खुर्चीसाठी पोकळ बाता
खुर्ची राजकीय ‘खल ‘बत्ता
खुर्ची आहे माझी माता
खुर्चीच सर्वस्व आता ॥ १ ॥
खुर्ची आहे तिखट मिरची
आली जवळ तरीही दूरची
खुर्चीसाठीच प्रवास माझा
खुर्ची सोय माझ्या पोटाची ॥ २ ॥
खुर्चीसाठी हो पुण्याई गाठी
खुर्ची माझी मी खुर्चीसाठी
जरी प्रवेशली माझी साठी
खुर्ची स्पर्धेत मी ना पाठी ॥ ३ ॥
दिल्यात तरीही खाईन लाथा
खुर्चीसाठी शर्यत आता
थकलो नाही धावता धावता
खुर्ची मिळो निदान मरता मरता ॥ ४ ॥
खुर्चीचे गुण गाईन आवडी
खुर्चीसाठी करेन लाडीगोडी
खुर्ची मिळताच मारेन दडी
पिईन ताडी नि चढेन माडी ॥ ५ ॥
दर्शनास आतुरलो खुर्चीदेवी
तुला भक्ताची कीव ना यावी?
तू वाटतेस सदा हवी हवी
सदा सतेज कशी नवी नवी ॥ ६ ॥
खुर्चीविना सोडतो मी सुस्कारे
विसरलो जणू मी खुर्चीपायी सारे
खुर्चीसाठी सोडून निःशंक सारे
जय जय खुर्चीचा जय बोला रे ॥ ७ ॥
-यतीन सामंत
Leave a Reply