आपल्याकडे ज्यूंचे मन आहे, आपल्याकडे ज्यूंची बुद्धिमत्ता आहे आणि आपल्याकडे त्यांची विनोदाची शैलीही आहे, असे स्वतःचे वर्णन करणारे हॉवर्ड जेकबसन हे २०१०चे बुकर पारितोषिकाचे विजेते आहेत. यापूर्वी दोनवेळा ते या पारितोषिकाच्या जवळ आले होते, पण त्यांचे पुस्तक निवडले गेले नाही. ‘द फिंक्लर क्वेश्चन’ या कादंबरीला २०१०चे बुकर पारितोषिक जाहीर करण्यात आले. त्यांचे पारितोषिक कदाचित हुकले असते, पण ते त्यांना ३ विरुद्ध २ मतांनी जाहीर झाले. याआधी २००६ मध्ये ‘कलुकी नाईट्स’ आणि २००२ मध्ये ‘हूज सॉरी नाऊ?’ या कादंबऱ्यांना ते कदाचित मिळाले असते.
त्यांना हे पारितोषिक मिळत असल्याने ते विल्यम गोल्डिंग यांच्यानंतरचे ज्येष्ठ कादंबरीकार म्हटले पाहिजेत. गोल्डिंग यांना ते मिळाले तेव्हा ते ६९ वर्षांचे होते तर जेकबसन यांचे वय ६८ वर्षांचे आहे. जगभरच्या साहित्यिक वर्तुळामध्ये ५० हजार पौंडांच्या या पारितोषिकाला प्रचंड मान दिला जातो. जेकबसन हे इंग्लंडमध्येच शिकले आणि वाढले. तसे ते मूळचे मँचेस्टरचे. व्हिटफिल्डच्या स्टँड इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले.
त्यानंतर ते केंब्रिजच्या डाऊनिंग कॉलेजमधून इंग्रजी विषयात पदवीधर झाले. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीमध्ये ते प्राध्यापक या नात्याने तीन वर्षे होते. तिथल्या त्या रहिवासाच्या आधाराने त्यांनी १९८७ मध्ये ‘द लँड ऑफ ऑस्ट्रेलिया’ हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक लिहिले होते. आपले स्वतःचे वर्णने ते ‘ज्यूंचा जेन ऑस्टेन’ असे करतात. प्रख्यात कादंबरीकार जेन ऑस्टेन अठराव्या शतकात होऊन गेल्या. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांमध्ये ‘सेन्स अँड सेन्सिबिलीटी’ तसेच ‘प्राईड अँड प्रेज्युडिस’ या कादंबऱ्यांचा समावेश होतो. काही टीकाकारांकडून त्यांना इंग्रजीचे ‘फिलिप रॉथ’ असे म्हटले जात असल्याने त्यावर आपले स्वतःचे वर्णन त्यांनी जेन ऑस्टेन असे केले असायची शक्यता आहे. पाच हजार वर्षांच्या काळात ज्यूंच्या वाट्याला आलेल्या हृदयद्रावक अनुभवांमुळे आपल्याला ज्यूंविषयी जिव्हाळा वाटतो असे सांगायलाही ते कमी करत नाहीत. १९९८ पासून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये प्रामुख्याने सुखान्ताचा कल्पनातीत शोध घेण्यात आला आहे. त्यांचे लिखाण हे सरळ मार्गी म्हणून ओळखण्यात येते. स्त्री-पुरुष संबंध आणि इंग्लंडमध्ये ज्यूंना विसाव्या शतकात आलेले अनुभव असा त्यांच्या लिखाणाचा हा प्रवास आहे.
ते अतिशय ओघवत्या भाषेत विनोदी पद्धतीने लिहिणारे लेखक म्हणूनही परिचयाचे आहेत. ‘द फ्लिंकर क्वेश्चन’ या कादंबरीची मांडणीही त्यांनी अतिशय विनोदी पद्धतीने केलेली आहे. आजवर जेकबसन यांनी रेडिओवरही काम केले आहे. १९८३ पासून सर्वसाधारणपणे त्यांनी लिहायला प्रारंभ केला. त्यावेळी त्यांनी ‘कमिंग फ्रॉम बिहाईड’ ही पहिली कादंबरी लिहिली. त्यापुढल्याच वर्षी त्यांनी ‘पीपींग टॉम’ ही कादंबरी लिहिली. २००८ मध्ये त्यांनी ‘द ॲक्ट ऑफ लव्ह’ ही कादंबरी लिहिली होती. ‘द फिंक्लर क्वेश्चन’
या कादंबरीमध्ये त्यांनी प्रेम, निराशा आणि पुरुष मैत्रीबंध या विषयावर प्रामुख्याने लिहिले आहे. बुक पारितोषिकाचे वैशिष्ट्य असे, की पारितोषिव समितीमध्ये कोणाचा सहभाग आहे ते जाहीर केले जाते. ‘फायनान्शियल टाइम्स’च्या वाङ्मयीन संपादिक रोझी ब्लॉ, निवेदिका, लेखिका आणि रॉयल ऑपेर हाऊसच्या नृत्य दिग्दर्शिका डेबोरा बुल, पत्रकार आणि लेखक टॉम सटक्लिफ, चरित्रकार आणि टीकाका फ्रान्सेस विल्सन यांचा या समितीत समावेश होता. या निवड समितीच्या अध्यक्षपदी कवी सर ॲन्ड्र्यू मोशन हे होते. बुकर पारितोषिकामुळे त्यांच्या कादंबरीची विक्री ४५ टक्क्यांनी वाढणार असल्याचे त्यांच्या प्रकाशकांनी म्हटले आहे. बुकर पारितोषिकाच्या इतिहासात अशा तऱ्हेने एका प्रहसनात्मक कथानकाला प्रथमच पारितोषिक देण्यात आले आहे. या पारितोषिकाचे तुम्ही काय करणार असे त्यांना विचारले असता त्यांनी आपण या रकमेतून आपल्या पत्नीसाठी बॅग खरेदी करणार आहोत असे गमतीने म्हटले. आपल्याला केव्हा ना केव्हा तरी बुकर पारितोषिक मिळावे असे वाटत असे, ते आता मिळाले, अशीच त्यांची प्रतिक्रिया आहे.
Leave a Reply