सिलोन रेडिओचे निवेदक गोपाल शर्मा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३१ रोजी चंदपूर बिजनोर उत्तरप्रदेश येथे झाला.
‘कोण हे गोपाल शर्मा?’ असा प्रश्न काहींच्या मनात येणं स्वाभाविक आहे. पण, सुवर्णकाळातील हिंदी संगीताची ज्यांची आवड, ‘रेडीओ’ श्रवणामुळे विकसित झाली, अशांना ‘गोपाल शर्मा’ हे नाव खचितच जवळचं वाटत असेल.
गोपाल शर्मा हे ‘रेडीओ सिलोन’वरचे एक महान ‘उद्घोषक’ होते. पन्नास आणि साठच्या दशकात रेडीओ सिलोनला लोकप्रियतेच्या चरमसीमेवर पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्या काळातली गाणी सुंदर होतीच. अर्थात, ती ‘इतर केंद्रांवरुनही’ वाजत होती. पण सिलोन रेडीओला जी अद्भुत जनप्रियता लाभली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे गोपाल शर्मा, दलजितसिंग परमार, विजयकिशोर दुबे, मनोहर महाजन, विमल कश्यप, ज्योती परमार , पद्मिनी परेरा यासांरखे सर्जनशील निवेदक आणि कार्यक्रम ‘पेश करण्याची’ त्यांची अनोखी शैली. नुसती एकापाठोपाठ एक छानछान गाणी लावणं हे फारच सोपं काम आहे. परंतु अत्यंत कल्पक असे कार्यक्रम तयार करुन, ही गाणी अतिशय आकर्षक सूत्रात गोवण्याची कला सिलोनच्या या निवेदकांना साध्य झाली होती. या सा-यांची आपल्या श्रोतृवर्गावर एवढी हुकुमत होती की, “हम जल्दी वापस आएंगे, आप कही जाइयेगा मत”, अशी विनवणी करायची आवश्यकताच त्यांना कधी भासली नाही. ‘जब आप गा उठे’, ‘दृश्य और गीत’, ‘अनोखे बोल’, ‘बदलते हुए साथी’, ‘बहनोंकी पसंद’, ‘जाने पहचाने गीत’, ‘साज और आवाज’, ‘हमेशा जवाँ गीत’, ‘पुरानी फिल्मों का संगीत’, ‘ये भी सुनीये’ असे अनेक कल्पक कार्यक्रम या मंडळीनी तयार केले. अमीन सायानींची ‘बिनाका गीतमाला’ ऐकणं हा तर रसिकतेचा मानदंडच समजला जावू लागला. ‘रेडीओ श्रवणानंदाचं सुवर्णयुग’ या लोकांनी घडवलं आणि रसिकांना अभिरुचीसंपन्न बनवलं. ‘गाणी ऐकणं’ हे केवळ ‘वेळ घालवण्यापुरतं मनोरंजन’ न राहता, त्या आस्वादनाला अभिजाततेचं कोंदण लाभलं.
‘गोपाल शर्मा’ यांनी काही खास शब्द वापरात आणले. ‘आवाज की दुनियाके दोस्तो’ हा शब्दप्रयोग त्यांचाच. (त्यांच्या आत्मचरित्राचं नावही हेच आहे. ) ‘शुभाशिष’, ‘शुभरात्री’, ‘बंधूवर’ हे शब्दही त्यांनीच प्रथम रेडीओवर आणले.
‘शहाजहाँ’ चित्रपटातील कुंदनलाल सैगल यांच्या एका गीतात, महंमद रफींचा अल्प सहभाग आहे. ‘अपनी पसंद’ या कार्यक्रमात गोपालजींनी हे गाणं लावलं आणि रफीचा आवाज असलेली ती ओळ त्यांनी श्रोत्यांना लागोपाठ तीन-चार वेळा ऐकवली… ‘सुनिए.. सैगलजी के साथ महंमद रफी!’ योगायोगानं साक्षात रफीसाहेब हा कार्यक्रम ऐकत होते. पुढे जेव्हा त्यांची आणि गोपाल शर्मा यांची भेट झाली तेव्हा त्यांनी ‘सलाम’ वगैरे न करता गोपालजींना थेट मिठीच मारली. ‘मी सैगलजींसोबत गायलो आहे, ही गोष्ट तुम्ही करोडो रसिकांपर्यंत पोहोचवली! आपका एहसान मैं कभी नहीं भुलूंगाl’ .. रफीसाहेब म्हणाले.
बिस्मिल्ला खाँसाहेब जेव्हा गोपालजींना भेटले तेव्हा त्यांनी गोपालजींच्या हातांचं चुंबन घेतलं आणि म्हणाले.. ‘या हातांमुळे माझी शहनाई कोट्यवधी श्रोत्यांपर्यंत जाते!’
गोपालजींचा ‘कल और आज’ हा कार्यक्रम राज कपूर , देव आनंद यासांरखे व्यग्र अभिनेतेही आवर्जून ऐकत. राज कपूरनं त्यांना एकदा विचारलं की, ‘गाण्यांवर अशी अप्रतिम रिसर्च तुम्ही कशी काय करु शकता?’
शंकर-जयकिशन यांनी गोपालजींना विचारलं.. ‘तुम्ही सतत एवढी सुंदर गाणी कशी काय लावता?’ गोपालजी म्हणाले, ‘मी जेव्हा आमच्या रेकाॕर्ड लायब्ररीतून चालत जातो तेव्हा ही गाणी ओरडून माझं लक्ष वेधून घेतात आणि जणू म्हणतात… ‘मुझे बजाओ!’
गोपाल शर्मा यांचे निधन २२ मे २०२० रोजी निधन झाले.
— धनंजय कुरणे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply