चहा हे उल्हसित करणारे नैसर्गिक पेय आहे. चहामध्ये कॅलरी नसल्यामुळे तुमची सुंदरता टिकवण्यासाठी आणि तुम्हाला फिट राखण्यासाठी चहा हे परफेक्ट पेय आहे. आपल्याकडे बहुतांश (सुमारे ९०%) लोक पितात त्याप्रमाणे म्हणजेच दूध मिश्रित चहा दिवसातून चार कप घेतल्यास आपल्याला सुमारे १७% कॅल्शिअम, ५% झिंक, २२% बी जीवनसत्व, ५% फॉलिक अॅसिड मिळते.
चहा म्हणजे ना, आपला वीक पॉईंट. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चहा लागतो असं नाही म्हणता येणार, कारण परदेशातील लोकांप्रमाणे रात्री जेवणानंतर चहा पिण्याची फॅशन अजून तरी आपण स्वीकारलेली नाही. पण चहाचं नाव जरी काढलं ना तरी चहाचा एक तरी घोट पोटात जावा म्हणून आपण धडपडू लागतो आणि तो ग्रहण केल्यावर अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं. चहा मिळाली नाही तर आपण किती अस्वस्थ होतो, नाही का? सकाळी उठल्यावर अंघोळ नाही करता आली तर चालेल, पण चहा पाहिजे. ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर वेध लागतात ते टी ब्रकेचे. तोपर्यंतचा प्रत्येक मिनिट तासाप्रमाणे वाटू लागतो. घरात आलेल्या पाहुण्याला एक कप चहा दिला म्हणजे उत्तम पाहुणचार केल्याप्रमाणे चहासोबत रमलेल्या गप्पांची तर बातच काही और असते. हॉटेलात जाऊन एक-एक कप चहा मागवायचा आणि तासन्तास गप्पा मारत बसायचं, हा तर आपल्यापैकी कित्येकांच्या विकएण्डचा फंडा असेल. याच चहासोबत होणाऱ्या गप्पांधून कधीकधी चहाच्या पेल्यातील वादळेही होतात आणि संपतातही. अशा या पराक्रमी चहाने वादळ उठवलं नसतं तरच नवल.
चहाच्या पेल्यातील वादळ
साडेतीनशे-चारशे वर्षापूर्वी अमेरिकेत ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिशांनी आधी तेथील लोकांना चहाचं व्यसन लावलं आणि कालांतराने उत्पन्न वाढविण्यासाठी अमेरिकेत आयात होणाऱ्या चहावर जबरदस्त आयात कर लावायला सुरुवात केली. दररोजच्या गरजेची वस्तू महाग झाल्यामुळे अमेरिकेतील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषाचा उद्रेक १६ डिसेंबर १७७३ रोजी झाला. त्या दिवशी ३४२ चहाच्या पेट्या घेऊन एक जहाज अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील बोस्टन बंदरात आले होते. लोकांनी त्या जहाजावर हल्ला करून सर्व चहाच्या पेट्या समुद्रात फेकून दिल्या. ही घटना ‘बोस्टन टी पार्टी’ या नावाने प्रसिध्द आहे. या घटनेचे पडसाद अमेरिकेच्या इतर राज्यांतही उमटले. यातून स्वातंत्र्ययुध्द सुरू होऊन अमेरिका ब्रिटिशांच्या सत्तेतून मुक्त झाली, अशी ही चहाची किमया.
चहाचा शोध म्हणजे निव्वळ योगायोग
चहाचा शोध कसा लागला असेल?
पहिला चहा कोणी बनवला असेल? या प्रश्नांची उत्तरं अजुनही ठामपणे देता येत नाहीत. चहाचे मूळ स्थान निश्चितपणे माहीत नसले, तरी ते चीन आणि भारतातील आसाम राज्य असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. चहाचा शोध योगायोगाने लागला, असे म्हणता येईल. प्राचीन काळी एक चिनी व्यक्ती पिण्यासाठी पाणी गरम करत होता. सरपण म्हणून झाडाची वाळलेली पाने, फांद्या, काटक्या यांचा वापर तो करत होता. नकळतच उकळत्या पाण्यात काही पाने पडली. त्याच्या लक्षात आल्यावर त्याने ती काढूनही टाकली. ते गरमागरम पाणी पिताना त्याला उल्हसित वाटलं आणि त्यानंतर उकळत्या पाण्यात ‘ती’ वाळलेली पाने टाकून, नंतर पाण्यातून पाने बाहेर काढून ते पाणी गरमागरम पिण्याची प्रथा सुरू झाली. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार, इ. स. २७०० वर्षांपूर्वी चीनमध्ये शेन नुंग राजाची सत्ता होती. एका युध्द मोहिमेवर असताना त्याचा जंगलात मुक्काम होता. त्यावेळी पाणी उकळताना त्यात एका झाडाचे पान पडले. त्या पाण्याच्या स्वादाने राजा मोहून गेला आणि त्यानंतर दररोज तो त्या झाडाची पाने टाकून उकळवलेले पाणी पिऊ लागला. योगायोगानेच चांगल्या गोष्टींचा शोध लागतो, हेच खरे.
‘चाय’ हा शब्द आपल्याला कितीही आपला, बम्बईया वाटत असला तरी तो शब्द भारतीय नाही. चीनमधील कॅन्टन या प्रांतातील नागरिकांनी चहाच्या वृक्षाचे नामकरण त्यांच्या बोली भाषेतील ‘चाय’ या शब्दाने केले आहे.
चहाच्या झाडाची उंची काय असते? असा प्रश्न विचारल्यावर कोणीही म्हणेल, चहाचं झाड काय म्हणताय, झुडुप म्हणा आणि उंची असेल साधारण तीन फुटांची. सर्वसामान्यांचा असा समज असला तरी नैसर्गिकरितीने वाढणाऱ्या चहाच्या वृक्षाची उंची साधारण ५०-६० फूट असते, परंतु, दोन पाने, एक कळी असा समुच्चय तोडण्यास सोयीस्कर व्हावा म्हणून त्याची उंची तीन फुटांच्या आसपास ठेवली जाते. वर्षभर सतत थोडा-थोडा पडणारा पाऊस (१५० सेमी), २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन चहाच्या लागवडीसाठी उत्तम मानली जाते. लागवडीनंतर आठ ते दहा वर्षांनी चहाचे उत्पन्न मिळत राहते. त्यानंतर उत्पन्न कमी-कमी होत जाते. चहाच्या झाडाचे आयुष्य साधारण ५० ते ६० वर्षे असते. चहा लागवडीसाठी लागणारी जमीन आणि हवामान वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे जगातील पुष्कळ देशांमध्ये चहाची लागवड यशस्वी झालेली नाही. परंतु, चहाच्या लागवडीसाठी लागणारी जमीन आणि हवामन भारताला लाभल्यामुळे सर्वाधिक चहा उत्पादन करणारा देश म्हणून भारताची ख्याती आहे. असे असले तरी चहाची देशांतर्गत मागणीही भरपूर आहे. भारतातील चहाच्या एकूण उत्पादनांच्या ८० टक्के चहा देशातच विकला जातो आणि फक्त २० टक्के चहा निर्यात केला जातो.
सन १९५५ मध्ये जागतिक पातळीवरील उलाढालीमध्ये ३८ टक्के चहा निर्यात करून भाताने प्रथम क्रमांक मिळवला होता. परंतु भारताच्या देशांतर्गत मागणी पूर्ण केल्यानंतर उरलेला चहा निर्यात करण्याच्या धारेणामुळे भारताचा प्रथम क्रमांक टिकून राहू शकला नाही. भारत प्रथम क्रमांकावरून घसरून आता चौथ्या क्रमांकावर आला आहे.
भारतीय चहाचे उत्पादन ईशान्य अणि दक्षिण भागात विभागले आहे. ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम आणि दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यांतील हवामान चहाच्या लागवडीला अनुकूल आहे. भारतातील चहा उत्पादनात ईशान्य भरताचा हिस्सा ७५ टक्के आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दार्जिलिंग चहा श्रेष्ठ दर्जाचा समजला जातो.
हवेहवेसे वाटणारे औषध
चहाचा फक्त सुवास जरी आला, तरी आपल्याला ताजेतवाने वाटते. चहा हे उल्हसित करणारे नैसर्गिक पेय आहे. चहामध्ये कॅलरी नसल्यामुळे तुमची सुंदरता टिकवण्यासाठी आणि तुम्हाला फिट राखण्यासाठी चहा हे परफेक्ट पेय आहे. आपल्याकडे बहुतांश (सुमारे ९५ टक्के) लोक पितात त्याप्रमाणे म्हणजेच दूध मिश्रित चहा दिवसातून चार कप घेतल्यास आपल्याला सुमारे १७ टक्के कॅल्शिअम ५ टक्के झिंक, २२ टक्के बी जीवनसत्व, ५ टक्के फॉलिक अॅसिड मिळते. शरीराच्या सामान्य वाढीसाठी आवश्यक असणारे मॅग्नेशिअम आणि शरीरातील द्रव्यांचे समतोल राखण्यासाठी मदत करणारे पोटॅशिअम यांचा शरीरास पुरवठा करणारा चहा हा एक उत्तम स्त्रोत आहे.
आपल्या या बदलत्या जीवनशैलीत आपण प्रदूषण आणि अतितीव्र सूर्यप्रकाश या हानिकारक घटकांच्या वारंवार सहवासात येतो. यामुळे आपल्याला हृदयविकार, कॅन्सर यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. यांपासून संरक्षण करण्यासाठी अॅण्टीऑक्सिडण्ट घेण्याची आवश्यकता असते आणि चहा हे एक उत्तम अॅण्टीऑक्सिडण्ट आहे एका सफरचंदामध्ये जेवढ्या प्रमाणत अॅण्टीऑक्सिडण्ट असतात त्याच्या आठपटीने जास्त अॅण्टीऑक्सिडण्ट ३ कप चहामध्ये असतात.
जागतिक पातळीवर केलेल्या संशोधनात असे निष्पन्न झाले आहे की, चहामधील विविध घटकांमुळे हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. सौदी अरेबियामध्ये केलेल्या १७६४ स्त्रियांच्या परीक्षणानुसार, चहा न पिणाऱ्या स्त्रियांपेक्षा चहा पिणाऱ्या स्त्रियांमध्ये कार्डीओव्हॅस्क्युलर आजाराचे प्रमाण १९ टक्क्यांनी कमी होते.
चहापेक्षा कॉफीमधील कॅफिनचे प्रमाण अधिक असते, हे तर सर्वश्रुत आहे. पण कॉफीपेक्षा चहामधील कॅफिन अर्ध्या प्रमाणात असते, हे तुम्हाला माहित आहे का? बहुतेक सर्वच पदार्थांमध्ये आणि पेयांमध्ये निसर्गत:च कॅफिन थोड्याफार प्रमाणात असते. या कॅफिनमुळेच शरीराला ताजेतवाने वाटते. चहाची प्रमुख जमेची बाजू म्हणजे, इतर पदार्थ आणि पेयांपेक्षा चहामधील कॅफिनचे प्रमाण अत्यल्प असते. एका संशोधनानुसार, कॅफिनचे योग्य प्रमाण असलेला ३०० ग्रॅम (७कप) चहा दररोज पिणे बहुतांश व्यक्तींसाठी सुरक्षित आहे. आपण बरेचदा पाहतो की, आपल्याला अतिशय आवडणारे फास्टफूडसारखे चवदार पदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात आणि म्हणूनच ते पदार्थ खाणे टाळणंच योग्य ठरतं. परंतु, उत्तम स्वाद आणि तरीही आरोग्याकरिता अतिशय फायदेशीर असा चहा दररोज प्यायला काहीच हरकत नाही.
टी ब्रेक
टी ब्रेकची परंपरा सुमारे २०० वर्षांपूर्वीची आहे. पूर्वी कामगार सकाळी ५-६ वाजता कामाला सुरुवात करत. त्यामुळे त्यांना चहा आणि नाश्ता करण्यासाठी सकाळी एक ब्रेक दिला जाई. काही कामगार संध्याकाळीही हा ब्रेक घेऊ लागले. टी ब्रेकमध्ये घेतलेल्या चहा आणि विश्रांतीमुळे कामगार पुन्हा ताजेतवाने होऊन कामाला लागतील, अशी कल्पना त्यामागे होती.
संध्याकाळचा चहा
चहा कोणी व कधी प्यावा या विषयीचे काही नियम नसले तरी सकाळी आणि संध्याकाळी चहा हवाच असा सर्वांचाच अट्टाहास असतो. ‘संध्याकाळचा चहा’ या संकल्पनेचं श्रेय जातं १८ व्या शतकातील बेडफोर्ड या ब्रिटीश सरदाराच्या ॲना नामक पत्नीला दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यामधील काळात भूक शमविण्यासाठी संध्याकाळी ४-५ वाजता चहा प्यायला हवा, असं मत तिने मांडलं होतं आणि थोड्याच काळात ती जणू प्रथाच पडली.
चहा सर्व्ह करणारं पहिलं हॉटेल
१९६४ साली इरॅटेड ब्रेड कंपनी नामक दुकानाच्या एका संचालिकेने त्यांच्या हॉटेलमध्ये खाण्याच्या पदार्थांसोबत चहा सर्व्ह करण्याचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव मान्य होऊन इरॅटेड ब्रेड हॉटेलमध्ये सर्वप्रथम चहा सर्व्ह केला गेला आणि त्यानंतर हॉटेलमध्ये चहा विक्री करण्याची फॅशन सुरू झाली. याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला.
त्याकाळात मुलींनी एकटं फिरणं, हॉटेलांमध्ये एकटं जाणं लज्जास्पद मानलं जाई. मुलगी घराबाहेर पडताना तिच्यासोबत नेहमी एक केअरटेकर असे, पण अशाप्रकारचे हॉटेल सुरू झाल्यावर तिथे मुलींना एकटं जाण्याचं स्वातंत्र्य मिळू लागलं आणि नारी मुक्ती चळवळीचा पाया घातला गेला.
Leave a Reply