हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक, अभिनेते, संगीत रचनाकार छोटा गंधर्व यांचा जन्म १० मार्च १९१८ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळच्या भाडळी या गावी झाला.
छोटा गंधर्व यांचे खरे नाव सौदागर नागनाथ गोरे. छोटा गंधर्व यांनी १० वर्षे वयाचे असताना ’’प्राणप्रतिष्ठा’’ ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द ५० वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती. वसंतराव गोइत्रीकर, दत्तुबुवा बागलकोटकर, नरहरबुवा पाटणकर, धुळे येथील गायनशिक्षक पाध्येबुवा ह्यांनी छोटा गंधर्व यांना आरंभी गाणे शिकवले. सवाई गंधर्वांचीही थोडीशी तालीम मिळाली. कृष्णराव गोेरे, कृष्णराव शेंडे, मा. दीनानाथ ह्यांचाही काही सहवास आणि मार्गदर्शन त्यांना मिळाले. मात्र १९३९ साली ग्वाल्हेर घराण्याचे गायक सेंदेखाँ ह्यांचा गंडा बांधून सौदागर त्यांच्याकडे शिकू लागले. हे लाहोरकडचे उत्कृष्ट गवई तेव्हा मुंबईत राहत होते. पुढे १९४४-४५ साली ते कोल्हापूरला असताना भूर्जीखाँ यांच्याकडे गाणे शिकले. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागर नागनाथ गोरे यांना ‘छोटा गंधर्व’ हा किताब बहाल केला. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत.
आपल्या गायकीने अर्धशतकाहून अधिक काळ रंगभूमी गाजविणारे स्वरराज छोटा गंधर्व हे त्यांच्या दातृत्वासाठी सर्वपरिचित होते, १९४३ मधे त्यांनी काही कलाकारांसह ‘कलाविकास’ ही स्वतःची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे ‘देवमाणूस’ हे खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली. संगीत सौभद्रातील तसेच ‘सुवर्णतुले’तला कृष्ण, ‘संगीत मानापमाना’तील ‘धैर्यधर’, ‘मृच्छकटिका’तील ‘चारुदत्त’, ‘संशयकल्लोळ’ मधला अश्विनशेठ ह्यांसारख्या भूमिकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली.
पठ्ठे बापूराव या चित्रपटासाठी त्यांनी गण, आणि मुंबई नगरी ग बडी बांका, ही लावणी गायली होती. गणराजाला करु मुजरा, हा आणखी एक गण गायला. नंतर मात्र चित्रपटासाठी कधीच गायन केले नाही. आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणाऱ्या छोटा गंधर्व यांना आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. १९७९ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला. छोटा गंधर्व यांचे ३१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट