चालणारा पोपट पहिल्यांदाच बघत होतो. त्याला कधीच उडता येणार नव्हतं. कारण पंखांची टोकं कलात्मक पद्धतीनं कापून टाकलेली होती. उडणारे पोपट बघितले, पिंजऱ्यातले पोपट बघितले. पण चालणारा पोपट पहिल्यांदाच बघितला.
चालणारा पोपट तुम्ही बघितला आहे? नसेल बघितला. पण मी बघितला आहे. आयुष्यात इतकी वणवण केली. मनसोक्त भटकलो. नको तिथे आराम केला. फार बघायला मिळाल. त्यातलाच हा चालणारा पोपट. पोपट लहानपणापासून खूप आवडायचा. पोपटी रंग, मानेवरची लाल फीत, लालचुटुक चोच आणि अखंड बडबड, तुम्ही जसं बोलाल तसं तो बोलणार. शाळेत जाण्यापूर्वी पाटी हाती लागली. त्यावर श्रीगणेशा करण्यापूर्वी चित्रच काढू लागलो. आवडणाऱ्या गोष्टींची. त्यात पोपट एक होता. पोपट काढून रंगवायचो. पण डोळा जमायचा नाही. डोळा जमला नाही की पोपट जिवंत वाटायचा नाही. मग तो पुसून टाकाचचा. परत काढायचा. पुसायचा. एक कळल, डोळयांत प्राण असतो. डोळा जिवंतपणाचं लक्षण. पोपटाच्या जिभेपेक्षा डोळे जास्त बोलातात. माणासाचेही डोळे बोलतात. खरं बोलतात. मग जीभ काही का बोलेना. लहानपणी घराभोवती खूप झाडं होती. कोकिळेच्या आवाजानं जाग यायची. पोपटांचे थवेच्या थवे इकडून तिकडे जाचये. स्वच्छंदीपणे उडणारे ते पोपट बघत बसावंस वाटे. थवा सोडून एकटा-दुकटा पोपट कधी झाडाच्या फांदीवर किंवा गच्चीच्या कठडयावर येऊन बसलेला आढळला नाही. पोपट बघितला तो उडणाराच. त्याच्या मानेवर लाल शेला असता. हे पुस्तकातील चित्रावरुनच समजलं.
लहानपणी बघितलेले उडणारे पोपट आठवणीत बंदिस्त झाले. कधी, कुठे, कुणाकडे पाळलेले पिंजऱ्यातले पोपट बघण्याची वेळ आली. पिंजऱ्यातले पोपट खरे वाटत नसत. शिकवलेले बोलत. पण स्वच्छंदी पोपटासारखी शीळं घेतल्यांच कधी ऐकू आलं नाही. पण पिंजऱ्यातला पोपट काही आवडला नाही. आवडत असून कधी पाळला नाही. असाच एकदा चालणारा पोपट बघायला मिळाला. कफ परेड भागात काम होतं. व्ही.टी. वरुन बसनं प्रेसिडेंट हॉटेलच्या मागे उतरलो. सगळया गगनचुंबी इमारती सारख्याच दिसत होत्या. त्यातली मला हवी असलेली इमारत शोधून काढली. कमांडर शर्मा, एकविसावा मजला. लिफ्ट मिळायला पाच मिनिटं लागली. एकविसाव्या मजल्यावर कमांडर शर्माची पाटी दिसेना. कुणाला विचारायचं. कुणीच दिसत नव्हतं. शेवटी एक बेल वाजवली. आतलं दार उघडून एकाने उत्तर दिलं. ‘बी’ आहे. ‘ए’ किंवा ‘सी’ विंगमध्ये बघा.
उतरत खाली आलो. सेक्युरिटी ऑफिसरला विचारलं. तो म्हणाला,‘सी’ विंगमध्ये एकविसाव्या मजल्यावर राहतात. मग परत लिफ्टची वाट पाहत थांबलो. योग्य मजल्यावर पोचलो. त्यात वीस मिनिटं वाया गेली. बेल वाजवली. आतलं दार उघडुन बाहेरच सुरक्षा द्वार बंद ठेवून आत उभ्या असलेल्या गडयानं दहा प्रश्न विचारले. नांव काय, कुठून आलात, कुणाला भेटायचंय, फोन केला होता काय आणि नंतर थांबा, आत विचारुन येतो. एवढ करताना मालक घरात आहे की नाही हे त्यान काही सांगितलं नाही. आत जाताना आतल दार त्यांन लावून घेतल. पाच मिनिटान आला. त्यांन दरवाजा उघडला. “बसा, साहेब बाहेर गेलेत. पण बसायला सांगितलयं.”
दरवाजाजवळ चपला काढून आत गेलो. बराच मोठा हॉल. चांगला सजवलेला. पुरुषभर उंचीच्या काचेच्या खिडकीतून अरबी समुद्राचं दर्शन. दार उघडणारा आत निघुन गेला. दुसरा बाहेर आला. बहुधा सेक्रेटरी असावा. हातात छोटी वही होती. “बसा, साहेबांना क्लबात फोन केलाय, ते निघालेत.” असं सांगून तो बाजूच्या खोलीत निघून गेला. बहुतेक ती खोली ऑफिस म्हणून वापरत असावेत. प्रिंटरचा आवाज येत होता.
अनेक आकर्षक वस्तूंची भरलेली काचेची शो-केस न्याहाळतो आहे. तेवढयात घरच्या मालकीण बाहेर आल्या.” साब आ रहे है. आप क्या लोगे- चाय. कॉफी या ठंडा”. मी काही सांगायच्या आत त्या ‘ठंडा’ म्हणून आत निघून गेल्या. भिंतीवरची जुनी चित्रं, नव्या फ्रेम्स, झुंबर, कोपऱ्यातील कमरेइतक्या उंचीच्या सुबक, कोरीव मुर्त्या, कितीही वेळा थांबायला लागल असतं तर कंटाळा येणार नाही असा तो हॉल. आरामदायी सोफा. एका बशीत थंड पेयाचा ग्लास ठेवून कामवाली निघुन गेली. जाण्यापूर्वी खिडकीचा पडदा उघडला. त्यामुळे दूरवर पसरलेल्या मुंबई शहराचं धूसर चित्र स्पष्ट झालं. खुर्च्या नीट केल्या आणि पंखा सुरु केला.
खिडकीतून दिसणारा समुद्र, राजाभाई टॉवर, मलबार हिल आणि कफ परेडलगतच्या मच्छिमारांच्या डुलणाऱ्या बोटी बघत बसलो. बघता बघता समोरच्या टिपॉयकडे लक्ष गेल आणि बघतच राहिलो. टिपॉयवर दिमाखाने एक पोपट उभा होता. अगदी पोझ घेऊन. पोपट खोटा असावा. प्लॅस्टिक, मातीचा किंवा लाकडाचा असावा, असा विचार मनात चमकून गेला.
माझ्या चित्रातील पोपटासारखच तो निष्प्राण वाटला. थोडं जवळून बघण्यासाठी मी पुढे वाकलो. तो पोपटानं काही हालचाल न करता डोळयावरची करडी पापणी वर उचलून बघून घेतलं आणि परत डोळा मिटून घेतला. ध्यानस्थ, पापणी हलली नसती तर तो पोपट खोटाच वाटला असता. थंड पेय पिऊन मी पेला टिपॉयवर पोपटापासून लांब कोपऱ्यावर ठेवताच पोपटानं बारीक शीळ घातली आणि तुरुतुरु चालत तो टिपॉयच्या दुसऱ्या काठावर जाऊन थांबला. मी बघत राहिलो.
चालणारा पोपट पहिल्यांदाच बघत होतो. त्याला कधीच उडता येणार नव्हतं. कारण पंखाची टोकं कलात्मक पध्दतीनं कापून टाकलेली होती. उडणारे पोपट बघितले, पिंजऱ्यातले पोपट बघितले. पण चालणारा पोपट पहिल्यांदाच बघितला.
काम संपवून बाहेर पडलो. लिफ्टसाठी उभा राहिलो. पोपटाला पिंजरा नाही. पण पोपट दहा खोल्यांच्या पिंजऱ्यातच राहतो. मालक-मालकिणीसह. किमती पिंजरा एकविसाव्या मजल्यावर टांगलेला आहे इतकंच.
————————————————————————
— प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक : 14 एप्रिल 1994
Leave a Reply