मित्रांनो, खालचा लेख काहीसा मोठा आहे, पण शिक्षणाबद्दल आस्था असणारांनी जरूर वाचावा ही विनंती. लाईक्स, कमेंट नाही दिल्यात तरी चालेल, पण एकदा वाचावा ही नम्र विनंती..
शिक्षणाचं असं करता येईल काय?
विषय अर्थातच शिक्षणाचा. माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि म्हणूनच काळजीचा. जी व्यक्ती किंवा वस्तू किंवा गोष्ट अत्यंत जिव्हाळ्याची असते, तिचीच काळजी आपल्याला जास्त असते, तसं काहीतरी माझं शिक्षणाच्या बाबतीत होतं. सध्या शिक्षणाचा जो खेळ खंडोबा चाललाय, तो कुठेतरी थांबावा असं सारखं वाटत असतं. माझ्यापरिने मी माझ्या परिघातल्या माणसांना मी समजावूनही देत असतो, पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत आहे असं जाणवत नाही.
आज आपण शालेय शिक्षणाचा ४+३+३+२ असा आकृतीबंध स्विकरालाय. इयत्ता ४ थी पर्यंत पूर्व प्राथमिक, पुढे ५ वी ते ७वी प्राथमिक, इयत्ता ८वी ते १०वी माध्यमिक आणि अकरावी-बारावी उच्च माध्यमिक अशी विभागणी ही आहे. इंग्रजांच्या लाॅर्ड मेकाॅले नांवाच्या शिक्षण तज्ञाने बनवलेला हा ढांचा, आपण किचितसा बदल करून आजही तसाच्या तसा वापरतोय. हा किंचितसा बदल म्हणजे पूर्वी ११ वी मॅट्रीक होतं, ते आपण दशमान पद्धतीला साजेसं १० वीवर आणून ठेवलं. आणखी एक ‘क्रूर’ बदल आपण केलाय, तो म्हणजे, या आकृती बंधाच्या अलिकडे ‘ज्युनिअर केजी’ आणि ‘सिनिअर केजी’ अशा आणखी दोन यत्ता आणून ठेवल्यात. मुलांचं बाल्य असं निष्ठूरपणे चिरडून आपण नेमकं काय साध्य करू पाहातोय टाकतोय असा प्रश्नही मला छळतोय.
मेकाॅलेला ब्रिटीशकाळात त्यांची भाषा शिकलेला, परंतू फारसा विचार न करणारा ‘होयबा’ नोकरवर्ग त्यांचा राज्यकारभार हाकण्यासाठी हवा होता. त्याचं उद्दिष्ट तेवढंच होतं. आपण मात्र जराही विचार न करता, राॅबर्ट मेकाॅलेची तिच पद्धती, आजही तशीच चालू ठेवली आहे आणि ध्येयही इंग्लिश शिकून चांगल्या पगाराची ‘नोकरी’ मिळवण हेच. आपण आजही फाडफाड इंग्रजी बोलू शकणारे होयबा नोकर वर्गच जन्माला घालतोय याचं वैषम्य कुणालाच वाटत नाही, कारण तसं वैषम्य वाटण्यासाठी विचार करावा लागतो आणि इथल्या लोकांनी विचार करूच नये हे मेकॅलेचं ध्येय. आजचे खुऽऽप शिकलेले शिक्षण तज्ञ हे या मेकॅलेच्या सिस्टीमचंच प्राॅडक्ट्स असल्यानं, ते विचार करत असतील का याची शंका आजचा शिक्षणाचा बट्ट्याबोळ पाहून येते. हे राॅबर्ट मेकाॅलेचं यश.
मेकाॅले हा खरा द्रष्टा. इंग्रजी भाषेला भारताची सरकारी राज्यकारभाराची भाषा आणि शिक्षणाचं माध्यम बनवण्यात याच मेकाॅलेचा हात होता. राजकीय दृष्ट्या आपण स्वतंत्र झालो, परंतू मानसिकरित्या आजही आपण ‘काॅलनी’ काळातच आहोत हे आपण वारंवार सिद्ध करतोय. आजचे शिक्षणतज्ञ मेकाॅलेच्या त्याच सिस्टीममधून तज्ञ झालेत. त्यांच्या लांबलचक पदव्या असतीलही ‘आंतरराष्ट्रीय’ पातळीवरच्या, पण देशी शिक्षणाचा विचार करताना, त्या शिक्षणाबद्दलची आपुलकी मात्र अस्सल ‘देशी’ लागते, हेच ते विसरले असावेत अशी शंका घेण्यास जागा आहे. किबहूना तुमचा देशीपणा जागृत होऊच नये याची मेकॅलेने, अर्थात ब्रिटीशांनी त्यानेळीच पुरेपूर काळजी घेतलेली आहे असं आजची शिक्षणाची सर्कस पाहून म्हणता येईल.
मग काय करता येईल? नुसतं टिका करून चालणार नाही, तर काही उपायही सुचवायला हवेत. मी जे काही पुढे मांडणार आहे, त्याचा साधक-बाधक विचार शिक्षणाबद्दल आस्था असणारांनी करावा. हा एक विचार आहे व त्याची घुसळण होऊ शकते याचं भान मला आहे.
सर्वात प्रथम ‘सिनिअर केजी’ आणि ‘ज्युनिअर केजी’ किंवा ‘छोटा शिशू’ आणि ‘मोठा शिशू’ हा वेडसर प्रकार पूर्णपणे थांबवावा. ‘शि’ आणि ‘शू’ हे शब्दच पुरेसे बोलके आहेत. या बेसिक गोष्टींचीही फारसी जाणीव ज्या मुलांना नसते, त्यांना आपण दोन-तिन तास एकाठिकाणी डांबून नक्की काय मिळवतो हेच कळत नाही. मनसोक्त बागडू द्या, त्यांना आवडणाऱ्या गोष्टींत रमू द्या. त्यांना त्यांचं बालपण मनसोक्त उपभोगू द्या..!
प्राथमिक शिक्षण, म्हणजे इयत्ता ४थी पर्यंतचं शिक्षण सक्तीने मातृभाषेतच असावं. पुढे ५ वी ते ७ वी माध्यमिकपर्यंत राष्ट्रभाषा शिकणं ही सक्ती असावी. जोडीला इंग्रजी शिकवायलाही हरकत नाही पण तो एक महत्वाचा विषय म्हणून. सायन्स माहीती होण्यापुरतं आणि गणित हिशोब करण्यापुरतं शिकवावं. बाकीचे विषय आतासारखेच असायला हरकत नाही. त्याच सोबत मुलांचा कल लक्षात घेऊन त्या कलानुसार मुलांना त्या त्या विषयाची तोंड ओळख करून द्यावी. आठवीपासून पुढे दहावीपर्यंत मात्र मुलाचा कल जिकडे असेल, त्या प्रमाणे शिक्षण द्याव व हा कल पुढे पदवीपर्यत कले कलेने वाढून सफाईपर्यंत कसा येईल, असं शिक्षण द्यावं. एखाद्या मुलाला जर चित्रकलेची आवड असेल, तर त्याला चित्रकलेचं शिक्षण थेट पदवीपर्यंत मिळावं, तसंच ज्यांनी इतिहासात रुची असेल त्यांना इतिहासाचं किंवा ज्यांना गणित, विज्ञानात किंवा इतर कोणत्याही विषयात रुची असेल त्या विषयाचं शिक्षण आठवीपासून पुढे पदवीपर्यंत द्यावं. त्यांना उगाच सायन्सची सुत्र किंवा गणितातली प्रमेयं पाठ करायला लावू नयेत. असं केलं तरच आपल्याला अनेक क्षेत्रात आवडीने काम करणारे त्या त्या क्षेत्रतातले तज्ञ, अभ्यासक मिळू शकतील.
शिकण्याचे विषय मुलांनाच निवडू द्यावेत व त्या त्या विषयाचं शिक्षण देणारे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत. हे खरंय, की असं केल्याने येणारा आर्थिक बोजा शाळांना परवडणारा नसेल. अशावेळी त्या त्या विषयाचं शिक्षण देणाऱ्या विशेष शाळा असाव्यात ज्यात इयत्ता आठवीनंतर मुलं प्रवेश घेऊ शकतील, मग एकाच शाळेवर बोजा पडणार नाही. उदा. जे जे स्कुल आॅफ आर्टसारख्या काॅलेजप्रमाणेच शाळाची संख्या वाढली पाहीजे. इतिहास, भुगोल, गणित, गिर्यारोहन, पुरातत्व या व अशा इतरही विषयांचं विशेष शिक्षण देण्याची व्यवस्था इयत्ता आठवीपासूनच झाली पाहीजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षणाचा संबंध मार्कांशी न लावता गुणवत्तेशी लावावा. आणि गुणवत्तेत नंबर नसतात, तर वेगवेगळेपणा, विविधता असते. दोन शास्त्रज्ञ किंवा दोन शिल्पकार यांच्यात तुलना कशी करणार? पहिला-दुसरा कसा ठरवणार? कारण त्या दोघांची सारख्याच विषयीची अभिव्यक्ती भिन्न असणार आणि ती त्या त्या परिने उत्तमच असणार. कल लक्षात घेऊन दिलेल्या शिक्षणात ‘गुण’वंत निर्माण होतील, ‘मार्क्स’वेडे नाही. मला वाटतं मंगळावर जाण्याची तयारी करणाऱ्या आपल्या देशाला हे अशक्य नाही, प्रश्न फक्त इच्छाशक्तीचा आणि आस्थेचा आहे.
ज्यांना कशातच रुची नाही (असं होऊच शकच नाही) आणि नोकरीच करायचीय, त्यांच्यासाठी आहेच आताची व्यवस्था, पण ज्यांना काही वेगळं करायचंय, अशा मुलांना तसं शिक्षण मिळण हा त्यांचा हक्क व आपली जबाबदारी आहे.
मुलांना शिक्षकांनी प्रश्न विचारावेतच पण त्याहीपेक्षा मुलांनी मोकळेपणांने शिक्षकांना प्रश्न विचारावेत. मुलांना प्रश्न पडावेत याची आपल्या विद्यमान शिक्षण व्यवस्थेत कोणतीही सोय नाही, मग ते विचारणं तर दूरच..!
एक अनुभव सांगतो आणि थांबतो. पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या ‘कौशल्य विकास योजने (Skill India)’साठीची पाठपुस्तकं इंग्रजीतून मराठीत भाषांतर करण्याचं काम मी केलं. मराठीत झालेलं हे पहिलंच काम हे मी अभिमानाने नमूद करु इच्छीतो. जी मुलं या योजनेत सहभागी झालीत, अशा मुलांच्या एका वर्गावर दोन तास शिकवण्याची संधी मला माझे मित्र श्री. संदीप विचारे यांच्या माध्यमातून मिळाली. फर्ड्या इंग्रजीत असलेली ती पुस्तकं, स्कुल ड्रीॅपआऊट ते बारावी पर्यंतच्या, ते ही ग्रामिण भागातील, मुलांना समजेल अशा मराठीत मी भाषांतरीत, खरं तर भावांतरीत केलेली असल्यामुळे, मी ती अधिक चांगल्या रितीने मुलांना समजावून सांगू शकेन असा संदीपचा आग्रह पडला व मी भिडेस्तव तो मान्य केला.
मित्रांनो, त्या दिवसपासून मी आपल्या शिक्षण व्यवस्थेविषयी खुप नर्व्हस झालो व देशाची भावी पिढी कशी असेल याचा अंदाज येऊन निराशही झालो. मी काहीवेळ शिकवून नंतर त्यांच्याशी फक्त गप्पा मारल्या आणि त्या गप्पांतून जे विदारक सत्य बाहेर आलं ते चिंताक्रांत करणारं होतं. थोडी मोकळी झाल्यावर त्या मुलांपैकी काही उत्तम चित्र काढणारी होती, काही गाणारी होती. काहींना विज्ञानात रस होता तर काहींना लेखक व्हायचं होतं हे त्यांनीच सांगीतलं. मग ती इथं का आली, याचं उत्तर तर मला स्वत:चीच लाज वाटावी असं होतं. बहुतेकांच्या राहात्या ठिकाणी तशा शिक्षणाची सोय नव्हती तर काहींची आर्थिक परिस्थिती नव्हती. अशी स्वप्नांची राख झालेली ती मुलं नाईलाजाने झाडू कशी मारावी किंवा हाॅटेलच्या बेड वरील बेडशीट कशी बदलावी याचं ‘कौशल्य’ शिकण्यासाठी आली होती. मी बोलतोय म्हटल्यावर माझ्याकडून त्यांची आवड जोपासण्यासाठी मदतीची अपेक्षाही करत होती. भारताच्या भावी नागरीकांचं हे प्रातिनिधीक चित्र भयाण होतं आणि आपण गप्पा मारतोय महासत्ता होण्याच्या. मला माझीच लाज वाटली. आणि दृष्टीआड सृष्टी म्हणून पुन्हा काही तिथं गेलो नाही. काय करणार होतो मी तरी त्यांच्यावर आशेची फुंकर मारून.? हा ग्रामिण भाग काही फार लांबचा नाही, तर महामुंबईच्या सीमेवर असणाऱ्या भिवंडी नजिकचा आहे. मग दुर्गम भागातील किती प्रज्ञावंत असेच करपून जात असतील याचा विचारच न केलेला बरा.
माझं वरील लेखन काहीना आवडेल तर काहीना आवडणारही नाही. काही त्यात त्रुटीही काढतील. पण माझ्या भावना समजून घ्या. मी काही शिक्षण तऱ्ज्ञ नव्हे आणि मला तसं व्हायचंही नाही परंतू शिक्षणाचं जे काही मातेरं सध्या चाललंय ते थांबाव असं मनापासूनची इच्छा मात्र आहे आणि त्याचयतळमळीतून हे लिहीलं आहे, समजून घ्यावं ही विनंती..!!
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply