सुमारे तीन दशके आपली रोमँटिक गाणी देणारे हिंदी चित्रपट गीतकार लालजी पांडेय उर्फ अंजान यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३० वाराणसी येथे झाला. अंजान गंगेकाठच्या वाराणसीतच लहानाचे मोठे झाले. गंगेच्या घाटावर फिरताना त्यांच्या काव्यप्रतिभेला एक आगळी खोली लाभली. त्यातूनच पुढे आला एक प्रतिभावंत गीतकार. आपल्या अद्वितीय गीतरचनांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
अंजान यांना लहानपणांपासूनच हिंदी भाषेची प्रचंड आवड. त्या गोडीतूनच उर्दू साहित्याचा अभ्यास त्यांनी केला. त्यांच्या काव्यप्रतिभेला नवा आयाम मिळाला. प्रेमनाथ त्या वेळी फार्मात होता. त्याने आपल्या एका चित्रपटासाठी अंजान यांची निवड केली. १९५३ मध्ये पडद्यावर झळकलेला ‘प्रिझनर ऑफ गोवळकोंडा’ हा तो चित्रपट. यातील शहिदों अमर है तुम्हारी कहानी आणि लहर ये डोले कोयल बोले ही दोन गीते अंजान यांनी लिहिली. त्यानंतर अंजान यांनी ब-याच छोट्या चित्रपटांसाठी गीतलेखन केले. जी. एस. कोहली या संगीतकाराबरोबर त्यांचे सूर त्या काळात जुळले. प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित ‘गोदान’ चित्रपटासाठी पंडित रवी शंकर यांच्या संगीताने नटलेली अंजान यांची गाणी विशेष गाजली. ओ. पी. नय्यर यांच्या संगीताने सजलेले अब के हसीन रुख पे (बहारे फिर आएंगी) हे त्या काळी गाजलेले गाणेही अंजान यांचेच. त्यानंतर कल्याणजी-आनंदजी या संगीतकारांबरोबर त्यांची वेव्हलेंथ जुळली. मग मात्र अंजान यांनी मागे वळून पाहिले नाही. दिग्दर्शक प्रकाश मेहरा, संगीतकार कल्याणजी आनंदजी, गीतकार अंजान एकत्र आले आणि हिंदी सिनेमात इतिहास रचला. खून पसीना, हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, नमक हलाल, शराबी ही काही उदाहरणे. चंद्रा बारोटच्या डॉनची गाणीही अंजान यांचीच. कल्याणजी-आनंदजी यांचे संगीत, अंजान यांची गीते आणि पडद्यावर अमिताभ या सूत्राने मग रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले.पग घुंगरू बांध मीरा नाची थी (नमक हलाल ) खई के पान बनारस वाला ( डॉन), मुझे नौलक्खा मंगा दे रे (शराबी),लुक छिपके लुक छिप जाओ ना (दो अंजाने), बरसो पुराना ये याराना (हेराफेरी), खून पसीने की खायेंगे, बनी रहे जोडी राजा रानी की (खून पसीना), रोते हुअेु आते है सब, ओ साथी रे, दिल तो है दिल, प्यार जिंदगी है (मुकद्दर का सिकंदर), जिसका मुझे था इंतजार, कब के बिछडे हुअे( हम आज (लावारिस) ही याची काही उदाहरणे.
गंगा नदी आणि भोजपुरी भाषा यांचा वापर अंजान यांनी अनेक गाण्यांतून केला. उपमांचा समर्पक वापर हे अंजान यांच्या लेखणीचे आगळे वैशिष्ट्य. अंजान एका गीतात म्हणतात, तुझ बीन जोगन मेरी राते, तुझ बिन मेरे दिन बंजारे, मेरा जीवन जलती धूनी, बुझे बुझे सपने सारे, तेरे बिना मेरी मेरे बिना तेरी ये जिंदगी जिंदगी ना… यातल्या उपमा किती समर्पक आहेत पाहा, त्याच्या विरहाची तीव्रता जलती धुनीमधून ऐकणा-यांचेही काळीज पिळवटणारी आहे, त्यात पुन्हा किशोरचा खर्जातला आवाज अंजान यांच्या शब्दाला गहिरे भाव देतो.
एकीकडे असे काळजाला भिडणारे शब्द तर दुसरीकडे यशोदा का नंदलाला(संजोग)मधले वात्सल्य अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारे आहे. हीच तर अंजानच्या शब्दांची जादू आहे. सलाम ए इश्क (मुकद्दर का सिकंदर)मधला प्रेमभाव असो, की छू कर मेरे मन को (याराना)मधली प्रेमळ झुळूक; अंजानची गाणी कायम मनात रुंजी घालत राहतात. कहना ही क्या ये नैन एक अंजान से मिले(बॉम्बे)मधली ओढ दिल तो है दिल(मुकद्दर का सिकंदर)मध्ये अधिकच गहिरी होते. जिधर देखूँ तेरी तस्वीर नजर आती है(महान)मधले नैराश्य, इंतेहा हो गयी इंतजार की (शराबी) विरहाची परिसीमा गाठते, तेव्हा अंजानच्या शब्दाने त्यातील गोडी अधिकच श्रवणीय होते. अमिताभच्या कारकिर्दीत त्यांच्या गाण्यांचा वाटा खूप मोठा आहे. ही बहुतेक गाणी अंजान यांची आहेत. ‘गंगा तट का बंजारा’ या अंजान यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही अमिताभ यांच्या हस्ते १९९७ मध्ये झाले.
आजचे प्रसिद्ध गीतकार समीर हे अंजान यांचे चिरंजीव. त्यांचा गीतलेखनाचा वारसा पुढे चालवताहेत.
अंजान यांचे निधन १३ सप्टेंबर १९९७ रोजी झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply