नवीन लेखन...

चाट आणि सँडविच

(चाट मधल्या चा चा उच्चार चार म्हणताना करतो तसा करावा)

तर चाट, अर्थात भेळपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, दही बटाटा पुरी, रगडा पॅटीस इ. इ. इ.. अर्थात जीभ चिक्कार चाळवणारे चविष्ट पदार्थ. सोबत भैयाच्या हाताची कमाल आणि खाऊन तृप्त झाल्यावर अखेरीस, उकडून कुस्करलेला बटाटा,. बारीक शेव आणि चाट मसाल्याच्या स्टफ्फिंगसह तोंडात जाणारी गोल पुरीची मुखशुद्धी.

आमच्या इमारतीच्या आजूबाजूला असणाऱ्या चाट कॉर्नर शिवाय अनेक इमारतींच्या मुख्य गेटच्या आडोशाला चाट ठेलेवाले अगदी नियमितपणे आपल्या ठेल्यासह उभे असतात. आणि त्या ठेल्यावर चाट पदार्थ खायला येणारे अगदी नेमाने, म्हणजे एखाद दिवशीही हे आपण खाल्ल नाही तर नेम मोडेल या भावनेने अगदी नित्यनेमाने तिथे हजेरी लावतात. चाट कॉर्नर तर दुथडी भरून वहात असतात. साधारण संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अगदी दहा अकरा वाजेपर्यंत हे चाट कॉर्नर खवैयानी भरभरून गेलेले असतात. आमच्या इमारतीपासून जवळच असलेल्या एका उंच टॉवरच्या मुख्य गेटाकडे एक चाटवाला भैया नियमितपणे संध्याकाळी आपला ठेला लावतो. मधला कोरोना काळ सोडला तर गेली अनेक वर्ष मी त्याला तिथे पहातोय. खायला येणाऱ्या स्त्री पुरुष प्रत्येकाशी, तो ठेल्याचा regular सभासद असल्यामुळे त्याची अगदी चांगलीच ओळख झालेली असते. आता ही खवैये मंडळी, ठेल्यावर आली की त्यांना आपल्या ऑर्डरचा क्रम सांगावा लागत नाही. जसं पानवाल्याकडे नेमाने येणाऱ्या गिऱ्हाईकाला, आपलं पान कुठलं, हे सांगावं लागत नाही, तशीच परिस्थिती चाट ठेल्यावर असते. त्या व्यक्तीला पाहताच भैयाजी नुसतं सूतोवाच करून डिश बनवायला घेतो. मला ना खाण्यापेक्षाही त्यांचं हे डिश बनवणं, बनवताना चालणारा त्यांचा हात, नेमक्या प्रमाणात त्यात पडणारे सगळे घटक आणि अखेरीस लयबद्ध हालचालीसह डिश मध्ये उतरणारं ते मिश्रण. पावभाजी बनवणाऱ्यालाही मी अगदी डोळे भरून पहातो. बायको अनेकदा हटकते,
“काय पहात राहिलायस त्याला”?(आता ‘ तो’ आहे तरी problem)
मी म्हणतो,
“अग, बघ ना त्याचा बनवण्याचा डौल, मस्त वाटतं बघायला.”
त्यावर बायको लगेच….,
“डौल म्हणे, मी घरी बनवताना, कधी नाही उभा रहात तो असा मला बघत ?”

मी विषय सोडून देतो झालं. तर या चाट गिऱ्हाईकांमध्ये शाळकरी मुलांपासून कॉलेजियनपर्यंत, ऑफिस मधून परतणारे स्त्री पुरुष, खवैयेगिरी करायलाच बाहेर पडलेली मंडळी, बाजारहाट करून परतणारे, पन्नाशी पलीकडचे स्त्री पुरुष अशा सगळ्या वयाचा समावेश असतो. मी ना अनेकदा या खवैयांचं निरीक्षण करत असतो. एक सवयच जडली आहे म्हणा ना. त्यांची डिश बनवून तयार होण्यापूर्वीच ही मंडळी त्यामध्ये शिरलेली असतात. तो बनवत असतानाच, मनाने तो पदार्थ त्यांच्या मुखात गेलेला असतो. आपल्या डिशकडे अगदी एकटक पहात असतात, आणि शेवटी बारीक शेव आंथरून ती हातात आली की त्यांचं हृदय भरून येतं, परमावधीचा आनंद मनात उसळतो. भेळ असेल तर पहिला घास, पाणीपुरी, शेवपुरी असेल तर पहिली पुरी तोंडात अलगद शिरली की पांचेंद्रिय आनंदून जातात. पहिल्या घासातून ही खवैये मंडळी पदार्थांची चव जोखतात आणि त्यानुसार,
“भैयाजी तिखा चटणी डालो थोडा”,. किंवा,
“भैयाजी थोडा मिठा चटणी और डालना”.

अशा सूचना करतात. भैयाजी तत्परतेने चवीत सुधारणा करतो, आणि मग भेळीचे घास किंवा चाटच्या सगळ्या घटकांनी भरलेल्या गब्दूल किंवा चपट्या पुऱ्या – (पसंतीनुसार) एकापाठोपाठ एक मुखात जाऊ लागतात. एक डिश स्वाहा करून झाली की सूऽऽऽसूऽऽऽ करत, नाकातून वाहाणारं पाणी थांबवत पुढची ऑर्डर दिली जाते, आणि ती बनेपर्यंत, मधल्या वेळात ही मंडळी शेजारीच असलेल्या सँडविचवाल्याकडे मोर्चा वळवतात. इथेही तेच, गिऱ्हाईकाला पाहून भैयाजी लगेच त्याचं फेवरेट सँडविच बनवायला घेतो. यामध्येही विविध चवीने खाणारे असतात.

“सिर्फ आलू, बटर और चटणी” किंवा
“प्याज बिलकुल मत डालना”. किंवा
“बीट और टमाटर बस्स, और कुछ नही” किंवा

टमाटर, काकडी, बीट, प्याज, सिमला मिर्ची सगळ्यासह खाणारेही असतात. यामध्ये एक मसाला टोस्ट सँडविच नावाचा प्रकार मिळतो. म्हणजे पावाच्या दोन्ही कापट्याना बटर, चटणी फासल्यावर त्यावर बटाटा, मटार, टोमॅटो घालून केलेल्या सुक्या भाजीचा गोळा ठेवला जातो. त्यावरती खवैयांच्या पसंतीनुसार टमाटर, काकडी, बीट, कांदा यांच्या पातळ कापट्यांचा पत्ते वाटतात तसे पावाच्या चार बाजूंनी डोंगर रचला जातो. अखेरीस त्यावर पावाची दुसरी कापटी ठेवून हे मसाला सँडविच टोस्टरमध्ये शिरतं. हा टोस्टर बहुधा लांब दांड्या असलेला hand टोस्टर असतो. उपलब्धतेनुसार कुणाकडे कोळशाची शेगडी असते तर कुणाकडे स्टोव्ह असतो. क्वचितच कुठे इलेक्ट्रिक टोस्टर दिसतो. hand टोस्टर मध्ये कुरकुरीत भाजून हे टोस्ट सँडविच त्याच्या समोर असलेल्या लाकडी फळीवर उतरतं. ही फळी किती स्वच्छ असते हा भाग वेगळा. असो, लांब सुरीने या सँडविचचे चार त्रिकोणी तुकडे होतात. सफाईदार हातांनी ते एका बटर पेपरवर ठेवून पेपरडिश मध्ये विसावतं. त्यावर पुन्हा एकदा बटरचा पातळसा थर पसरवला जातो आणि हिरव्यागार चटणीसह ते गिऱ्हाईकाच्या हातात येतं. सोबत सॉस म्हणून जे दिलं जातं त्याला टोमॅटोचं सॉस म्हणावं का? हा प्रश्न पडावा, असा त्याचा रंग असतो . जसं चाट खाऊन झाल्यावर सुक्या शेवपुरीची मुखशुद्धी असते, तशीच इथे उकडलेल्या बटाट्याच्या कापटीवर मिरपूड भुरभुरून दिली जाते. सुकी शेवपुरी म्हणा किंवा ही बटाट्याची कापटी म्हणा, भैया द्यायला विसरलाच तर खाणारे अगदी हक्काने मागून घेतात. आपण कसं, कुणाकडे पूजेला गेल्यावर प्रसाद आवर्जून मागून घेतो तसच. त्या बाबतीत भिडभाड बाळगली जात नाही.

तर, सँडविच घशाखाली उतरत असतानाच चाटवाल्याला आधीच दिलेली ऑर्डर तयार झालेली असते, आणि हे अट्टल खवैये पुन्हा एकदा चाटकडे आपला मोर्चा वळवतात. हा सिलसिला पोट आणि रसना तृप्त होईपर्यंत सुरू असतो अगदी.

प्रासादिक म्हणे

— प्रसाद कुळकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..