काही वर्षापूर्वी मी ओडीसा येथील चिल्का लेक ला गेले होते. थोड्या अंतरावर संगमला ही गेले. जेव्हा तिथल्या बंगालच्या उपसागराला बघितले आणि मनात आले की खरंच मनुष्याला सागरासमान बनायला हवे. तिकडच्या एका मासेमाऱ्याने आम्हाला शिंपल्यातून तसेच समुद्रातील शेवाळ्याच्या काही तुकड्यातुन अनेक रत्न काढून दाखवले. मोती, पोवळे, निलम, पुष्कराज, पाचू …..… ते काढून दाखवत असताना तो त्याचे महत्व ही सांगत होता. ज्योतिष शास्त्रामध्ये ह्या रत्नांचे खूप महत्व आहे. आपण अनेक लोकांच्या बोटांमध्ये ह्यांची अंगठी ही बघतो. मनुष्यांच्या जीवनावर आकाशातील नक्षत्रांचा परिणाम होतो आणि त्या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी सागरातील रत्नांचा वापर केला जातो. आश्चर्याचीच गोष्ट. नाही का ?
पृथ्वीतलावर राहणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आज अनेकानेक अडचणी, समस्या येतात. खरंतर बाहेरच्या परिस्थितीचे रूप जे पण आहे ते आपल्या आंतरिक अवस्थेचे प्रमाण आहे. ‘ अंतविश्वामध्ये जे चालले आहे तेच बाह्यविश्वात होत आहे. ’ जसे सागराचे बाह्यरूप बघितले तर तो कधीच शांत नसतो पण त्याच्या तळाशी असीम शांती असते. मनुष्याचे जीवन ही तसेच आहे. बाहेरचे रूप नेहमीच नवनवीन परिस्थितीच्या घेरात अडकलेले दिसते पण त्या सर्व समस्यांची उत्तरे आपल्या अंतर्विश्वामध्येच आहेत. समुद्राच्या तळाशी अनेकानेक अमूल्य रत्न मिळतात त्याच प्रमाणे मनाच्या तळाशी जाऊन त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास मिळत जातात. अनेक रहस्य उलगडली जातात.
बंगालच्या उपमहासागराचे विशाल रूप जेव्हा बघत होते तेव्हा त्याचे ते शुद्ध,स्वछ निळे पाणी दूरपर्यंत दिसत होते. परंतु जेव्हा ते पाणी उफाळून किनाऱ्याजवळ यायचे तेव्हा त्याचा रंग बदललेला असायचा. कधी-कधी आपले ही असेच होते. खूप वेळा आपण स्वतःला समजावतो आज राग करायचा नाही, आज कोणाला दुःख द्यायचे नाही पण अशी काही परिस्थिती आपल्या समोर येते कि आपण किती ही चांगले ठरवलेले असले तरी आपल्याकडून परत-परत त्याच-त्याच चुका होतात अर्थातच आपल्या शुद्ध भावना मनाच्या सागरात विरून जातात आणि अशुद्ध विचार उफाळून बाहेर पडतात. गुण अवगुणांमध्ये परिवर्तित होतात. पण लक्षात असू द्या किती ही लाटा आल्या, किनाऱ्याला वेगाने धडकल्या तरी त्याला परत त्या सागराकडे परतावेच लागते. मनुष्याच्या जीवनात ही तेच आहे आपण किती ही क्रोधीत झालो, आदळ – आपट केली ____ तरी शेवटी आपण प्रेमाचे, शांतीचे, आनंदाचे भुकेले आहोत. आपली धाव परत त्या सुखाच्या सागराकडे, प्रेमाच्या सागराकडेच असते.
सागर किती ही विशाल असला तरी त्याची एक लाट ही सुखद अनुभव करून जाते तसेच आपल्या दिवसभराच्या कारोबारात ही एखादा सुखद क्षण ही पुरेसा असतो. विशाल हृदयाने, मुक्त मनाने विचारांना प्रकट करण्याची सवय लावावी कारण विचारांचे दमन हे अतिशय नुकसानकारक आहे. शुद्ध विचारांचा स्पर्श जीवनाला सुखद बनवण्यासाठी मदत करतो.
आपण पाहिले असेल जेव्हा आपण किनाऱ्यावर उभे राहतो तेव्हा अलगद आपले पाय त्या वाळूमध्ये रुतले जातात, खड्डा पडतो. काही वेळाने मात्र समुद्राच्या लाटा त्या जागेला भरून ही काढतात. पण त्याच जागेवर आपण उभे राहीलो तर आणखीन आतमध्ये जाताना दिसतो. जीवनामध्ये ही तसेच आहे एखादी समस्या आली तर थोड्या वेळासाठी का होईना बुद्धीला त्या समस्येच्या घेऱ्यातून बाहेर काढून अन्य ठिकाणी लावले, विचारांच्या शुद्ध लाटा येऊ दिल्या तर परिस्थितीरूपी खड्डा अलगद भरून येतो पण त्याच परिस्थितीवर वारंवार विचार करत राहिलो तर, ती परिस्थिती आणि खोलवर आपल्याला नेते अशावेळी त्यातून बाहेर पडणे मुश्किल होते.
सागराच्या किनारी कोणी ही उभे राहिले तरी त्याला सागराची विशालता, हवेत थंडावा, शुद्धतेचे दर्शन होते. प्रत्येकाला सारखाच अनुभव होतो. समुद्र सगळ्यांसाठी एक सारखाच असतो. आपण ही सम्पर्कामध्ये येणाऱ्या सगळ्यांसाठी एकसमान रहावे. मनामध्ये प्रत्येकाप्रति शुभभावना, कल्याणाची भावनाच ठेवावी. ही भावना सर्वांना आपलेसे करील.
विचाराच्या ह्या अथांग सागराला उधाण आले तरी ही त्याच्या तळाशी अनुभवांचे रत्न, ज्ञानाचे रत्न दडलेले आहेत. त्यांना स्वतःकडे साठवत राहा. मनुष्य जीवन खूप अमूल्य आहे. अनेक प्रसंगांनी भरलेले आहे. त्यातून जे योग्य आहे ते सामावून बाकी राहिलेले किनाऱ्यावर सोडून द्या. सागरासारखे विशालहृदय, मनाच्या अंतरंगात दडलेले निरवता, स्थिरता, स्पष्टता अनुभव करा. जे ह्या चर्मचक्षुंनी कधी दिसू शकले नाही ते सर्व काही आपणास ह्या अंतर्विश्वात दिसू लागेल. जीवनाचा प्रवास सरळ आणि सुखद होईल.
— ब्रह्माकुमारी नीता
Leave a Reply