भीमसेन जोशी म्हणजे ‘गायनाचं विद्यापीठ होते. भीमसेन म्हणजे कांही लेखक किंवा भाष्यकार नव्हे, पण भीमसेनी गाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छ “शास्त्र” आणि ते ही यमा-नियमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! अनेक रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात भीमसेन सतत आपल्यासोबत राहणार आहेतच. जशी पंडितजीच्या आवाजाची चव नेहमीच मनात रेंगाळते तशीच या अनोळखी रूपाची आठवणही कायम मनात रहाते.
पं.भीमसेन जोशी थोडक्यात जीवनप्रवास.
- कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यातील गदग येथे ४ फेब्रुवारी १९२२ रोजी जन्म. १६ भावंडांमध्ये सर्वात थोरले.
- वडिल गुरुराज जोशी हे शिक्षक तर आजोबा त्या वेळचे प्रसिद्ध गायक.
- घरी संगीत शिकवण्यासाठी ठेवलेल्या शिक्षकाकडून समाधान न झाल्याने ११ व्या वर्षी गुरूच्या शोधात घर सोडले.
- विजापूर, धारवाड, पुणे, ग्वाल्हेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी भटकंती.
- ग्वाल्हेर येथे माधव संगीत शाळेत शिक्षण.
- जालंधर येथून वडिलांनी पुन्हा घरी आणल्यानंतर १९३६ पासून धारवाड येथे सवाई गंधर्व यांच्याकडून संगीतशिक्षण.
- वयाच्या १९ व्या वर्षी पहिला जाहीर कार्यक्रम.
- २२ व्या वर्षी कानडी आणि हिंदी भक्तीगीतांच्या त्यांच्या पहिल्या ध्वनीफित एचएमव्ही तर्फे प्रकाशन.
- १९४३ मध्ये मुंबई आकाशवाणी येथे नोकरी.
- समीक्षकांबरोबरच सर्वसामान्यांचीही भरभरून दाद.
- उत्स्फूर्तता, अचूक सूर लावणे, लांबलचक पल्लेदार ताना वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि तालावरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीचीखास वैशिष्ट्ये.
- शुद्ध कल्याण, मियाँ की तोडी, पुरिया धनश्री, मुलतानी, भिमपलास, दरबारी आणि रामकली हे विशेष आवडते राग.
- गुरूंना श्रद्धांजली म्हणून १९५३ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवाची पुण्यात सुरुवात.
— संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३