ही गोष्ट आहे, सुमारे तीस वर्षांपूर्वीची.. दिल्लीतील कॅनाॅट प्लेसमध्ये शेठ माणिकचंद यांची, कोटींच्या उलाढाली करणारी मोठी फर्म होती. त्यांच्या संपूर्ण इस्टेटीचा, त्यांचा पुतण्या, दिपक हाच एकमेव वारस होता. दिपकच्या आणि त्यांच्या विचारसरणीत जमीनआसमानचा फरक होता. तरीदेखील काकांचे पुतण्यावर अतोनात प्रेम होते..
दिपक हा तारुण्यात पदार्पण केल्यापासून अय्याशीमध्ये जगत होता. त्याला माणिकचंद यांच्या व्यवसायात लक्ष घालण्याऐवजी, भारतभर फिरुन मौजमजा करण्यातच अधिक रस होता.. माणिकचंद, त्याच्या कोणत्याही मागणीला नकार देत नव्हते. तो कधी गोवा तर कधी चेन्नई, कधी काश्मीर तर कधी दार्जिलिंग येथे चार चार महिने, पैसे उडवत रहात असे..
माणिकचंद यांच्याकडून दिपकला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो मागेल तेवढी रक्कम मिळत होती मात्र त्यासाठी त्यांची एकच अट होती, ती म्हणजे मी दिलेल्या पैशांचा हिशोब दर महिन्याला मला पत्राद्वारे कळवायचा. ज्या महिन्यात पत्र येणार नाही, तेव्हा पासून मी पैसे पाठवणे बंद करेन, अशी दिपकला त्यांनी तंबी दिलेली होती..
अशीच काही वर्षे गेली. दिपक गोव्यात असताना त्याला संतोष नावाचा त्याच्याच वयाचा तरुण भेटला. संतोष परिस्थितीने गरीब परंतु व्यवहारात हुशार होता. तोही भटक्या स्वभावाचा असल्याने दोघे एकत्र राहू लागले. दिपकने, संतोषवर खर्चाचा हिशोब ठेवण्याची व काकांशी पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी सोपवली. संतोष दर महिन्याला न चुकता, खर्चाचा हिशोब काकांना देत राहिला.. दिपकला, हुशार संतोषची सोबत मिळाल्यामुळे, काकांची दिपकविषयीची काळजी मिटली.
काही वर्षांनी दिपक इतका आळशी झाला की, त्याचे सहीपासूनचे सर्व व्यवहार संतोषच सांभाळू लागला. संतोषला काही वेळा, एक विचार सतावत रहायचा की उद्या दिपकनं आपल्याशी भांडून हाकलून दिलं तर आपली अवस्था अतिशय वाईट होईल.. त्यासाठी एकदा त्यानं दिपकला विनंती केली की, माझ्या नावावर ठेवायला काही पैसे देतोस का? त्यावर दिपक म्हणाला अरे, सर्व पैसे तुझ्याच खात्यावर असताना अजून तुला काय हवं? संतोष हे ऐकून, गप्प रहायचा..
दोघांनी दहा वर्षांत अनेक ठिकाणं पालथी घातली. दोघेही चेन्नईमध्ये असताना त्यांच्या पत्त्यावर एक तार आली. ‘माणिकचंद यांचं निधन झालं आहे, त्वरीत दिल्लीला या.’ संतोषने, दिपकला आलेली तार वाचून दाखवली. ते ऐकून दिपकची शुद्धच गेली. त्याला मानसिक धक्का बसला. संतोषने त्याला ताबडतोब हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. डाॅक्टरांनी त्याला अतिदक्षता विभागात ठेवले. दोन दिवस दिपक व्हेंटिलेटरवर होता..
तिसऱ्या दिवशी दिपक गेला. डाॅक्टरांनी मृत्यूप्रमाणपत्र लिहिताना संतोषला विचारलं, ‘तुमचं पेशंटशी काय नातं आहे?’ संतोषला दिपकशी संपर्कात आल्यापासूनचे दिवस आठवले.. खरं तर दिपक मालक व तो एक नोकर होता.. मात्र हिच संधी आहे, याचा विचार करुन त्यानं डाॅक्टरांना सांगितलं, ‘हा संतोष, माझा नोकर.. मी यांचा मालक दिपक..’ डाॅक्टरांनी त्याच्या हातात ते मृत्यूप्रमाणपत्र दिले. संतोष, दिपकचा अंत्यविधी उरकून दिल्लीच्या फ्लाईटमध्ये बसला..
दिपकला कित्येक वर्षात न पाहिल्याने, संतोषलाच सर्वजण दिपक समजू लागले. दुसऱ्याच दिवशी माणिकचंद यांचे वकील, संतोषला भेटायला आले. त्यांनी संतोषला विचारलं, ‘मी तार मिळताच तुम्हाला यायला सांगितलेलं होतं, उशीर का केला?’ संतोषने आत्मविश्वासाने उत्तर दिले, ‘मी लगेच निघालो होतो, तेवढ्यात माझा मित्र संतोष याचं निधन झालं, त्याचे सोपस्कार पार पाडून मी लगेच निघालो.. हे त्याच्या मृत्यूचं प्रमाणपत्र..’ असं म्हणत त्यानं डाॅक्टरांनी दिलेलं, प्रमाणपत्र वकीलापुढे ठेवलं.
‘हे तर फारच वाईट झालं, दिपकजी!’ असं वकील म्हणाले. संतोषला काहीच कळेना.. वकील पुढे सांगू लागले, ‘तुमच्या काकांचा तुमच्यापेक्षा अधिक विश्वास संतोषवर होता, कारण तो नियमित महिन्याला पैशाचा हिशोब पाठवत होता, तुमची काळजी घेत होता.. आता मात्र तुमच्या काकांची सर्व संपत्ती सामाजिक संस्थांना देणगी म्हणून द्यावी लागणार आहे. कारण काकांचा तुमच्या बेफिकिरी वृत्तीवर भयंकर राग होता. त्यांनी तुमच्या मित्राच्या नावे केलेली रक्कम, तुम्हाला देता येणार नाही..’
संतोषच्या डोळ्यांपुढे दिवसा काजवे चमकले. आपण हव्यासापोटी केलं काय आणि मिळालं काय.. तो आपल्या कर्माला दोष देत, जड पावलांनी निघून गेला…
(एका मूळ इंग्रजी कथेवर आधारित)
— सुरेश नावडकर.
Leave a Reply