नवीन लेखन...

सुसंवाद साधण्याने

या एक दोन दिवसांमध्येच व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर एक पोस्ट वाचनात आली. नेमकेपणाने टिप्पणी करणाऱ्या पोस्ट इथे अभावानेच आढळतात म्हणा, तर पोस्ट होती,
“नाती सांभाळणं आजकाल थोडं कठीण होऊन बसलय……

कारण संवाद फक्त मेसेजवर,
आणि वाद मात्र फोनवर.
आता उरल्या भावना…..
त्या स्टेटसवर कळवल्या जातात….”

संवाद साधल्याने किंवा सुसंवादाने किंवा बोलण्याने प्रश्न, गुंता सुटतो असं म्हटलं जातं. असेलही किंवा बरोबरही असेल, परंतु नुसत्या संवादाने प्रत्येक वेळी प्रश्न सुटतील का ???? किंवा सुटतात का ????
या प्रश्नाचा थोडा सविस्तर विचार करूया.

सर्वप्रथम संवाद साधण्यासाठी किमान दोन व्यक्ती लागतात. त्या व्यक्ती, या प्रश्नावर आपल्याला तोडगा काढायचाय, न की एकमेकांवर आपल्या म्हणण्याचा आघात करत राहायचंय या किमान विचाराने एकमेकांसमोर यायला हव्यात. म्हणजेच दुसऱ्या शब्दात, सुसंवाद साधताना आपल्याच विचारला चिकटून न रहाता, समोरची व्यक्ती काय म्हणतेय किंवा त्याच्याही म्हणण्यामध्ये तथ्य आहे का ? याचा त्यांनी विचार करायला हवा. विरोधाला विरोध करत संवाद साधत राहिलं, तर कितीही बोललं तरी प्रश्न मात्र सुटणार नाही. त्यामुळे दोघांकडेही बऱ्यापैकी श्रवणशक्ती असायला हवी. ज्याला आपण good listner असं आपण म्हणतो. नाहीतर होतं काय, एक पोटतिडकीने बोलत असतो आणि समोरचा, ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असतो. कसा व्हायचा सुसंवाद आणि कसा सुटायचा प्रश्न ????
समोरची व्यक्ती मांडत असलेल्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून, आपल्या बोलण्याची घाई करत राहिलं तर तो संवाद होणार नाही, सुसंवाद तर नाहीच नाही.

संवाद साधण्याने प्रश्न सुटतात, पण कधी ? दोघांच्याही विचारात सकारात्मकता असेल, खरंच यातून काही सकारात्मक मार्ग निघावा, असं मनापासून दोघांनाही वाटत असेल, आपण संवाद साधतोय वाद घालत नाहीय ही जाणीव असेल तर. संसारातही अनेकदा ज्या विषयावर बोलणं म्हणा संवाद साधणं म्हणा सुरू झालेलं असतं, तो विषयच पुढे बाजूला पडतो, आणि गाडी रुळावरून घसरून कुसंवादाच्या वाटेने जाऊ लागते. एकमेकांवर आरोप केले जातात आणि काही वेळाने सगळं शांत होतं….. म्हणजे मनातून नाही बरं, तोंड बोलून थकल्यामुळे शांत होतं इतकंच.

प्रत्येकजण आपल्याच मताला चिकटून राहिलं, जराही लवचिकता दाखवली नाही, मग प्रश्न सुटायचा कसा ? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास. हा सुसंवाद एकमेकांवर विश्वास ठेवत व्हायला हवा, या पायाभूत गोष्टीचाच अभाव असेल तर त्या संवादाला काहीच अर्थ उरणार नाही.

याचबरोबर संवाद साधताना, बोलण्याव्यतिरिक्त अनेक गोष्टी कार्यरत होत असतात, ज्यांचा सुसंवाद साधण्यावर थेट परिणाम होत असतो, तुमची दृष्टी – त्याकडे पाहून समोरच्याला कळतं की मनातला खरा भाव काय आहे.

हावभाव मुद्रा – अनेकदा बोलताना देहबोली आक्रमक असते, हातवारे खूप होत असतात. विषय कुणा नात्यातल्या व्यक्तींबद्दल असेल, तर ठराविक नाव आलं की विचित्र मुद्रा केली जाते. देहबोली – यामधूनही आपल्या मनामधला भाव कळू शकतो.

आपल्या आजूबाजूला, नात्यामध्ये अशा काही व्यक्ती असतात, त्या बोलू लागल्या की खूप छान, प्रसन्न वाटतं. त्यांच्याशी संवाद साधत रहाव असं वाटतं. याउलट काही व्यक्ती बोलू लागल्या की चिडचिड होऊ लागते,त्यांचं बोलणं थांबावं असं वाटू लागतं. अनेकदा या व्यक्ती लहान सहान गोष्टींना आपल्या बोलण्याने इतकं मोठं करतात की कंटाळून जायला होतं. काही वेळा संवादातील मुद्दा आपल्या विरोधात जात असेल, तर मूळ विषयाला बगल देण्यासाठी एकमेकांचे ट्रिगर पॉइंट मुद्दामून दुखावले जातात,. आणि मग मूळ विषय, सुसंवाद रहातो बाजूला आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होतात.

संवादाला ठामपणा निश्चित असावा, परंतु आपलं मत समोरच्यावर लादण्याचा अट्टाहास न करता, ते त्याला व्यवस्थित पटवून समजावून सांगण्याचा भाव असायला हवा. मित्रांनो म्हणजे फिरून आपण पुन्हा एकदा त्याच जागी आलो, की संवाद साधण्यासाठी, सकारात्मकता असायला हवी. सोबतच दोघांची वैचारिक, सांस्कृतिक पातळीही किमान जुळणारी असायला हवी, कारण समोरचा/ची काय म्हणतोय/तेय हे त्याला/तिला आकलन होणं गरजेचं असतं, आणि तेच झालं नाही, तर तो/ती आपले मुद्दे काय मांडणार ? फक्त माझ्यापुरतं, इतकचं धरून संवाद झाला की त्याला व्यापकता येत नाही.

आजची शालेय जीवनातील पिढी, घडवायची असेल तर शिक्षणासोबतच त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधून संस्कार करण्याची आत्यंतिक गरज आहे. आजची पिढी प्रचंड हुशार आहे, त्यांची आकलनशक्ती प्रचंड आहे त्यामुळे अजाणतेपणी ती कोणत्याही मार्गाला जाऊ शकतात. त्यांची कोवळी मनं सुसंस्कारित व्हायला हवी. एखादी चुकीची गोष्ट त्यांच्याकडून पुनःपुन्हा होत असेल तर त्याच्या मुळाशी जाऊन आणि त्यांच्याशी संवाद साधून उपाय शोधायला हवा. लहानपणापासून त्यांच्या कानी सतत जे पडत रहातं ते त्यांच्या बोलण्यामधून व्यक्त होत असतं. एक संयमी, सुसंस्कृत, सुजाण समाज घडवायचा असेल, तर तर संवाद नाही सुसंवाद घडायला हवा इतकंच.

समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाच्या श्लोकात अगदी नेमकं म्हटलंय,
जनी वादवेवाद सोडूनि द्यावा |
जनी वादसंवाद सूखे करावा |
जगी तोचि शोकसंतापहारी |
तुटे वाद संवाद तो हीतकारी |
थोडक्यात काय ?
संवाद साधण्याने प्रश्न सुटतात फक्त ——————–??
वाचकहो, तुम्हीच वाक्य पूर्ण करा.

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी.
९७६९०८९४१२

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..