना एक तेल मालिशवाला दिसला . गुरुदत्त यांनी जॉनी वॉकर यांना सांगितले याचे निरीक्षण नीट कर. पुढे एस.डी .बर्मन आणि , महंमद रफी यांनी सुप्रसिद्ध गाणे केले ते जॉनी वॉकर यांच्यावर चित्रित झाले . ते गाणे होते ‘ चंपी तेल मालिश…सर जो तेरा चकरा जाए ‘ . गुरुदत्त , महंमद रफी , ओ . पी . नय्यर यांनी जॉनी वॉकर यांच्यासाठी अनेक गाणी केली. त्याआधी गाणी बहुतेक नायक आणि नायिकेसाठी केली जात असत. गुरुदत्त यांचे अकाली निधन झाल्यामुळे जॉनी वॉकर व्यथित झाले परंतु त्यांना शम्मीकपूर आणि दिलीपकुमार यांनी धीर दिला.
जॉनी वॉकर स्वतःच्या विनोदी भूमिकांबद्दल म्हणत असत माझी ‘ क्लीन कॉमेडी ‘ होती . सुमारे ३०० चित्रपटांमधून भूमिका केल्या परंतु एकदाही ‘ सेन्सॉर ‘ चा वापर करावा लागला नाही. परंतु ज्यावेळेपासून डबल मिनींग विनोद सुरु झाले आणि तेव्हा त्यांनी चित्रपटांमधून काम करणे कमी केले. ते म्हणतात उगाच माझे नाव खराब कशाला करू कारण त्यांनी विनोदाला एका उंचीवर नेले. ते म्हणतात मला सर्व काही मिळाले. अथक प्रयत्न त्यांनी सुरवातीला केले. १९६६ मध्ये त्यांनी ठरवले की त्यांना ‘ अन्न , झोप आणि स्वतःचे कुटूंब ‘ महत्वाचे वाटते आणि सगळे काही त्यांना मिळालेले होते त्यामुळे त्यांनी जास्त काम करणे , रविवारी काम करणे बंद केले . ते त्यांचा वेळ कुटूंबासाठी देऊ लागले. त्यावेळी ते टॉपला होते. त्यांना एकाने प्रश्न केला आता तुम्ही काम करणे बंद केले , कसे वाटते तेव्हा त्यांनी शेर्पा तेनसिंग यांचे उदाहरण दिले. तेनसिंग एव्हरेस्ट चढले नंतर परत खाली आले तेथेच ते चिकटून राहिले नाही तसेच जॉनी वॉकर यांचे होते , त्यांना खूप प्रसिद्धी , पैसा , सन्मान मिळाला आता ते शांतपणे इतरांची कामे बघत असत , कुटंबात रमत असत.
जॉनीभाई म्हणतात विनोदी नटासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे उत्तम स्क्रिप्ट लेखक दुसरे म्हणजे टायमिंग आणि तिसरे म्हणजे कलाकार कसा स्वतःच्या बुद्धिमतेनुसारं इम्पप्रूव्ह होतो हे आवश्यक असते आणि त्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची असते, तिच्यावर ताबा असणे आवश्यक असते. त्यांच्या दृष्टीने त्यांना अब्रार अल्वी यांच्याकडे काम करताना मजा येत असे.
जॉनीभाई यांच्या अनेक जुन्या चित्रपटांची नावे सर्वानाच माहीत आहेत त्यामध्ये बाजी, जाल, लाल परी , आरपार , टॅक्सी ड्राईव्हर , नया दौर , देवदास , सी. आय. डी . गुलाम बेगम बादशहा , प्यासा , मधुमती, काला पानी , मि . कार्टून , मेरे मेहेबूब , चोरी चोरी , छू मंतर , मिस्टर जॉनी वॉकर , लाईट हाऊस , मिस्टर अँड मिसेस ५५ , कागज के फूल अशा अनेक चित्रपटांची नावे देता येतील. त्यांचे आनंद चित्रपटामधील काम कोणीच विसरू शकणार नाही. त्याचप्रमाणे १९७५ मध्ये धर्मेन्द्रबरोबर ‘ प्रतिज्ञा ‘ चित्रपटामधील काम इतके भन्नाट आहे की कोणीही विसरू शकणार नाही. त्यात धर्मेंद्र , जगदीप , केश्तो मुखर्जी आणि जॉनी वॉकर यांचे टायमिंग इतके अफाट आहे की कदाचित एखाद्या चित्रपटामध्ये तसे आढळेल. तर त्यांचे ‘ आनंद ‘ चित्रपटामधील काम कोणीही विसरू शकणार नाही.
१९९१ नंतर त्यांनी चित्रपटामध्ये काम करणे सोडूनच दिले परंतु १९९७ साली आलेल्या चाची ४२० या चित्रपटामध्ये त्यांनी कमल हसन बरोबर काम केले ते त्यांचे मित्र कवी गुलजार यांच्या सांगण्यावरून . चाची ४२० रिलीज झाल्यावर मी जॉनी वॉकरच्या ‘ नूर व्हिला ‘ मध्ये गेलो होतो तिथल्याच एका मित्राबरोबर , नेमका मला खाली त्यांचा भाऊ टोनी वॉकर दिसला. अगदी त्यांच्यासारखाच दिसत होता , माझ्या नजरेवरून मी गंडलो हे टोनी वॉकरच्या लक्षात आले . तेव्हा तो म्हणाला अरे मै टोनी हू , जॉनी उपर है , तितक्यात जॉनी वॉकर बाहेर जाण्यासाठी जिना उतरत होते तेथेच मी त्यांची स्वाक्षरी घेतली , फोटो काढले.
जॉनी वॉकरने नूरजहाँ ह्या अभिनेत्रेशी लग्न केले होते . ही नूरजहाँ म्हणजे गायिका , अभिनेत्री जी पाकिस्तानमध्ये गेली ती नूरजहाँ नव्हे . नूरजहाँची बहीण शकीला ही पण अभिनेत्री होती , तिचे आता नुकतेच निधन झाले.
जॉनी वॉकर यांना मधुमती या चित्रपटासाठी आणि शिकार या चित्रपटासाठी दोन फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले.
विनोदाची उत्तम जाण असलेला आणि स्वतःला समाधानी मानणाऱ्या विनोदाच्या बादशहाचे २९ जानेवारी २००३ रोजी ८२ व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झाले.
सतीश चाफेकर.
Leave a Reply