संगीतकार चित्रगुप्त यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला.
चित्रगुप्त यांचे संपूर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव. त्यांनी एम. ए. (इकॉनॉमिक्स) ही पदवी घेऊन काही काळ प्राध्यापक म्हणून देखील काम केले. त्यांना संगीत व काव्य या क्षेत्रात रुची असल्यामुळे ते नशीब आजमाविण्यासाठी मुंबईत आले व अतिशय कष्ट करून एस. एन. त्रिपाठी यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम केले. खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द भाभी ह्य़ा चित्रपटापासून सुरू झाली.
चित्रगुप्त यांनी एकूण ८२८ गाणी केली. चित्रगुप्त यांनी प्रेमधवन, मजरुह सुलतानपुरी, साहिर, राजेंद्र कृष्ण व आनंद बक्षी इ. गीतकारांकडून गाणी लिहून घेतली. महमंद रफी व लता मंगेशकर यांच्या आवाजाचा टोन चित्रगुप्तांनी बरोबर वापरला व या कलाकारांची गाणी त्यामुळे अतिशय सुरेल वाटली.
एव्हीएम या दक्षिणेकडच्या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. लता मंगेशकर, महमंद रफी, आशा भोसले, तलत मेहमूद, मुकेश तसंच मन्नाडे इत्यादी गायकांच्या माध्यमातून त्यांनी सुरेल गाणी दिली. परंतु त्यांच्या वाटय़ाला सगळेच ‘बी’ ग्रेड सिनेमे आले. एकाही मोठय़ा हीरोचा चित्रपट (दिलीप, देव, राज कपूर) त्यांना मिळाला नाही. संगीत चांगले असूनसुद्धा त्यांना पाहिजे तेवढा सन्मान मिळाला नाही. परंतु एकटय़ा चित्रगुप्तांनी आपल्या संगीताच्या जोरावर ‘बी’ ग्रेड सिनेमांना तारून नेले. ‘बी’ ग्रेड सिनेमाचे निर्माते चित्रगुप्त यांच्या संगीतावर अतिशय खूश असत. कारण अशा चित्रपटांमध्ये चांगली गाणी असल्यामुळे ते चित्रपट यशस्वी होत असत.
भारत भूषण, चंद्रशेखर, अजित, सुनील दत्त, राजेंद्रकुमार हे त्यांच्या चित्रपटाचे नायक होते. तर कुमकुम, फरियाल, शकिला, श्यामा, माला सिन्हा, नंदा, मीनाकुमारी या नायिका होत्या. खऱ्या अर्थाने १९५७-१९६७ हे दशक चित्रपट संगीताच्या दृष्टीने भरभराटीचे होते. चित्रपट जरी चालले नसले तरी चित्रपटातील गाणी ही सतत रेडिओवर वाजत असत व लोकप्रिय होत असत.
१४ जानेवारी १९९१ रोजी चित्रगुप्त यांचे निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
चित्रगुप्त यांची गाणी
Leave a Reply