नवीन लेखन...

कॅश व्हॅन

मी आणि माझी बायको दोघेही बँकर. म्हणजे नोकरी बँकेत होती.

बायकोची केशिअर कम क्लर्क अशी हायब्रीड पोस्ट.

बँक ऑफ इंडिया.

25 वर्षांपूर्वीचा अनुभव.

एखाद्या ब्रँचला थोडे दिवस रुळलो की ती शाखा तिथले कर्मचारी, तिथले काम आणि तिथले ग्राहक चांगले वाटायला लागतात.

अशावेळी बदली झाली की विनाकारण पोटात गोळा येतो. बापरेऽऽऽ

नाविन्याची मनात थोडीशी भीतीच असते. कदाचित नव्या ठिकाणचे लोक, कर्मचारी, कामाचे स्वरूप, ग्राहक, बॉस याची विनाकारण भीती वाटत असते. सर्वांना नाही.

काही कामे आम्हीच करू शकतो असा पुरुषी अहंकार पुरुष कर्मचाऱ्यांना काही वेळा असतो.

बायको ज्या शाखेत काम करत होती. ती ब्रँच करन्सी चेस्ट अशा स्वरूपातली होती. बायकोची स्टेट बँक नव्हती. त्यामुळे त्यांच्या बँकेच्या करन्सी चेस्ट कमीच. बँकेची सुमारे दोनशे किमी परिघातली  ही एकच करन्सी ब्रँच. परिसरातील प्रत्येक शाखेतील स्टाफने जरुरीप्रमाणे कॅश रॅमिटन्स घेऊन जाणे आणि आणणे यामध्ये वेळ, पैसा खर्च, कर्मचारी लागतात. हे टाळण्यासाठी बँकेने त्याकाळी चेस्ट ब्रँचला एक जाळीयुक्त व्हॅन पुरवली होती. त्या व्हॅनबरोबर एक सुरक्षा कर्मचारी, एक ड्रायव्हर दिवसभर हिंडून जरुरीप्रमाणे वेगवेगळ्या शाखेत एक कॅशिअर जावून ब्रँचेसची कॅशबाबत देवाणघेवाण करत असे.

कोणत्याही कामात एक प्रकारचा धोका हा असतोच.  शाखेत कॅशिअरला कॅशचे काम करताना सुरक्षेसाठी जाळीयुक्त स्वतंत्र केबिन असे. त्यामुळे जोखमीचे काम असले तरी खूप भीती वाटत नसते.

पण हेच काम करण्यासाठी बंदिस्त खोलीबाहेर जाणे म्हणजे फारच मोठा धोका. त्यात हजारो नाही तरी काहीवेळा करोडोची कॅश घेवून हिंडायचे म्हणजे किती मोठा धोका. ही फार मोठी कॅशिअरची जबाबदारी. तोच त्या रकमेसाठी उत्तरदायी.

बापरे बापरे बापरेऽऽऽ

हे काम त्या शाखेतील पुरुष कॅशिअर करत होते. हे भीमकाय काम तेच करू शकतात. बायका कॅशिअर करूच शकणार नाही. असा थोडासा अहंम भाव तिथल्या पुरुष कर्मचाऱ्यांमध्ये असावा.

हे काम प्रत्येक कॅशिअरचे आहे. आम्हीच का नेहमी जायचे असे आखडत ते स्त्री कॅशिअरवर रुबाब झाडत असायचे.

एक दिवस बायकोला आदेश मिळाला या शाखेत काम करायचे असेल तर, जरी तुम्ही स्त्री असला तरी, जर हे व्हॅन केशिअरचे भीमकाय कार्य करत असाल तर तुम्ही इथे कार्यरत राहू शकाल, अन्यथा तुमची इथून ताबडतोब बदली केली जाईल आणि बदल्यात पुरुष कॅशिअरची इकडे बदली करून घेवू.

ब्रँच घराच्या जवळ होती. कामात जम बसला होता. तेव्हा बदली हा बॉम्बगोळा पर्समध्ये घेवून हिरमुसलेली बायको घरी आली.

मी, माझी बायको आणि छोटी मुलगी असे घरी तिघेच.

व्हॅनबरोबर जिल्हाभर हिंडायचे म्हणजे घरी यायला खूप उशीर होणार. रात्र होणार. मुलीचे हाल होणार. रोज रोज उशीर होणार तर घरातल्या कामाचे काय कसे होणार. त्यात गार्ड ड्रायव्हर लोक अशिक्षित दारुडे असण्याची शक्यता. काही विचित्र प्रसंग आला तर. अंधारात रात्री व्हॅन लुटली तर.

अशी बरीच वेष्टणे (पैकींग) बायकोने घरी येता येता त्या बॉम्बगोळ्याला लावली होती.

सगळे शांतपणे ऐकून घेतले तासभर.

घाबरलेले मन माणसाला पंगू बनवते.

तो  ड्रायव्हर आणि तो सुरक्षा कर्मचारी पुरुष असले, तरी  तुझ्या रोजच्या बघण्यातला आहेत.

हजारों रूपयांची देवाण-घेवाण, सतत अपरिचित अनेक ग्राहकांशी तू रोज बोलतेस. त्यापेक्षा 10-20 लाखाची देवाण-घेवाण दिवसभरात फार तर 10/12 वेळा शाखांमध्ये अधिक जागृतपणे सुरळीतपणे करशील.

व्हॅनला जाळी आहे कुलूप आहे.

तू एकटी नाही तर तुम्ही तिघे असणार.

रोज पाळीपाळीने स्टाफ वेगळा वेगळा असणार.

तू नोकरी करतेस तशी त्या पुरुष लोकांनाही नोकरी करायची आहे.

ते पुरुष असले तरी माणसे आहेत. त्यांचेही कुटुंब असणार. तीव्र स्वरूपातली राक्षसी प्रवृत्ती लपून राहात नाही.

जाताना डबा, पाणी घेऊन जा. वेळ पडली तर वाटेत जेवण कर. रोजच पिकनिक वाटेल.

दरोडा पडलाच तर कॅश वाचवू नका, स्वतःचा जीव वाचवा. कॅशचा विमा केलेला असतो. ती जबाबदारी तुझी नाही. अशा बँकेच्या सूचना असतात. उशीर अगदी रोज होणार नाही.

घर आणि मुलगी मी सांभाळतो जर उशीर झाला तर.

याशिवाय तुला प्रवास भत्त्याची दक्षिणा मिळेल. त्या दक्षिणेतून ड्रायव्हर गार्डचे चाहा-नास्ता करत जा. कॅशची बरोबर तुझी काळजी करतील.

तेव्हा हे धाडस तुला वाटत असले तरी ते धाडस कर. काल्पनिक भीतीने घाबरू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तेव्हा ही जबाबदारी स्वीकार कर. जावून तर बघा महिनाभर. नाहीच वाटले, तर पुढे सांगता येईल की मला काही हे जमत नाही. त्यावेळी बघू काय होईल त्याप्रमाणे आणि आमच्या बाईसाहेब त्या कामाला जावू लागल्या.

रोज नवीन ब्रँच. नवीन लोक भेटायचे. ज्या शाखेत जायची तिथे महिला कर्मचारी अशा कामाला आल्याचे बघून त्यांना आश्चर्य वाटायचे. तिचे चाहापाण्याने स्वागत होत असे.

तिच्या ओळखी वाढल्या. कधी कधी जाणे-येणे असा 200-300 किमीचा प्रवास. तिला कानमंत्र दिला होता, तू एक गृहिणी आहेस तेव्हा डब्यात इतरांसाठी जरा जास्तीचा डबा घेऊन जात जा. त्यांच्याबरोबर पिकनिक कर. कॅश नसेल तर ढाब्यावर नास्तापाणी.

बायकोचा या कामात चांगलाच जम बसला. ड्रायव्हर गार्ड म्हणायचे मॅडम तुम्हीच येत जा रोज गाडीवर.

रोज प्रवासात बायकोला 7-8 तास मिळायचे. तिची वाचनाची हौस पुरी होत होती. अमूक महिलेने विमान उडवले. अमूक महिला ट्रक चालवते. अशीच जिल्हाभर आमच्या बायकोची त्याकाळी ख्याती पसरली होती. व्हॅनबरोबर हिंडणारी महिला कर्मचारी.

आतातर असे कोणते क्षेत्रच नाही जिथे महिला नाहीत. बघण्याचा दृष्टिकोन बदलला की सगळे सोपे सहज वाटते.

-सुनील भिडे

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

1 Comment on कॅश व्हॅन

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..