व्यंगचित्रकार डेव्हीड लो यांचा जन्म ७ एप्रिल १८९१ रोजी झाला.
डेव्हीड लो यांचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला पण त्यांनी आपले करीयर इंग्लंडमध्ये घडवले. दुस-या महायुद्धाच्यावेळी डेव्हीड लो यांच्या व्यंगचित्रांचा प्रभाव होता. त्या काळात डेव्हीड लो यांची व्यंगचित्रे प्रकाशित झाल्यानंतर संपूर्ण जर्मन यंत्रणा कामाला लागत असे. त्याकाळी लो यांनी जर्मन हुकूमशहा अॅाडॉल्फ हिटलर, इटालीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी आणि रशियन हुकूमशहा जोसेफ स्टालिन यांच्यावर आपल्या व्यंगचित्रातून कडवट टीका केली होती.
२० सप्टेंबर १९३९ रोजी इव्हीनिंग स्टँण्डर्ड मध्ये प्रसिद्ध झालेले हिटलर आणि स्टालिन परस्परांना झुकून अभिवादन करतानाचे व्यंगचित्र प्रचंड गाजले होते. दोघांनी एकत्र येऊन पोलंडवर आक्रमण केल्यानंतर डेव्हीड लो यांनी आपल्या खास शैलीतून या व्यंगचित्रातून हिटलर आणि स्टालिनवर टीका केली होती. जर्मनीने त्यावेळी लो यांच्या व्यंगचित्रांविरोधात इंग्लंडकडे रीतसर तक्रारी केल्याचीही नोंद आहे. हिटलरच्या नाझी सैन्याने इंग्लंडवर चढाई केल्यानंतर कोणाकोणाला अटक करायची त्याचे ‘द ब्लॅक बुक’ तयार केले होते. त्यामध्ये लो यांचे सुद्धा नाव होते.
व्यंगचित्रकलेच्या ताकदीवर पक्ष उभा करून महाराष्ट्राला अस्मिता प्रदान करणारे व्यंगचित्रकार मा.बाळासाहेब ठाकरे यांच्यावर डेव्हीड लो यांच्या व्यंगचित्रांचा प्रभाव होता.
आपल्या ५० वर्षाच्या कारकिर्दीत या डेव्हीड लो यांनी १४ हजारपेक्षा जास्त व्यंगचित्रं काढली होती.
डेव्हीड लो यांचे निधन १९ सप्टेंबर १९६३ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply