आता शाळेला सुट्टी लागली की मला. खूप बोअर होत. काय करणार अशी भुणभुण लावली होती नातवाने. अरे आम्ही अशा दिवसात खूप मज्जा करायचो. तू असे कर बुडबुडे कर. त्याला समजले नाही म्हणून तो म्हणाला की म्हणजे वॉटर बबल्स का. पण ते आता मिळत नाही. बाहेर गेल्यावर असेल तर विकत घ्यावे लागते. हो ना पण आम्ही घरीच करायचो. त्यामुळे तो उत्सुक होऊन ऐकत होता. आम्ही फुलपात्रात पाव ते अर्धे असे पाणी घेऊन त्यात थोडेसे साबणाचा चुरा टाकायचो. मग कागदाची नळी पुंगळी वळून त्याने त्या पाण्यात फूंकर मारली की बुडबुडे छोटे छोटे तयार होऊन फुलपात्राच्या वर यायचे. आम्ही चाळीत वरच्या मजल्यावर जाऊन त्या नळीनेच फुंकर मारुन लहान मोठे फुगे सोडायचो. कधी कधी ते खूप मोठे तर कधी लहान तर कधी फुसके पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे पाणी तोंडात गेले नाही पाहिजे…
मग आम्ही कठड्यावरुन ते पाण्याचे फुगे सोडून द्यायचो. आकाशाकडे तोंड करून फुंकर मारली तरी फुगे खालीच जातात. तेव्हा खालील बाजूस उभे असलेले आमची बच्चे कंपनी ते फुगे हातात घेण्यासाठी उड्या मारत. कधी कधी तर इंद्रधनुष्या सारखे रंग दिसतात.
हे ऐकून त्याला मजा वाटली. पण मी विचार करत होते की माणसाचे आयुष्य म्हणजे एक बुडबुडाच आहे ना. कितीही आकाशात गरुड झेप घेऊन खूप काही मिळवले तरीही शेवटी जमीनीवर मातीतच शेवट आहे. काही शेवटपर्यंत जातात. तर काही आकालीच…..असो मी तरी कुठल्या कुठे विचारात भरकटत गेले आहे. पण त्या बुडबुड्यांची मजा काही औरच होती. पैसा खर्च नको. बोअर होत नाही. जिद्द निर्माण होते आणि बरेच काही.पण तो म्हणाला तसे बाजारात मिळतात तर मग कशाला उगाच धडपड करायची. बरोबर आहे ना त्याचे आजकाल सगळे काही मिळते. फक्त पैसा फेको तमाशा देखो. सगळे काही मिळत मात्र आंनद व समाधान विकत मिळत नाही म्हणून..
धन्यवाद
–सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply