ठोका खोकी
बनवा खोपी
ही झोपडपट्टी
गटारावरी
भटारखाना
आणि हातभट्टी. ||१||
ओसंडे घन
दुर्गंधि-घाण
कचरा सडला
तिथेच भ्रामक
जीवन नामक
खेळ मांडला. ||२||
रोज ठणाणा
नविन घोषणा
सुधारणांच्या.
शून्यें असतीं
नांवावरती
सरकारांच्या. ||३||
मंत्री येतां
जिवंत प्रेतां
बघुन न बघती
गोठ्यामधली
ढोरें सगळी
तशीच ज़गती. ||४||
चक्रव्यूह रणिं
रचला कोणी
मुळी न ठाउक
अभिमन्यूंची
भेट मृत्युशी
इथेंच घाउक. ||५||
— सुभाष स. नाईक
Leave a Reply