प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा अशा तीन स्तरांवर बुद्धीचे कार्य चालते असे आपण काल पाहिले. त्यातील दुसरी अवस्था म्हणजे मेधा. ही मेधा अत्यंत व्यवस्थित असणे आवश्यक आहे. अशा सुसंस्कारित मेधेला सुमेधा असे म्हणतात.
ज्या वेळी आपण एखादी गोष्ट पहात असतो, ऐकत असतो अर्थात त्या गोष्टीचा ज्ञानेंद्रियांच्या द्वारे अनुभव घेत असतो त्यावेळी तर आपल्याला ती गोष्ट व्यवस्थित समजली असे वाटत असते. मात्र काही काळानंतर त्या गोष्टीचे विस्मरण होते. मात्र असे विस्मरण होत असेल तर वेगळ्या शब्दात तो अनुभव योग्य पद्धतीने घेतलाच गेला नाही. त्या अनुभवाचे स्मृतीत संग्रहण झाले नाही. अशावेळी तो अनुभव केवळ तात्कालिक उरतो.
मात्र अशा तात्कालिक अनुभवांना जी आपल्या शक्तीने स्मृतीच्या स्वरूपात चिरंतनत्व प्रदान करते त्या बौद्धिक क्षमतेला सुमेधा असे म्हणतात.
ऐकतांना ऐकले, पाहतांना पाहिले मात्र योग्य वेळी ते आठवत नसेल तर त्याचा उपयोग काय? प्रत्येक सुयोग्य अनुभवाला असे संस्मरणीय स्वरूपात अंतरंगी साठवून ठेवणाऱ्या क्षमते लांब सुमेधा असे म्हणतात.
ही बौद्धिक क्षमता ज्या भगवान गणेशांच्या कृपेने प्राप्त होते त्यांना याच कारणाने सुमेधानाथ असे म्हणतात.
— प्रा. स्वानंद पुंड.
Leave a Reply