” जिहाल-ए मुस्किन मैं कुन बा-रंजिश
बेहाल हिजरा बेचारा दिल है ! ”
कुछ समझमे आया ?
“गुलामी ” या चित्रपटातील गुलज़ार महाशयांचे हे शब्द आहेत आणि त्यांचा अर्थ “उस्मान शेख ” नावाच्या मित्राने एकदा समजावून सांगितल्याचे स्मरते. त्यापेक्षा
” सुनाई देती है जिस्की धड़कन
तुम्हारा दिल या हमारा दिल है! ”
ही दुसरी ओळ आपल्या आवाक्यातील आहे.
मुखपृष्ठ आवडले म्हणून पुस्तक खरेदी करणारे माझ्या तरी कोणी पाहण्यात नाही. ते पुस्तकाबरोबर “फ्री ” असते. आतील भलाथोरला कन्टेन्ट एका बाजूला (फार तर मलपृष्ठावर) चितारते आणि पुस्तकाची द्वाही फिरवते. पण मुखपृष्ठांबद्दलच एखादे पुस्तक निघाले तर?
मित्र-शिरीष घाटे (“पुस्तकांच्या चित्रवाटा ” या ऐश्वर्यवती पुस्तकाचे लेखक) ही कमाल करून दाखवितात. मग वरील गीतांच्या ओळींचा संदर्भ येथे काय?
तर मुखपृष्ठ कित्येकदा असेच अगम्य असते. त्याचा वेगळा अभ्यास वाचक करीत नाही,फारतर रंगसंगती, अक्षरांची कॅलिग्राफी, (असल्याच तर) मानवी आकृत्या अथवा निसर्गाचे सौष्ठव याबाबत मुखपृष्ठकाराचे कौतुक करतो. पण पुस्तक आवडल्यावर लेखकाला जसा कधी कधी अभिप्राय कळविला जातो, तसा मुखपृष्ठाकाराला स्वतंत्रपणे कळविला जातो का? बहुधा नसावा,म्हणजे नाही.
मग त्या न समजणाऱ्या देखण्या कलाकृतीचे अवगाहन कसे करायचे? उपाय म्हणून घाटे मास्तर स्वतः तास घेताहेत- आपल्या निवडक ७५-८० मुखपृष्ठांबद्दल ( खजिन्यातील हजारेक निर्मितीपैकी) ते स्वतःच समजावून सांगताहेत या पुस्तकात.
एक पानी मनातील त्यावेळची निर्मिती प्रक्रिया आणि ते मुखपृष्ठ ! दोन्ही शेजारी शेजारी ठेवून आता “समज ” वाढू शकेल असा कयास बांधून !
माझा वालचंदी अल्पप्रसवा कवि मित्र सुधीर नेरुरकर नेहेमी “कविता कळली ” या अभिप्रायावर आक्षेप घ्यायचा. तो म्हणायचा – ” कविता आवडली” असं म्हणायचंय कां तुम्हाला? ” कारण त्याच्या मते कवितेची निर्मिती आणि त्यामागच्या प्रसव वेदना फक्त कवीला माहित असतात,वाचक त्या प्रक्रियेचे साक्षीदार नसतात.कविता पूर्ण झाली की मगच ती हाती पडते आणि आपण “वा,वा ” म्हणत माना डोलवतो.
हाच धागा मुखपृष्ठ निर्मितीपर्यंत जातो. शिरीषने केलेल्या प्रत्येक मुखपृष्ठाची निर्मिती प्रक्रिया, रंग निवडीचे विचार, अक्षर वेलांट्या त्यालाच साक्षीदार म्हणून माहित असणार. आपल्या सारख्या दुरस्थांना कसे ज्ञात असेल?
त्या त्या वेळचे विचार तरंग लक्षात ठेवून शिरीषने इथे मुखपृष्ठांच्या जन्मकथा मांडल्या आहेत. ते सगळं मुळातून वाचण्यासारखे आहे. त्याच्या स्मरणाला सलाम ! ते वाचून झाल्यावर प्रत्येक चित्रकृतीकडे त्याच्या आकलनातून मी बघितले आणि माझा चष्मा बराचसा साफ झाला. मनातल्या शंका भेटीत विचारून चष्मा लख्ख करून घेईन म्हणे! या कलाविश्वाचा पसारा, अनेकविध साहित्यकृतींना त्याचा झालेला रंगस्पर्श स्तिमित करणारा आहे. प्रत्येक लेखक-कवीच्या मनात आणि कागदावरील शब्दांमध्ये शिरून त्याने नेमका अर्थ रंगांमधून व्यक्त केलाय.
काल हे पुस्तक कुरिअरने आले तेव्हा मी राजेशच्या ओठी पण पाठीमागून आवाज दिलेल्या किशोरचे आणि त्या किशोरसाठी शब्द लिहिलेल्या आनंद बक्षीचे ” अनुरोध ” मधील गीत ऐकत होतो. तसा आनंद बक्षी जुळारी! पण त्याच्या चेहेऱ्यावरील गीतकार खरवडून टाकल्यावरचा कवी मला त्या गाण्यात सापडला-
” मैं पहने फिरता हूँ जो, वो जंज़ीरे कैसे बनती हैं
ये भेद बता दूँ, गीतोंमे तस्वीरें कैसे बनती हैं
सुंदर होठोंकी लाली से, मैं रंगरूप चुराता हूँ ! ”
शिरीषच्या ” चित्रवाटाना ” वरील दुसरी ओळ लागू पडते. अर्थात त्यामध्ये रंग भरण्यासाठी आवश्यक असलेल्या “लाली ” चा सोर्स म्हणजे असंख्य रंगांचे भांडार असलेले त्याचे मन आहे- सौम्य,अबोल, शीतल, एकाग्र !
इतके वेळा सोलापुरला गेलोय पण त्याचा स्टुडिओ ( मुखपृष्ठ निर्मितीचे मॅटर्निटी होम ) बघायचा योग अद्याप आलेला नाहीए. येत्या महिन्या-दोन महिन्यात तो योग जुळवून आणू या म्हणे !
तोपर्यंत एकच विनंती- ” पुस्तकांच्या चित्रवाटा ” या तुझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल एखादे पान लिही !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply