नवीन लेखन...

चमचमीत ते मिळमिळीत

संध्याकाळची वेळ असते.. तुम्ही दिवसभर काम करून कंटाळलेले असता.. आहेच वेळ तर जरा पाय मोकळे करु म्हणून फिरायला बाहेर पडता.. रस्त्याने रमतगमत जात असताना समोरच वडापावची गाडी दिसते.. दुपारी खाल्लेला डबा, एव्हाना तो जिरलेला असतो.. गरम वड्यांचा वास आल्याने, ‘पोटात काहीतरी भर घाला’ असा संदेश मेंदूकडे पोहोचवला जातो.. दोन कुरकुरीत वडापाव, तळलेल्या मिरचीसह जठरात जाऊन विसावतात.. समाधानाची एक ढेकर ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून लगेचच मिळते..

घरी गेल्यावर बाहेर चमचमीत खाणे केल्यामुळे घरचे रात्रीचे जेवण मिळमिळीत वाटू लागते व पोटातील उरलेल्या जागेत ते इच्छेविरुद्ध भरले जाते..

दुसऱ्याच दिवशी पोटदुखी सुरु होते.. अस्वस्थ वाटू लागतं.. लिंबूपाणी पिऊनही फारसा फरक पडत नाही.. डोकंही दुखायला लागतं.. कणकणी येते..

शेवटी डाॅक्टर गाठला जातो.. डाॅक्टर काही तपासण्या करायला सांगतात.. संध्याकाळी रिपोर्ट पाहून अ‍ॅडमीट व्हायला सांगतात.. सलाईन लावलं जातं… घरच्यांचे चेहरे, काळजीने उतरलेले असतात..

आजाराची बातमी नातेवाईकांना व मित्रमंडळींना समजते.. ते वेळ काढून भेटायला येतात.. येताना सफरचंद, संत्री, मोसंबी घेऊन येतात..

तुम्ही जेवणाची चव गेल्याने, संत्र्याची, मोसंबीची, सफरचंदाची एकेक फोड खाऊ लागता.. ती खाताना डोळ्यासमोर, तो कालचा कसल्याशा तेलात तळलेला वडापाव दिसू लागतो.. तेच तेल, तो वडापाववाला गेले चार दिवस वापरत असतो.. स्वतःहून ओढवून घेतलेल्या आजारपणाचा तुम्हाला पश्र्चाताप होतो.. पण वेळ निघून गेलेली असते…

तुम्ही मनोमन ठरवता, यापुढे मी रस्त्यावरचं, हाॅटेलातलं, चायनीज गाडीवरचं कधीही खाणार नाही…

तुम्हाला भेटायला आलेले मित्र, तासभर थांबून निघतात.. जाताना ‘काळजी घे, बाहेरचं यापुढे कधीही खाऊ नकोस’ असं पुन्हा पुन्हा बजावून सांगतात..

तुम्ही तुमच्या काॅट शेजारील खिडकीतून खाली पहात असताना तुमचे मित्र रस्ता ओलांडून पलिकडच्या वडापाव गाडीकडेच जातात.. त्यांना भूक लागलेली असते.. ते दोन दोन वडापाव पचवतात… तुम्ही त्यांना आवाज देऊन लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करता.. मात्र त्यांना ते ऐकू जात नाही…

हे ‘चक्र’ असंच चालू रहातं… आपल्याला सगळं माहीत असूनही आपण अशा घातक पदार्थांचा मोह टाळू शकत नाही… परिणामी डाॅक्टरची ‘भर’ होते व तुमचं आरोग्य धोक्यात रहातं..

आजच्या तरुणाईला बाहेरचं खाणं आवडतं.. पोळी भाजी, वरण भात पाहिला की, ती नाकं मुरडतात.. सात्त्विक, चौरस आहार आता हद्दपार होऊ लागलाय…

फास्टफुड खाण्यामुळे, चरबीचे प्रमाण वाढते… लठ्ठपणा वाढून कमी वयातच शरीर बेढब दिसू लागते… तिशीचाळीशीतच शुगर वाढू लागते.. चालण्याचा कंटाळा केल्याने व्यायाम असा होतच नाही..

अजूनही वेळ गेलेली नाहीये… काटेकोरणे, नियमबद्ध आहार, विहारावर नियंत्रण ठेवल्यास तुम्ही नक्कीच तंदुरुस्त रहाल…

बघा, जमतंय का?

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२४-९-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..