सिग्नल व्यवस्था अखंड सुरळीत ठेवण्याचं काम केबीन सिग्नलतंत्रज्ञ करतात. रेल्वेचे रुळ, त्यांतील सांधे खेचण्याचा हलणारा दांडा, बॉक्स, विद्युतप्रवाह या सर्वांचा समन्वय झाला, की सिग्नल लागतो. मध्ये एखादा छोटासा खडा जरी आला, तरी यंत्रणा बिघडते. हा बिघाड तत्परतेने शोधणारे रेल्वे कर्मचारी केबिनमध्ये सतत सतर्क असतात. प्रत्येक केबिनची कामाची हद्द २२ कि.मी. किंवा त्याहून जास्त किलोमीटर एवढी असते.
केबिनमध्ये भल्या मोठ्या पॅनेलवर अनेक लाल, पिवळ्या, हिरव्या दिव्यांची उघडझाप होत असते. ती बटणं दाबून रेल्वेचे सांधे बदलून, येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग मोकळा केला जातो. पुणे स्टेशनच्या बाहेरील आउटर सिग्नल केबीनजवळून दहा वर्षांपूर्वी ५०० गाड्या व इंजिनांची ये-जा होत असे, आज २००० गाड्यांच्या व इंजिनांच्या हालचाली होत असतात. यांतील बरीच वाहतूक रात्री १२ ते पहाटे ५ यामधील काळात असते. हे सर्व बघण्यासाठी ओणव्यानं, वाकून काम करावं लागे. त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना पाठीच्या दुखण्यांनी ग्रासलं. आता ही सर्व कामं इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतात. कोणतीही गाडी स्टेशनात शिरताना वा स्टेशनातून बाहेर पडतानाची संपूर्ण जबाबदारी या केबिन कर्मचाऱ्यांची असते. अत्यंत जोखमीचं असं हे काम डोळ्यांत तेल घालून करावं लागतं.
भारतभर पसरलेले १.१५ लाख किलोमीटर अंतराचे रेल्वेमार्ग, ७५०० ते ८००० रेल्वेस्टेशनं व प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या १४,३०० गाड्या, हा सर्व व्याप व्यवस्थितरीत्या सांभाळण्याचं अजस्र काम रेल्वेचे हे सर्व कर्मचारी जोखमीने पार पाडतात.
शंभर वर्षांपूर्वी ‘रस्कीन बाँड’ हा प्रसिद्ध ब्रिटिश लेखक भारतात रेल्वेनं फिरला. भारतीय रेल्वे यंत्रणेच्या तो इतक्या प्रेमात पडला, की तो भारतातच स्थायिक झाला. त्यानं भारतीय गँगमन, के बिनमन, पॉईंटमन यांच्या प्रामाणिकपणा, चिकाटी या गुणांवर व अथक काम करण्याच्या जिद्दीवर अनेक कथा लिहिल्या. भारतीय रेल्वेच्या या साऱ्या दर्जेदार व्यवस्थेची ही संवेदनापूर्ण पावतीच आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply