दक्षिण मुंबईच्या काळा घोड्याजवळील प्रख्यात जहांगिर आर्ट गॅलरीच्या आडोशाला राहून मुंबईच्या सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार बनलेल्या ‘कॅफे समोवर’ने २०१५ मध्ये मुंबईकरांना अलविदा म्हटले आणि सवयीने या कॅफेकडे वळणारी अनेक असंख्य पावले थांबली! यामध्ये होती अमोल पालेकर, शाम बेेनेगल वगैरेंसारखी नामांकित मंडळी आणि तुमच्या-माझ्यासारखे असंख्य मुंबईकर.
जेव्हा जहांगिर आर्ट गॅलरी सुरू झाली, तेव्हा साहजिकच येथे वावरणाऱ्या उच्चभ्रू कलाकारांसह कलारसिकांना बैठकीच्या अड्ड्याची गरज होती. ती गरज भागवली या ‘आर्ट गॅलरी’तच आडोशाला थाटलेल्या ‘कॅफे समोवर’ने. १९६०-७० च्या दशकात येथे नामवंत चित्रकार, लेखक आणि आर्ट सिनेमावाल्यांचे गप्पांचे फड रंगत असत.
उषा खन्ना यांनी १९६४ मध्ये सुरू केलेले ‘कॅफे समोवर’ बघता बघता असंख्य मुंबईकरांच्या दैनंदीन जीवनाचा साक्षीदार झाले होते. हे कॅफे कोणत्या विशिष्ट खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध नव्हते, पण तिथे मिळणारे वेगळ्या घाटणीचे पदार्थ आणि त्याहीपेक्षा प्रत्येक ग्राहकाला खन्ना यांच्याकडून मिळणाऱ्या आपुलकीच्या वागणुकीमुळे अल्पावधीत हे कॅफे अनेकांसाठी हक्काचे ठिकाण झाले होते.
बिग बी अमिताभ आणि जया बच्चन यांची पहिली ‘डेट’ याच कॅफेमध्ये ठरली होती. त्यावेळी अमिताभ आणि जया टॅक्सी किंवा बसमधून या ठिकाणी येत, अशी आठवण सांगितली जाते. इन्फोसिसचे नंदन निलकेणी यांनीही त्यांच्या पत्नीला इथेच प्रपोज केले असे सांगितले जाते.
प्रख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन आपले आवडते वांग्याचे भरीत चपातीत गुंडाळून खायचे आणि समाधानाचा ढेकर देऊन पुढील कामाला निघायचे. `जहांगिर’ मध्ये येणार्या तमाम कलाकारांची आणि कलाप्रेमींचा इथे कायमचा राबता असायचा.
आपल्या अस्तित्वाची मोहोर उमटवलेल्या कॅफे समोवरच्या भाडेपट्ट्याचा वाद अनेक वर्षे सुरू होता. कोर्टाच्या आदेशामुळे हा वाद कायमचा निकालात निघाला आणि कॅफेचे शटर खाली खेचण्यावाचून अन्य पर्याय उरला नाही. हे कॅफे सुरू राहण्यासाठी प्रयत्नशील असणारे ख्यातनाम दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्यासाठीही हा कॅफे जिव्हाळ्याचा विषय होता.
मुंबईच्या इतिहासातल्या अशा अनेक पाऊलखुणांचा मागोवा आपण ‘नोस्टाल्जिया’ या सदरात घेतो. आपल्याही आठवणीच्या कोपर्यात असलेल्या काही जागा असतील तर त्यांचीही माहिती वाचकांना करुन द्या…
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply