नवीन लेखन...

बोंगो, ढोलकी आणि मी

माझ्या वडिलांना तबल्याची आवड होती.तरुणपणी त्यांना ते वाजवायला शिकता नाही आले.उस्ताद थिरकवा हे त्यांचे आवडते होते. रेडिओवरील शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ते ऐकत असत.मी लहान असताना मला त्याची गोडी वाटत नव्हती.मी त्यांना मराठी किंवा हिंदी गाण्यांचे कार्यक्रम लावायला सांगायचो. परंतु त्यानिमित्ताने माझ्या कानावर शास्त्रीय संगीत पडत होते.माझा मोठा भाऊ शरद हा 80 च्या दशकात जे.जे.स्कूल्स ऑफ आर्टला होता.जेजेच्या वार्षिक प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यावेळी शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचें आयोजन केले जात असत. उस्ताद अब्दुल हलीम जाफरखां आणि पंडित कुमार गंधर्व यांच्या मैफिली जेजे मध्ये ऐकायला वडील मला घेऊन गेल्याचे आठवतं.नंतरच्या काळात मैफिली ऐकण हा माझा कायम स्वरुपी छंद झाला आहे.भारतातील जवळ जवळ सर्वच महान कलाकारांच्या मैफिली व त्यांचे ग्रीनरूम मधील रियाझ ऐकण्याची संधी मला मिळाली आहे‌.उदा.पं.रवि शंकर,पं.कुमारगंधर्व, पं‌.भीमसेन जोशी, गानसरस्वती किशोरी आमोणकर, उ.अल्लारखा,उस्ताद बिस्मिल्ला खाँ,उ.अली अकबर खान,पं.हरिप्रसाद चौरसिया,पं.जसराज पं.शिवकुमार शर्मा,उ.झाकीर हुसेन,उ.अमजद आली खाँ इत्यादी.

माझा मावस भाऊ राम जामगावकर हे सुप्रसिद्ध ढोलकीपटू होते.त्याला बघून मला ही ढोलकी वाजवण्याची आवड निर्माण झाली होती.आणि त्याचा श्रीगणेशा शाळेत बाक वाजवण्यापासून झाला होता. आपसूकच माझी बोटे उपजतपणे बाकावर लीलया फिरू लागली होती.बापूराव जगताप मार्ग भायखळा येथील मुनिसिपल शाळेतील शिक्षक बेल्हे गुरुजी मला बाकावर ठेका धरायचा आग्रह करीत असत. नंतर मला बोंगो हे वाद्य आवडू लागले. बाबा मला रोज १०/१५ पैसे द्यायचे. ते साठवून तीस रुपयाला सेकंड हॅण्ड बोंगो एका मित्राच्या भावाकडून हप्त्याने विकत घेतला होता. रेडिओ वरची गाणी ऐकत मी सराव करीत होतो.आमच्या चाळीतील सतीश ढवळे हा उत्तम ढोलकी वाजवत होता आणि तो एका कोळी गीतांच्या कार्यक्रमात ढोलकी वाजवत असे.तो मला त्याच्या बरोबर बोंगो वाजवायला घेऊन जात असे.

प्राथमिक शाळेतून मी माध्यमिक शाळा युनियन हायस्कूल, खेतवाडी येथे दाखल झालो.बेर्डे बंधू याच शाळेतील विद्यार्थी.आठवीत माझ्या वर्गात गिरीश आचरेकर होता.तो आणि त्याच्या भावाला संगीताचे वेड होते.गिरीश गिटार शिकला होता आणि त्याचा भाऊ अकॉर्डियन वाजवत होता.मी गाणी ऐकूनच बोंगो आणि ढोलकी वाजवायला शिकलो होतो. होतो अघुनमघून मी नवव्या गल्लीतील त्याच्या घरी जात असे.त्याच्या घरी अकॉर्डियन, गिटार, बाँगो वगैरे वाद्ये होती. शाळेला दांडी मारुन आम्ही घरी प्राक्टीस करीत असू. काही दिवसांनंतर मित्राच्या भावाने ऑर्केस्ट्रा आणि रेकॉर्ड डान्स पार्टी काढण्याचा प्रस्ताव मांडला.त्याचे घर मोठे होते आणि रिहर्सलचा करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. गिरीशच्या भावाचे दोनतीन मित्र होते ते गायक व डान्सर होते‌.तेही आमच्या पार्टी मध्ये सामील झाले.आमच्या पार्टीचा एकमेव कार्यक्रम बेलासिस रोड येथील एका चाळीत सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त झाला होता. अभ्यासावर त्याचा परिणाम झालाच.

मी व गिरीश आठवीत नापास झालो होतो. त्याचा परिणाम…. माझ्या आईने माझा बोंगो वरवंट्याने तोडून टाकला.”दिलं का खिलौना हाय टूट गया” हे गाणं अनुभवलं.

युनियन हायस्कूल ही फार कडक शिस्तीची शाळा होती, म्हणून मी मराठा मंदिर ठाकूरद्वार हायस्कूल येथे दाखल झालो.तिकडे माझे दुसरे वेड म्हणजे क्रिकेट यालाही प्रोत्साहन मिळाले.माझी शाळेच्या टीम मध्ये निवड झाली आणि हॅरिस शिल्ड ्मध्ये खेळायची संधी मला मिळाली.

आठवी पास होऊन नववीत दाखल झालो. हुश्य….
आणि पुन्हा माझ्या संगीताच्या वेडाला चालना देणारी एक घटना घडली.ती अशी –
आमच्या शाळेने कुमार कला केंद्रा तर्फे होणाऱ्या एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता.
१९७३/७४ चा काळ होता. त्यासुमारास महाराष्ट्रात भयाण दुष्काळ पडला होता. त्याच आशयाची एक गोष्ट त्यात मांडली होती. त्या एकांकिकेची निवड केली होती आमच्या शाळेचे कल्पक शिक्षक राजगुरू सर यांनी.त्यात संगीतालाही वाव होता.शाळेतून विचारणा करण्यात आली कोणाला ढोलकी किंवा बोंगो वाजवता येत असेल तर त्यांनी सरांशी संपर्क साधा‌‌.सर मला चांगले ओळखत होते. मी त्यांना जाऊन भेटलो.मी एकमेव होतो.सर खुष झाले.एकांकिकेच्या तालमी सुरू झाल्या.

प्राश्वसंगीतासाठी एका व्हायोलिन वादकाला बोलावले होते.ऐकांकिकेत दोन उंदराची पात्रे होती.भयाण पडलेल्या दुष्काळात ते इकडे तिकडे फिरत धान्याच्या कोठारात कसा धुडगूस घालत असतात आणि धान्याची कशी नासघूस करतात,असे काही प्रसंग त्यात होते.
त्यावर उंदराच्या पळण्याची एक विशिष्ट लकब सरांनी बसवली होती.त्यावर ठेका वाजव असे मला सरांनी सांगितले.मी दोन तीन ठेके माझ्या कल्पनेप्रमाणे वाजवून दाखवले.ते सरांनी व व्हायोलिन वादकांनी ओके केले.त्यांना ढोलकीवर ही काही ठेके वाजवून दाखवले.त्यांनी मला ढोलकी कुठे शिकता असे विचारले.मी त्यांना म्हणालो – मी कुणाकडे शिकलो नाही,माझा मावस भाऊ प्रसिद्ध ढोलकी वादक आहे, त्याला बघून मी प्रयत्न करतो.(हे रामदादाला सांगायचे धाडस कधीच झाले नाही.) तसेच गाणी ऐकत शिकतो.ते मला म्हणाले तबला शिक. परंतु घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे ते राहूनच गेले.

साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे ती स्पर्धा होती.1973/74 चा तो काळ होता. आमच्या शाळेची एकांकिका स्पर्धेत सादर झाली.दुसऱ्या दिवशी त्याचे परीक्षण लोकसत्तेमध्ये आले होते…

एकांकिकेचा विषय हा स्पर्धेत सादर झालेल्या सर्व ऐकांकिकेत उजवा होता.पात्रांचे संवाद पाठ नव्हते,त्यामुळे त्यांना पहिले बक्षीस मिळाले नाही, परंतु त्यातील उंदराच्या पात्राच्या पळण्याच्या विशिष्ट लकबीने आणि त्यावर वाजवलेल्या ठेक्याने नाट्यगृहात सर्वांनी टाळ्या वाजवत धमाल उडवून दिली होती.

– रविंद्र दामोदर पाबरेकर

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..