आषाढ लागतो ना लागतो तोच आखिल वारकरी संप्रदायात उल्हास दाटून येतो. ही सात्विक कुणकुण जणू एक वैश्विक चैतन्याचं पर्वच ठरते नी ह्या चैतन्याची खरी मुहूर्तमेढ रोवली जाते ती जेष्ठ वैद्य सप्तमी पासून सुरु होणाऱ्या वारीच्या रुपाने.
वारीला किमान साडेसातशे वर्षाची परंपरा लाभलीये असे म्हणतात .ह्या वारीचं प्रस्थान होतं ते आळंदीहून. जेव्हा श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची पालखी अश्वारुढ होते.
तिचे पुजन होऊन ती मिरवत गावोगाव मजल दरमजल करीत येते. प्रत्येक गावी तिचं साग्र पुजन भगव्या पताका लावून, रांगोळ्यांच्या पायघड्या घालीत ,टाळ ,विणा ,मृदुंगाच्या गजरात ,चिपळ्या नी कुठे तर झांज आणि लेझीमच्या तालात ,गळ्यात माळ ,डोईवर तुळशीचे वृंदावन घेऊन….. नी” ज्ञानोबा माऊली तुकाराम
ह्या जयघोषात केले जाते.
वेगवेगळ्या भागातून संत नामदेव ,संत तुकाराम ,संत चोखामेळा ,संत गोरा कुंभार ,संत सावतामाळी , संत जनाबाई …इत्यादींच्या दिंड्या सुमारे २५० कि.मी.प्रवास करून उन ,वारा ,पाऊस …,कुठे वादळ ही तहान ,भुक , ह्या कशा कशाचीच पर्वा न करता ,पायी चालत ,न थकता ,न रापता , देवशयनी एकादशीच्या आदल्या दिवशी त्या माऊलींच्या दर्शनासाठी पंढरपूरात येऊन दाखल होतात. ह्या प्रवासादरम्यान रोजच सकाळी भुपाळी , पुजा ,आरती , किर्तन ,हरीपाठ ,प्रवचन यांनी प्रबोधन होत जाते . आखिल जग भक्तिमय होते .त्यातही रिंगण सोहळा म्हणजे नेत्रदीपक ,नयनरम्य ,आणि चैतन्यमय अनुभव असतो. ह्याच देही ह्याची डोळा पहावं असं सुख असतं.
वारी केली म्हणजे ह्या जन्म-मृत्यू च्या फे-यातून ह्या नश्वर देहाला खरोखरच मुक्ती मिळते हा विचार सर्वश्रुत आहे.
असा हा वारीचा एकंदरीत आलेख आहे….!!
पण वारी ही फक्त एक परंपरा नाही. तर ती लोकगाथा आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
वारी हा वैश्विक सोहळा आहे.
ज्याप्रमाणे आई लेकरांची संकटं ,दुःख ,अडचणींचे निवारण करते.त्याच प्रमाणे ह्या महाराष्ट्राची माऊली …
हा कानडा विठ्ठल , हा सावळा पांडुरंग सुध्दा आपल्या ह्या लेकरांच्या संसारातल्या अनंत अडचणी निवारुन,त्यांची गा-हाणी ऐकुन घेत ,त्याचं साकडं सोडवत त्यांना कुशीत घेईल ,हा अगम्य नी गाढा ,दृढ विश्वास प्रत्येक वारक-याच्या मनात ठायी ठायी वसलेला असतो.
आषाढी हे आखिल जनांचं चैतन्यमय रुप आहे.
आषाढी म्हणजे भजन किर्तनांची रेलचेल.
आषाढी म्हणजे भारुडं ,पथनाट्य , गवळण नी निरुपण .
आषाढी /वारी म्हणजे नाद, लय ,ताल यांचं मिश्रण .
वारी म्हणजे पावलागणिक शिस्तबद्धता .
कुठे भालदार ,कुठे चोपदार ,कुठे मानाच्या दिंड्या ,कुठे बाकी दिंड्या ,कुठे वृदांवन पथक ,कुठे लेझीम पथक…यांचं अचूक नियोजन.
आषाढी खरं तर एक आदर्श.
आषाढी म्हणजे संतांच्या शिकवणींचा पुर्नउच्चार .
आषाढी म्हणजे अहंकाराचं निर्मूलन.
आषाढी म्हणजे श्रेष्ठ – कनिष्ठ भाव संपणे.
वारी म्हणजे रंजल्या गांजल्याचं दुःख हरण .
आषाढी म्हणजे एकरुपता…. जिथे मी आणि तू हे द्वैतच उरत नाही .तर प्रत्येक जण विठ्ठल होतो व विठ्ठलमय होतो.
आषाढी म्हणजे फक्त डोळ्यातली आतुरता , ओढ ,आर्तता …. त्या पांडुरंगाच्या भेटीची ,ज्याचं
देवपण भक्तांच्या भक्तीने गळून पडतं नी तो मग जनाबाईचं दळण दळतो . तुकाच्या गाथा पाण्यात बुडतांना वाचवितो . जो नाथाच्या घरी पाणी भरतो .
नी ह्या देव भक्तांच्या जोडगोळीने ….
अवघा रंग एक होतो .
संतांची समता ,ममता ,दया .शांती ,बंधुता ही शिकवण
त्याच्या सगुण निर्गुण रुपाने सहज साकारते.नी ख-या
अर्थाने ज्ञानेश्वर माऊलींचे ” आता विश्वात्मके…”चं पसायदान ….किंवा प्रत्येक संतांनी मांडलेली ” हे विश्व
ची माझे घर ” ची संकल्पना ख-या अर्थाने साकार नी दृढ
होते ….!!
अतिशय अल्प नी तोकड्या आध्यात्मिक ज्ञानावर हा लेखन प्रपंच आहे. चुकले असेल तर मोठ्या मनाने क्षमा करावी. स्वतः आषाढी वारी अनुभवली तर जास्त लिहू शकेल .
© डॉ .शुभांगी कुलकर्णी .
११ / ७ / २०१९
आम्ही साहित्यिक या फेसबुक ग्रुपवरील #महाचर्चा_आषाढी_पंढरी या महाचर्चेचा भाग असलेला लेख .
Leave a Reply