पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंत प्रधान असतानाचा एक छोटासा परंतु माझ्या जीवनातला महान ऐतिहासिक प्रसंग आठवतो. गुबर्ग्याला पंडितजी कोणत्यातरी भव्य वास्तूच्या संकल्पित इमारतीच्या पायाभरणी समारंभाच्या उद्घाटनासाठी आलेले होते. आजकालचा दहशतवाद तेंव्हा मुळीच नव्हता. कुणीही पंत प्रधानाच्या जवळ जाण्यास फारशी आडकाठी नसे. माझे वडील तेथे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी होते. फक्त निमंत्रीतानाच आत प्रवेश दिला जात होता. तीन स्त्रीयांना तीन रंगाच्या ( भगवा पांढरा नी हिरवा ) साड्या परिधान करून प्रवेश द्वाराजवळ फुले, बुके, आरतीचे ताट घेवून पंडीतजीच्या स्वागतासाठी उभे केले होते. त्या तिघीमध्ये माझी आई देखील होती. मी एक शाळकरी मुलगा होतो व थोडे अंतर सोडून मागे उभा होतो.
पंडितजी आले. हसत त्यांनी सर्वाना अभिवादन केले. त्या तिघींनी दिलेली फुले, बुके, आणि ओवाळणी मान्य करीत चेहऱ्यावर समाधान व्यक्त करीत ते निघून गेले. एक क्षण , फक्त झलक, जशी आकाशातील वीज चमकून सारा आसमंत प्रकाशत व्हावा, तसाच. तो अतिशय क्षणिक व छोटा प्रसंग माझ्या डोळ्यांनी जो टिपला, तो माझ्या जीवनासाठी ऐतिहासिक म्हणून मन व हृदयावर कोरला गेला होता.
माझ्या डोळ्यातही एक दैवी असा कॉम्पुटर (Computer ) आहे. असे मला वाटते. तो दैवी माऊस( Mouse ) क्लीक केल्यावर, माझ्या मनावर कोरल्या गेलेल्या साऱ्या आठवणीना उजाळा मिळतो. त्या काळाची त्यावेळची मी माझ्या डोळ्यांत सामावलेली ती छबी, आजही चटकन Display अर्थात प्रक्षेपित होते. माझ्या अंतर मनाला ते चित्रण दिसू लागते.
मी आजही त्या प्रचंड वेगाने जाणाऱ्या, विज्ञान शास्त्राच्या त्या यशाची आतुरतेने वाट बघत आहे. जेंव्हा ते यांत्रिक पद्धतीने माझ्या चक्षुपटलावरची ती छबी कागदावर प्रक्षेपित करण्यात यश मिळवितील.
ती माझ्यासाठीची अत्यंत दुर्मिळ परंतु महत्वाची घटना असेल. कदाचित मीच प्रथम त्या यंत्रणेचा उपभोक्ता असेन.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply