१ जानेवारी २०१० ला ‘कुतूहल’ या सदराची जबाबदारी ‘समन्वयक’ म्हणून माझ्याकडे आली. माझ्या अगोदरच्या समन्वयकांनी या सदराला उच्च स्वरूप आणले होते त्यामुळे माझी जबाबदारी वाढली होती. वयाच्या ७८ व्या वर्षी वर्षभर सोमवार ते शनिवार सदर सातत्याने चालविण्याची जबाबदारी स्वीकारताना तेही माझ्या वैद्यकीय व्यवसाय व इंडस्ट्रियल अॅटॅचमेण्टस् सांभाळून- जरा विचार करावा लागला; पण प्रकृतीने उत्तम साथ दिली.
मराठी विज्ञान परिषदेतील कार्यवाहांनी मोलाचे साहाय्य दिले. माझ्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी निरनिराळ्या विषयांवरील लेख पाठवून सदरात विविधता आणली. आमच्या १५० वर्षांच्या व्यवसायातील अनुभवातून रुग्णांना हवी असलेली माहिती या सदराद्वारे देता आली. या सदरातून काही शारीरिक संस्थांच्या कार्याविषयी, होणाऱ्या रोगांविषयी माहिती दिली. काहींची फक्त ओळख करून दिली. एक वर्षाचा अवधी कमी पडला; पण अस्तित्वात असलेले ज्ञान वाचकांपुढे ठेवताना त्या काळात आणखी. नवीन ज्ञानाची सर्व विभागांत खूप भर पडली. १ जानेवारीच्या लेखात ‘ब्रह्मांडातून सूक्ष्मात’ असे मी म्हटले होते; पण या एका वर्षात वाचकांपुढे ठेवलेल्या माहितीने सूक्ष्मातल्या ब्रह्मांडाचा एक कोपराही भरला नसेल. जसे विश्वात कोटी कोटी सूर्य, अगणित तारे आहेत तसे शरीरांतर्गत कोटी. कोटी पेशी आहेत. प्रत्येक खेपेला नवीन शोध लागला, की वाटे अंतिम टप्पा हातात आला.
रंगसूत्रांचा शोध, नंतर जनुकांचा शिलालेख, त्यातले कर्करोग, रक्तदोष, अवयव दोष निर्माण करणारे गुंडप्रवृत्तीचे जनुक शोधून त्यांना शरीरातून हद्दपार करण्याची किमया करणारे, नंतर सूक्ष्मातील टेलोमर, त्यातील मायक्रो थेंबाहून लहान असणारा टेलोमरेज विकर थक्क करून सोडणारे संशोधन! अशा सूक्ष्मातील गोष्टींचे संशोधन म्हणजे बुद्धीच्या मराठी विज्ञ चिकाटीची परिसीमा ! दर खेपेला शोधानंतर ‘पुढे काय’ हे प्रश्नचिन्ह संशोधकांपुढे असतेच. वार्धक्य लांबणीवर टाकण्यासाठी, सुखकार करण्यासाठी, मानवी जीवनाचा गुंता सोडविण्यासाठी चाललेले हे संशोधन, त्यासाठी लागणारी अद्ययावत उपकरणे, त्या अनुषंगाने लागणाऱ्या इतरही अन्य गोष्टींची निर्मिती- सूक्ष्मातील हे ब्रह्मांड संपतच नाही!
डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply