एन. चंद्रा हे मुळचे गोव्याचे, एन.चंद्रा यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर नार्वेकर, रोजगारासाठी एन.चंद्रा यांचे वडील मुंबईत गेले व तिथेच स्थायिक झाले.
एन चंद्रा हे मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९५२ रोजी झाला.एन चंद्रा यांची आई बृहन्मुंबई महानगरपालिकेत क्लार्क तर वडील फिल्म सेंटर लॅबमधील ब्लॅक अँड व्हाइट डिपार्टमेंटचे प्रमुख. आईला प्रवासाची अत्यंत आवड. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी सायन्स साइडला कॉलेजात प्रवेश घेतला व नंतर वडिलांच्या मदतीने फिल्म सेंटर लॅबमध्ये त्या काळातील प्रसिद्ध चित्रपट संकलक वामन भोसले व गुरुदत्त यांचा सहाय्यक म्हणून संकलन डिपार्टमेंटमध्ये नोकरी केली. त्यादरम्यान वामन भोसले ‘मेरे अपने’ या गुलजार दिग्दर्शित चित्रपटाचं संकलन करीत होते व एन चंद्रा त्यांना सहाय्य करीत होते.
एडिटिंगच्या काळात बऱ्याचदा गुलजार साहेब लॅबमध्ये येत असत. ‘मेरे अपने’चं एक शेडय़ुल सुरू होतं तेव्हाचा हा प्रसंग. शॉटची सर्व तयारी झाली. गुलजारनी ‘स्टार्ट साऊण्ड’ असं म्हटलं परंतु शॉट सुरू होण्यापूर्वी क्लॅप द्यावा लागतो तो क्लॅपर बॉयने दिलाच नाही. ‘अरे, क्लॅपर बॉय कुठे आहे?’ अशी सेटवर शोधा शोध सुरू झाली. तर क्लॅपर बॉय सेटवर नव्हता व क्लॅपही नव्हता. काही क्षणांतच कळलं की क्लॅपर बॉय स्टुडिओच्या कँटीनमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट मुलीशी गप्पा मारत बसला आहे. बस्स्, हे कळल्यावर गुलजार यांच्या रागाचा पारा इतका चढला की त्यांनी त्याच क्षणी क्लॅपर बॉयची हकालपट्टी केली. ही गोष्ट ‘फिल्म सेंटर’मध्ये एन चंद्रा यांच्या कानावर आल्यावर त्यांनी गुलजार यांना क्लॅपर बॉय म्हणून काम करण्याबाबत विचारायचं ठरवलं. व ते गुलजार यांना क्लॅपर बॉयचे काम करू लागले.
‘मेरे अपने’नंतर गुलजार यांनी ‘परिचय’ हा चित्रपट सुरू केला. त्यात एन चंद्रा यांनी गुलजार यांचे असिस्टंट म्हणून काम केले. नंतर एन चंद्रा यांनी १०-११ वर्षे गुलजार यांच्या बरोबर ‘आंधी’, ‘कोशिश’, ‘खुशबू’, ‘मौसम’, ‘किनारा’, ‘किताब’, ‘नमकीन’, आदी चित्रपट केले.
एन. चंद्रा यांनी चित्रपटसृष्टीत संकलक, दिग्दर्शक, निर्माता, कथा व पटकथा लेखक अशा विविधांगी भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांचे सामाजिक, राजकीय निरीक्षण सूक्ष्म असून ते परिणामकारकरित्या कथा, पटकथेत गुंफतात. त्यामुळे त्यांचे सुरवातीचे प्रतिघात, अंकुश, तेजाब हे चित्रपट आजही अपील होतात.
एन चंद्रांची खरी ओळख म्हणजे ‘अंकुश’ हा चित्रपट. वर्तमानकालिन सामाजिक परिस्थितीचा योग्य वापर करून त्याचा कुशल उपयोग चंद्रांनी चित्रपटात केला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
एन. चंद्रा यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
प्रतिघात, अंकुश, तेजाब, नरसिंहा, तेजस्विनी, युगांधर, हमला, बेकाबू, वजूद, स्टाईल, एक्सक्यूज मी, शिकारी, कगार-लाईफ ऑन द एज
Chandrashekhar Narvekar, N. Chandra
Leave a Reply