नवीन लेखन...

‘चकीत’ करणारी नाती !

“रामप्रसाद की तेरहवीं” पाहिला. काही दिवस आधी अशा कथेवर आलेला समांतर ” पग्लाईट (PAGGLAIT) पाहिला होता. एक मृत्यू आणि त्याभोवती तेरा दिवस मनाविरुद्ध फिरणारे कुटुंबीय, नातेवाईक ! त्यांच्यातील दऱ्या, वरवरची मलमपट्टी, अंतर्गत धुसफूस आणि अशा कर्मकांडात रस नसलेली (पण जबरदस्तीने ओढून आणलेली) नवी पिढी. मग ते तेरा दिवस जुनेपुराणे हिशेब चुकते करण्याकडे कल. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला “तेच तेच ” सांगणे, तोंडाला पदर धरून.

धरून बांधून घालणारे हे क्रियाकर्म आता त्याचा अर्थ गमावून बसले आहे की काय असा प्रश्न उभा राहतो आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी जिवलगांचे मृत्यू होतात त्यांना यातले वैय्यर्थ नव्याने जाणवल्यावाचून राहात नाही.

इथेही चार भावंडे, दोन बहिणी – खर्चावरून हिशेब ( किती दिवसांचे विधी करायचे यावर सुरुवात). ” मीच एकटीने मरमर करायची ” म्हणत राबणारी मोठी सून, आज्ञा सोडणाऱ्या आणि नुकत्याच विधवा झालेल्या आईवर हक्क सांगणाऱ्या पण तिला एकटीला ठेवण्याऐवजी घरी घेऊन जाण्याची चर्चा सुरु झाल्यावर अलगद पाय मागे घेणाऱ्या नणंदा ! मानभावीपणे आपापल्या नवऱ्यांवर आईबद्दलचा निर्णय ढकलणाऱ्या सुना, आर्थिक रडगाणी गाणारी चारही भावंडे – इथे काही लाभ नाही (वडिलांनी आधीच दुकान गहाण टाकलंय हेही लक्षात आल्यावर) म्हणून काढता पाय घेतात.
शेवटी नात्यातला कडवट पण अपरिहार्य हिशेब येतो- आई डायरी काढते वडिलांची ! कोणत्या मुलाला किती पैसे आणि केव्हा दिले याचा लेखाजोखा वाचला जातो. आता गठडी वळते, ” मी परत केले आहेत ” असा लंगडा युक्तिवाद आणि तद्जन्य धुसफूस सुरु होते. वडिलांनी खूप कर्ज का घेतले होते याचा आता छडा लागतो. आणि कर्जफेडीचे तगादे लागू नयेत म्हणून पळवाटा शोधायला सुरुवात होते. एक नावडती सून असतेच तोंडी लावायला- तिने मुलाला घरापासून तोडले आणि मुंबईला अभिनेत्री होण्यासाठी गेली म्हणून तिच्यावर जास्त राग !

कोठल्याही माणसाच्या गळ्यात बापाने माळ घालायला लावली म्हणून आजन्म (अगदी वडील गेल्यावरही त्यांना न सोडणारी) आई-वडिलांच्या नावाने बोटं मोडणारी मुलगी !

शेवटी कर्ज फेडण्यासाठी वडिलोपार्जित घर विकण्याचा सोपा पर्याय घेऊन मुलं आईला भेटतात. आई तो विचार परतवून लावते आणि एकटीच राहण्याचा निर्णय घेते. सुटकेचा श्वास घेत सारे परततात. सगळीजणं एखाद्या सणासाठी जमली आहेत की काय, का आपल्या बापाच्या अंतिम विधींसाठी हा प्रश्न तिला छळत राहतो. समोर बापाच्या फोटोशेजारी “सेल्फी ” वगैरे प्रकरण सुरु असते.

नासीर इथेही काही काळ “रामप्रसाद ” च्या अवतारात दिसला. तो बहुधा OTT शी जुळवून घेतोय. पण करण्यासारखे काही नसल्याने त्याला वाया घालवलंय. नाही म्हणायला शेवटच्या विधीच्या वेळी तो घरभर चक्कर मारतो, त्यावेळी सतीश आळेकरांच्या “महानिर्वाण “ची आठवण झाली. सुप्रिया पाठक आणि कोंकणा सेन ही बाकीची परिचित नांवे !
मुंबईला परतताना कोंकणा(नावडती सून) एका अनावर भावनावेगाने सासूला कवेत घेते.( आपल्या भाऊ-भावजयीशी सासूबाईंचं झालेलं एकाकीपणाचं बोलणं तिच्या कानी पडलं असल्याने). सुप्रिया एकदम अंग आक्रसते आणि चकीत झाल्यासारखं भांबावून सुनेकडे पाहते. ही अनपेक्षित जवळीक दोघींनाही नवी.

या प्रसंगातील सुप्रियाचा अभिनय माझ्या या पोस्टच्या नांवामागील रहस्य आहे.

नात्यांनी,जवळीकेने आजकाल चकीत व्हायला होतं – जी नाती कधी रुजतच नाहीत, ती जवळ आल्यावर धसकल्यासारखं होतं आणि दूर गेली की सुस्कारा सोडल्यासारखं हायसं वाटतं.

घरोघरी थोड्या फार फरकाने दिसणारे चित्र या चित्रपटाने नव्यानं अधोरेखित केलं आहे.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..