नवीन लेखन...

चहा पुराण……

खरं तर १५ डिसेंबर २००५ साली दिल्लीला चहादिनाची सुरवात झाली पण नंतर भारताच्याच सिफारशीमुळे २०१८च्या सुमारास uN ने २१ मे हा चहादिन म्हणून घोषित केला . तरी आपल्या आजूबाजूला लोकं ,१५ डिसेंबरच चहादिन म्हणून साजरा करतात. असू दे .. दिवस कुठला ही असला तरी चहा पिणं हे काहींच सेलिब्रेशनच असतं !

मी पहिला चहा कधी प्यायले मला आठवत नाही. तुम्हाला आठवतोय का? लहान असतांना कंपलसरी शारकोफेरॅाल (Sharkoferrol) घालून दूध प्यायला लागायचे. त्यांत खूप व्हिटॅमिन्स वगैरे असायचे म्हणे!….. तेव्हा बोर्नव्हिटाचे दिवस अजून आले नव्हते ना!कधी तरी मी बाहेर गावी गेले असतांना ,सगळ्यांच्याबरोबर चहा प्यायले ! आता एकदा चहा प्यायल्यावर ते शारकोफेरॅालचे दूध कोणी पिईल कां सांगा?लग्नानंतर तर चहा करायला लागल्यामुळे नेहमीच प्यायला लागले.आवडतो मला चहा! ५ प्रकारचे चहा असतात . काळा , हिरवा, पांढरा.. आणि असेच काही तरी.. …..

आमच्या जवळ एक हॅाटेल झाले आहे तिथे जाहिरात केली आहे ….”आस्वाद घ्या….१०१ प्रकारचे चहा…”

असे काय प्रकार असतील हो?…..मला उत्सुकता आहे ,पण ५०० रूपयाला दोन कप चहा …..२ तास प्यायला.. मला वेळही नाही, माझ्याकडे चहासाठी इतके पैसेही नाहीत, आणि आवडही नाही, आणि हो … कंपनी पण लागते हो असा चहा प्यायला.. आता ते वयही राहिले नाही..
ते काही असो.. पण आपण घरी बनवलेल्या, वाफाळलेल्या, आपल्या टेस्ट च्या चहाची सर यातल्या कशालाच येणार नाही ………हे नक्की!

प्रत्येकाची चहा करण्याची पध्दत वेगळी असते. मुंबईत जनरली पाणी उकळायला लागल्यावर त्यात साखर आणि चहा घालून झाकून ठेवतात. पिशवीचे किंवा गोठ्यातले दूध उकळवून ,ते गरम दूध,त्या गाळलेल्या चहात घालायचे,अशी पध्दत आहे. हा चहा किती वेळ झाकून ठेवायचा, दूध किती घालायचे ते प्रत्येकाचे ठरलेले असते. काहींना स्ट्रॅाग चहा लागतो, रंग डार्क काळा लागतो, दूध कमी हवे असते, काहींना अगदी लाईट ,पांढरा दिसणारा चहा हवा असतो. काहींना सकाळी एकदाच मोठ्ठा कप भरून चहा हवा असतो, तर काहींना कटींग चहा ,थोड्या थोड्या वेळांनी लागतो.काहींना मसाला चहा लागतो, काहींना पावसाळ्यात फक्त गवती चहा घालून लागतो, तर काहींना थंडीत आलं घालून चहा लागतो. काहींना नेहमीच दूध पाणी,आलं, मिरी, वेलची, दालचिनी वगैरे कुटून घालून,खूप उकळवून चहा प्यायला आवडतो. तो चहा करणाऱ्यांकडे पाहून मला नेहमी बिरबलची खिचडी आठवते.. चहा करायला ते इतका वेळ लावतात,की सगळी चहाची तल्लफच निघून जाते! मागे मी एकदा माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. तिची शाळकरी मुलगी नुक्ताच चहा करायला शिकली होती . कौतुकाने तिने चहा करायला ठेवला.आणि थोड्या वेळानी बाहेर येऊन बसली. १० मिनींटांनी तिने ,आत बाहेर करायला सुरवात केली. पण चहा आणायचं नांव नाही. आम्ही आपले बघतोय वाट … तिच्या चहाची ! शेवटी तिच्या आईने विचारले … काय झाले? … म्हणाली “अजून चहा खाली नाही बसला. तू म्हणाली होतीस ना आपोआप खाली बसतो मग गाळायचा…. म्हणून वाट पहातेय”… “अग पण किती वेळ झाला? चमच्यानी ढवळ आणि गाळ”… आईचा प्रेमळ सल्ला! तो येई येई पर्यंत इतका गार झाला होता कि काही विचारू नका. कसा होता?….साखर कमी झाली तर तुम्ही घालाल हो वरून, पण चहात चहाची पावडरच कमी असली तर कशी घालाल वरून?….. पण काय करणार? ते गार झालेले गोड पाणी आम्हाला कौतुक करत प्यायला लागले… तोंड हसरे ठेऊन!

बाहेरून आल्यावर , प्रवासातून आल्यावर ,कोणीतरी आयता गरम चहा दिला कि बरे वाटते ना?…अनेकांना चहाबरोबर बिस्किटं लागतात. कोणीतरी कधीतरी सांगितले होते,……..वॅाट्स ॲपवर हो !..सकाळी नुस्ता चहा प्यायला तर ॲसिडीटी होते,आधी पाणी प्यावे , मग चहाबरोबर बिस्किट खावे. .. मी करते बुवा तसेच! खारी ,बेकरीतली,बिस्किटं, टोस्ट,बटर या गोष्टी माझ्या आवडीच्या! कधीतरीच मसाला चहा मला आवडतो. रोज नाही. त्यातल्या चहाची चव राहिलं इतपतच मसाला घातलेला मला आवडतो. काढ्यासारखा उकळलेला नाही आवडत. अशा खोड्या प्रत्येकाच्या असतात.

काहींना कपात साय अजिबात आवडत नाही !गाळणे मागून घेतात, गाळून मगच पितात ! तर काहींना साय घालून आवडतो. काहींना गुळाचा चहा आवडतो . तर काहींना बिनसाखरेचा आवडतो.काहींना बासुंदीसारखा गोड, नी दाट दुधाचा आवडतो.

काहींना दर वेळी ताजाच चहा लागतो, तर काहींना गाळलेला काळा चहा दिवसभर तसाच ठेऊनही चालतो.
पाहिलतं .. साध्या चहात पण किती प्रकार झाले? चहा कसा प्यायचा हे पण ठरलेले असते प्रत्येकाचे! काहींना नेहमीच्या ट्रॅडिशनल कपबशीतून प्यायला आवडते. म्हणजे अगदी बशीत ओतून , फुरऽ फूरऽ करत, आवाज करत! काहींना कपबशी लागते, पण कपानी प्यायला आवडते. बशी कपाखाली धरायला आवडते. काहींना छोटे “मग “आवडतात, काहींना भलेलठ्ठ, म्हणजे हातात धरल्यावर हात दुखेल अशा “मग “मधून प्यायला आवडते. त्या मग वर काहीतरी स्टायलिस्ट लिहीलेले असते .किंवा त्याचा आकार वेगळा असतो.

काहींना अगदी छोटे भातुकली सारखे ,डिझाईनचे कप , “मग” आवडतात. काहींना रंगाचे आकर्षण असते, काहींना मटेरियलचे!
काहींना काचेचे ग्लास आवडतात, तर काहींना रेल्वेत मिळतात तशा मातीच्या भांड्यातून , कुल्हड मधून चहा प्यायला आवडते.
काहींना बाहेर पडल्यावर अमृततुल्य चहामध्ये डोकावल्या शिवाय चैन पडत नाही , तर काहींना टपरीवर मित्रांच्या गराड्यात कटींग चहा प्लॅस्टीकच्याकपामधून ,प्यायल्याशिवाय मजा येत नाही.

गरम चहाचा आईस टी कधीपासून झाला कोणास ठाऊक! पण हॅाटेलात वेगवेगळ्या स्वादाचे , मोठ्या ग्लासमधून ,हळूहळू घोट घेत चहा पिणारा एक तरूण गट आहे. फॅशन म्हणून पितात, ड्रिंक म्हणून पितात , शो म्हणून पितात की चवीसाठी पितात?……माहित नाही… पिओत बापडे!
डाएट करणाऱ्यांना ग्रीन टी हवा असतो, बीन दुधाचा , बीन साखरेचा! मध चालतो त्यांना त्यात!

प्रांताप्रमाणे , वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या ,चहाची महती ……वेगळी ,खासियत ……….वेगळी.. त्यावरूनच १०० प्रकारचा चहा म्हणत असतील बहुतेक! चहा पिणारे कॅाफि पिणाऱ्यांना नांव ठेवताात तर कॅाफि पिणारे चहाकडे ढुंकून पहात नाहीत. त्यांनी आयुष्यात कधी चवही घेतलेली नसते. इतके ते उदासिन असतात चहाच्या बाबतीत चहाचा इतिहास, त्याचे फायदे, तोटे , प्रकार सर्व आपल्याला ह्या चहाच्या आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने वाचायला काहींना नक्कीच आवडेल. गुग्गल हवी ती माहिती देतो आपल्याला! चहाच्या मळ्यातील लोकांच्या प्रश्नांकडे इतरांचे लक्ष जावे हा हेतू असे दिवस ठरवण्यामागे असतो.आपण त्याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करतो. कारण आपल्याला मतलब असतो फक्त आपल्या रोजच्या सकाळ दुपारच्या चहाशी… हो ना?

-चित्रा मेहेंदळे

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..