आमच्या परिसरात कॉन्व्हेंट आणि ब्रँडेड इंग्लिश शाळांची दुकाने जोरात चालत असताना माझ्या घरातून शिक्षण विकत घेण्यासाठी गिर्हाईक म्हणून माझ्या मुलीला कुठल्या दुकानात घालावे याचा शोध घेण्यासाठी मी आजूबाजूच्या परिसरातील जवळजवळ सगळ्याच शाळांना भेटी दिल्या.
मुलगी तीन वर्षाची व्हायच्या आतच या भेटी द्याव्या लागत होत्या. बऱ्याच शाळा हल्ली ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवितात, तरीपण मी प्रत्येक शाळेत जाऊन चौकशी करण्याचा अट्टाहास करत होतो. काही काही शाळांनी तर पर्सनल इन्फॉरमेशन फॉर्म वगैरे पण भरून घेतले. मग त्यात आई वडिलांचे शिक्षण वगैरे वगैरे माहिती भरून घेतली. मी मरीन इंजिनियर आणि बायको डॉक्टर अशी माहिती बघून रिसेप्शनिस्ट ने सरळ इंटरव्यू साठी प्रिन्सिपॉल कडे पाठवले. मग त्यांनी आमच्या शाळेत kg पासूनच कशा प्रकारे एक्सट्रा करीक्यूलर ऍक्टिव्हिटी होतात याचे रसभरीत वर्णन केले. शाळेची दर्जेदार बस सर्व्हिस, मिसेस डॉक्टर आहेत मग टिफिन बनवायला वेळ नसेल मिळत तर मुलांच्या नाष्टा आणि जेवणाची सोय असल्याचे पण सांगितले. सगळं मिळून चार वर्षाच्या मुलीसाठी kg च्या एका वर्षाचे साधारण एक लाखभर रुपयाचे पॅकेज दिले. आणखीन एका शाळेत माहिती घेत असताना तिथे फॉरेन लँग्वेज शिकवत असल्याची माहिती दिली गेली. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि अजून एखाद दोन भाषा शिकता येतील अशी सोय असलेल्या शाळेत ICSE बोर्ड होते तिथल्या समुपदेशन करणाऱ्या मॅडमना बोलण्याच्या ओघात मी जहाजावर काम करतो असे बोलून गेलो तर त्यांनी अर्धा तासभर ICSE बोर्डावर लेक्चर दिले. म्हणजे तुम्हाला बाहेर जॉब मिळाला तर कधी ना कधी तुम्हाला देश सोडून नोकरी साठी परदेशात राहावे लागले तर मुलांच्या शाळेचा प्रश्न येणार नाही तुम्हाला तुमच्या सोबत त्यांना पण घेऊन जाता येईल. तसंही आपल्या देशात ठेवलंय काय शिकायचे आणि बाहेर भुर्रकन उडून जायचे ही संकल्पना ऐकून आलेले हसू गालातल्या गालातच दाबून टाकले. आणखी एका शाळेत ऍडमिशन साठी NRI कोटाचे ऑप्शन होते, त्यावर टिक केल्यावर तुम्ही लगेच ऍडमिशन कन्फर्म करा आमच्या शाळेत NRI कोटा लगेच भरतो अशी माहिती रिसेप्शनिस्टने लागलीच पुरवली , बारावी नंतर इंजिनियरिंग करताना बघितलेला NRI कोटा आता KG साठी पण आलेला बघून आश्चर्य वाटले.
सगळ्या शाळांमध्ये असलेल्या सोयी सुविधा एका पेक्षा एक, थ्री स्टार, फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या. चकाचक रिसेप्शन, चकाचक एअर कंडिशन असलेले वर्ग, चकाचक गार्डन, चकाचक मैदान, चकाचक बसेस, चकाचक शिक्षक आणि स्टाफ आणि त्याहून चकाचक त्या शाळेत शिकणारे लहान लहान निरागस विद्यार्थी. पण सगळ्यात जास्त खटकत होत ते म्हणजे अशा या सगळ्या ब्रँडेड शाळा आपापले मार्केटिंग करत होत्या. आमच्या शाळा ह्या शाळा नसून दुकाने आहेत येथे शिक्षण विकले जातेय, तुम्ही मुलांसाठी विकत घेणारे शिक्षण हे तुमच्या जवाबदारीवर घ्या, तुमची मुले शिकली नाहीत तर आम्ही जवाबदार नसणार. आम्ही देतोय त्या भावात घ्यायचे तर घ्या आणि नंतर आमची मनमानी निमूटपणे सहन करा. आठवड्यात शाळा पाच दिवस आणि शाळेसाठी युनिफॉर्म तीन प्रकारचे शर्ट पॅन्ट आणि शूज पण वेगवेगळे. स्टडी मटेरियल च्या नावाने तर बोलायलाच नको.
एका शाळेत रिसेप्शनिस्टला विचारले इथे एका विद्यार्थ्याची लाखभर फी घेतात मग शिक्षकांना पगार किती देत असतील? तिने चाचरत चाचरत आणि इकडे तिकडे बघून सांगितले की मला जेवढा आहे त्याच्यापेक्षा कमीच देतात. गेटवर उभ्या असलेल्या सिक्यूरीटी गार्डला पण इथल्या शिक्षकांपेक्षा जास्त पगार असतो. कॉन्व्हेंट मधून शिकलेले आणि इंग्रजी फाडफाड बोलता येणे हा इथे शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी एलीजीबिलीटी क्रायटेरिया आहे. गोळ्या औषधे प्रिस्क्राइब करण्यासाठी औषध कंपन्या जसे मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह नेमून डॉक्टरांना कमिशन किंवा टूर पॅकेजेस देतात तसेच अशा सगळ्या ब्रँडेड शाळांनी त्यांचे एजुकेशनल रिप्रेझेन्टेटीव्ह नेमलेले असतात, गल्ली बोळात आणि नाक्या नाक्यावर सुरु झालेले प्ले ग्रुप आणि नर्सरी क्लासेसमधून उगाच नाही सांगितले जात की अमुक एक शाळा चांगली आहे तमुक एक शाळेत माझी ओळख आहे, मी कन्फर्म एडमिशन करून देतो. बाजार मांडला आहे सगळा, सोयी सुविधा आणि दिखाऊपणाच्या नावाखाली शिक्षणाचा धंदा सुरु केला आहे.
ब्रँडेड शाळा बघून झाल्यावर गावातील शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याच गावात आपल्या हक्काची व आपल्या संस्कारात शिक्षण देणारी इंग्रजी माध्यमाची शाळा काढण्यासाठी विनंती केली असता त्यांनी लगेच ना नफा ना तोटा या तत्वावर इंग्रजी माध्यम सुरु करण्याची तत्परता दाखवली.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर,
B.E.(mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply