पहाटे पहाटे जहाज जेट्टी वर बांधत असताना इंजिनच्या मुव्हमेंट जाणवल्या होत्या. जहाज पुढे मागे करताना इंजिन चालू बंद होण्याचा आवाज आणि व्हायब्रेशन मुळे कितीही झोपेत असलो तरी जाग आल्याशिवाय राहात नाही . तसही रात्री लवकर झोपल्यामुळे सकाळी साडे पाच वाजता जाग आली होती. रात्री पोर्ट होलचे कर्टेंस बंद केले नसल्याने केबिन मध्ये उजाडल्यासरखा सोनेरी प्रकाश दिसत होता पण बाहेर बघितले तर ऑईल टर्मिनल सोडियम व्हेपरच्या दिव्यांनी उजळुन निघाले होते आणि तोच प्रकाश आत आला होता. सकाळी नेहमप्रमाणे सात वाजता वेक अप कॉल आला पण आंघोळ करत असल्याने तीन रिंग वाजून बंद झाला. पण पुन्हा पाच मिनिटांनी फोनची रिंग वाजली आता हा वेक अप कॉल नसेल म्हणून शॉवर बंद करून भिजलेल्या हातांनी रिसिव्हर उचलला. चार साब आज शोर लिव्ह हैं वॉच के बाद खाना खाके बाहर जायेंगे असे थर्ड मेट बोलू लागला त्याला ठीक आहे असे बोलून फोन ठेवला. सकाळी सकाळी पोर्ट मध्ये कार्गो डिस्चार्ज करायला आले असताना केबिन मध्ये फोन आला की आता काय प्रॉब्लेम आला असावा ही चिंता वाटू लागते, पण किनाऱ्यावर फिरायला जायला मिळेल म्हणून थोडेसे हायसे वाटले. जहाजावर इंटरनेट असल्याने थर्ड मेट ने काल रात्रीच गूगल सर्च वर शहराची माहिती काढून ठेवली होती. ब्रेकफास्ट करून आठला पाच मिनिटे असताना इंजिन रूम मध्ये गेलो आणि गेल्या गेल्या सेकंड इंजिनियरला तो बाहेर जाणार आहे का विचारले तो म्हणाला की मी नाही जाणार पण तुला जायचे तर जाऊन ये. कार्गो डिस्चार्ज ऑपरेशन सुरू होऊन दोन तास झाल्याने सगळं सुरळीत चालू होते बारा वाजता वॉच संपल्यावर लंच केला आणि थर्ड मेट आणि मी दोघे जण जहाजावरुन जमिनीवर उतरलो. तसं मागील पोर्ट मध्ये दहा दिवसापूर्वी सुद्धा बाहेर जायला मिळाले होते. पण किनाऱ्यावर बाहेर जायला दहा दिवस काय रोज रोज मिळाले तरी माझ्यासारख्याला तरी कंटाळा नाही येणार. जहाजावर शोर लिव्ह मिळून सुद्धा किनाऱ्यावर न जाणारे कितीतरी अधिकारी आणि खलाशी नेहमी असतात. पण बाहेर जाऊन बाहेरचे जग बघण्यासाठी एकही संधी वाया जाऊ न देणारे आमच्यासारखे एक दोन जण निघतातच.
स्पेन मधील कार्तेगेना शहराजवळच ऑइल टर्मिनल होते. जहाजापासून टर्मिनल चे गेट एक किलोमीटर अंतरावर होते तिथे पासपोर्ट जमा करून बाहेर पडलो. दुपार असल्याने रस्त्यांवर फारशी वर्दळ नव्हती. छोटी छोटी टुमदार घरे आणि स्वच्छ रस्ते पांढऱ्या शुभ्र रंगातल्या लहान लहान इमारती शहराचे सौंदर्य वाढवत होत्या. समुद्र किनाऱ्यावर यॉट्च , स्पीड बोट आणि लहान लहान सेल बोट दाटीवाटीने उभ्या होत्या. युरोप मध्ये फिशिंग किंवा विक एंड साठी स्वतःच्या मालकीच्या स्पीड बोट व यॉट्च असणे म्हणजे श्रीमंती किंवा प्रेस्टिज मानण्यापेक्षा तो एक आयुष्य जगण्याचा अविभाज्य भाग आहे असेच मानले जात असावे म्हणून बऱ्याचशा युरोपियन पोर्ट मध्ये किनाऱ्याजवळ गेलो की शेकडो च काय हजारो अत्याधुनिक छोट्या मोठ्या स्पीड बोट आणि यॉट्च नजरेला पडत असतात.
युरोपातील इतर शहरांप्रमाणे इथेही अशा बोटींसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा असलेले पार्किंग लॉट प्रमाणे बोर्डिंग प्लॅटफॉर्म होते. समुद्र किनाऱ्यावरील बिचेस आकर्षक रंगसंगती ने सजवले होते. स्वच्छता नीटनेटकेपणा आणि त्यासोबतच शिल्पं आणि फायबर तसेच धातूच्या लहान मोठ्या आकृती उभारल्या होत्या. बीचेस वर असणाऱ्या रेसटॉरंट्स मध्ये पाच वाजेपर्यंत शुकशुकाट होता पण हळू हळू वर्दळ वाढू लागली तसतसे समुद्राच्या समोर मांडलेले टेबल्स भरू लागले. बीयर आणि व्हिस्कीचा मनमुराद आस्वाद घेताना गोरे गोमटे तरुण, वृद्ध आणि स्त्री पुरुष असे सगळे जण दिसू लागले होते. सकाळी सकाळी फिशिंग साठी किंवा एकदिवसीय समुद्र पर्यटन करण्यासाठी गेलेले हौशी लोकं आपापल्या बोटी घेऊन किनाऱ्यावर माघारी येत होते आणि आम्ही आमची किनारा बघायची काही तासाची हौस पूर्ण करून पुन्हा समुद्रात नेणाऱ्या आमच्या जहाजावर नेण्याच्या मार्गाला लागलो होतो.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनियर
B. E. (Mech ), DIM
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply