माणसांच्या जीवनातील एक अविभाज्य ‘पेय’ म्हणजे चहा.. जो त्याला अगदी लहानपणापासून ते उतारवयापर्यंत, तिन्ही त्रिकाळ साथ देतो..
बाळाला कळायला लागलं की, आई कौतुकानं त्याला आपल्या कपातील चहा, बशीत ओतून देते.. ते शाळेत जायला लागलं की, सकाळी चहाबरोबर बिस्कीट हे ठरलेलंच असतं..
कुणा पाहुण्यांकडं गेलं की, आमचा बंड्या चहा पीत नाही हे अभिमानाने सांगितलं जातं.. फारच आग्रह केला तर अर्धा कप चहा मिळतो..
थोडा मोठा झाल्यावर तो स्वतःच चहा करु लागतो.. व आई-वडीलांना देऊन शाबासकी मिळवतो.. काॅलेजमध्ये गेल्यावर कॅन्टीनचा चहा, हा गप्पा मारण्यासाठीचं हक्काचं ठिकाण होतं..
कधी मित्रांबरोबर टपरीवर चहा देखील भन्नाट वाटतो. इराण्याच्या हाॅटेलमधील वेगळ्या चवीचा चहा जिभेवर रेंगाळत राहतो.. रात्री अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून घेतलेला चहा रात्री उशीरापर्यंत जागवतो..
हिवाळ्यात सकाळचा गरम वाफाळलेल्या चहाचा कप आपल्या हाताला उब देतो.. पावसाळ्यात बाहेरुन भिजून आल्यावर, आलं घालून केलेला चहा अंगात उष्णता, निर्माण करतो.. उन्हाळ्यात दिवसा जरी थंड पेय घेतलं तरी सकाळी व संध्याकाळी, चहा हा लागतोच!!
मैत्रिणीसोबत हाॅटेलमध्ये गेल्यावर मनातून चहाचीच इच्छा असताना, इम्प्रेशन मारण्यासाठी महागडी काॅफी मागवली जाते.. नोकरीमध्ये कामातून विरंगुळा व पाय मोकळे करण्यासाठी चहाचंच ‘निमित्त’ होतं..
मुलगी पहाताना कांदेपोहे खाऊन झाल्यावर ट्रेमध्ये चहा घेऊन येणाऱ्या भावी पत्नीला पहावं की, चहाचा कप उचलावा याचा ‘लोच्या’ होतो..
संसार सुरु होतो. तिनं सकाळी दिलेला पहिला चहा अमृतासमान भासतो.. काही वर्षांनंतर कुटुंब वाढल्यावर, तोच चहा घेणं ही एक साधारण क्रिया होते..
कोणी शेजारी पाजारी, पाहुणे रावळे आले की, घेणार का? असं न विचारता पहिल्यांदा चहाच होतो.. रविवारी सकाळी उशीरा उठल्यावर चहा, जेवण देखील उशीराच होतं.. दुपारी डुलकी झाली असेल तर, उठल्यावर चहाच लागतो..
चहाचे प्रकार जसे बदलतात, तशा त्यांच्या चवीतही बदल होतो.. कोरा चहा, ग्रीन टी घेतल्याने वजन कमी होतं असं म्हणतात.. गवती चहाने, सर्दी जाते.. लेमन टी, आरोग्यदायी असतो.. गुळाचा चहा आरोग्यावर दुष्परिणाम करीत नाही..
कधी चहाचं प्रमाण वाढलं तर डाॅक्टर, तब्येतीसाठी तो कमी करायला सांगतात… पन्नाशीनंतर शुगर जाणवली तर बिनसाखरेचा चहा सुरु होतो..
कुणाकडे गेल्यावर चहा करण्याआधी साखर नको असं सांगावं लागतं.. सत्तरीनंतर चहा हा रंगीत गरम पाणी पिल्यासारखाच वाटू लागतो.. चहाची भेट दिवसातून एकदाच, फक्त सकाळी होऊ लागते.. त्यातूनही सोबत शुगर फ्री बिस्कीट्स असतील तर लहानपणीच्या आठवणी दाटून येतात….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१५-१२-२१.
Leave a Reply