नवीन लेखन...

चंपानगरी- उर्फ चांपानेर

गुजरातमध्ये ‘चांपानेर-पावागड’ ही पर्यटनस्थळ बघायची ठरवून अहमदाबाद मार्गे ‘पंचमहाल’ जिल्ह्यातल्या चांपानेरला पोहोचलो. तसं बडोद्याहून ४८ कि.मी. अंतरावर चांपानेर आहे. पावागडाचा पायथा म्हणजे ‘चांपानेर’ पावागडावरची कालिकामाता खूप प्रसिद्ध आहे. नवरात्रात तर येथे मोठीच यात्रा भरते.

चांपानेरला असलेली ‘जामी मशिद’ काही वर्षांपूर्वी जागतिक वारसा म्हणून जाहिर झाली. ती मुख्यतः बघण्याचा आमचा उद्देश होता. ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ म्हणजे ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणजे असं ठिकाण जे कोणत्याही परिस्थितीत जपलं गेलं पाहिजे. कोणतंही सरकार आलं तरी जगाच्या भावी पिढ्यांसाठी अशा वास्तुचं संरक्षण झालं पाहिजे. या दृष्टीकोनातून संयुक्त राष्ट्रसंघाची ‘युनेस्को’ ही संघटना जगभरातल्या अशा वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा देत असते. त्यांचे त्याबाबतीतले काही निकष आहेत. जसं दर्जा प्राप्त ठिकाण, गर्दी, गडबड, गोंधळापासून, संरक्षित हवं. त्याला चांगलं कंपाऊंड, वास्तुच्या भोवतीने फिरण्यासाठी ऐसपैस जागा, समोरचा भाग, फुलझाडं, बागांनी सुशोभित केलेला असावा. प्रशिक्षित मार्गदर्शक दुभाषे यांची सोय असावी. पर्यटकांसाठी, दिव्यांगांसाठी प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी याची व्यवस्था असावी. नामनिर्देशन फलक योग्य त्याठिकाणी असावेत.

प्रस्तावित वास्तुची माहिती देणारे फलक, माहिती पुस्तकं उपलब्ध असावीत. जेणेकरुन अशा ठिकाणी पर्यटक आले तर त्यांना कोणतीही असुविधा व गैरसोय सोसावी लागु नये. हा महत्त्वाचा उद्देश असतोच.

चांपानेरला सकाळीच पोहोचलो होतो. अशा वास्तुंना पहाण्यासाठी माफक प्रवेश शुल्कही असतं. तेव्हाच याची देखभाल चांगल्या प्रकारे करता येते. जामी मशिद उंचशा चौथऱ्यावर उभारली आहे. तो चौथरा ६६ मीटर लांब आणि ५५ मीटर रुंद आहे. प्रवेशद्वाराजवळ दोन कमानींमध्ये असलेल्या दगडी जाळ्यां इतक्या विलक्षण सुंदर आहेत की अक्षरशः थक्क व्हायला होतं. साधारण दिड ते दोन फुटांचे चौकोन आणि त्यातील जाळी असे तीन, तीन जाळीच्या चौकोनांची एक रांग, अशा एकावर एक चार रांगा, सगळ्यात वरची महिरपीवरची रांग तशीच प्रमाणबद्ध, कोरीव अशा या प्रवेशद्वारीच आपण कितीतरी वेळ खिळून रहातो.

आत प्रवेश केला की लक्ष वेधून घेतात ते दोन उंच मिनार, तीन मजले असलेल्या या मिनारांचा खालचा मजला अत्यंत कोरीव आहे. या मिनारांवर जाण्यासाठी आतमध्ये गोलाकार जिना आहे. पण आता वरच्या मजल्यांवर जाण्याची परवानगी नाही. कारण लोकं याचा गैरवापर करतात. या बंदीमुळे शिल्पकलेतला, वास्तुकलेतला एक महत्त्वाचा भाग आपण पहाण्यापासून वंचित रहातो. खरंतर अगदी वरच्या तिसऱ्या मजल्यावरुन आजूबाजूचा परिसर किती विलोभनीय दिसला असता. याची आता केवळ कल्पनाच करता येते. खरंतर याबद्दल काही नियम करता येतील. सुरक्षारक्षक ठेवता येऊ शकतील. पण पूर्णपणे बंदीच घालणं तर्कसंगत वाटत नाही. समजा पॅरिसला जाऊन तिथल्या आयफेल टॉवरवर जायलाच बंदी केली गेली. तर पर्यटकांचा जसा हिरमोड होईल. तिच गत इथे आल्यावर होते.

असो चांपानेर हे ऐतिहासिक शहर खूप प्राचीन आहे. याच्या आसपास केलेल्या उत्खननातून इ.स. पूर्व काळातले अगदी अगदी अश्मयुगातील दगडी हत्यारे येथे सापडली आहेत. तर ‘जोरवन’, ‘सुकळी’, ‘गोकुळपूरा’ इथे केलेल्या उत्खननात मृद भांड्यांचे अवशेष, घरगुती वापराची मातीची भांडी, लोखंडी हत्यारं, दगडी अवजारं अशा विविध वस्तुंचेही अवशेष मिळाले आहेत. त्यावरुन अगदी इ. स. पूर्व २००० मध्येही इथे वसती असावी असा अंदाज आहे. त्यानंतरच्या काळात या भागात विशेष काही घडलं नसावं. त्यानंतर म्हणजे साधारण १० व्या, ११ व्या शतकात पावागडाच्या डोंगरावर ‘लकुलिश’ मंदिराची उभारणी झाली असावी. १५ व्या शतकात या भागात खूप चढउतार झाले. खिलजींच्या आक्रमणानंतर गुजरातमध्ये ‘मुझफ्फरी’ वंशाची कारकिर्द या भागात सुरु झाली. माळव्यात खिलजींची सत्ता होती. या दोन सत्तांच्यामध्ये, ‘इडर’, ‘चांपानेर’ आणि इतर लहान राज्य बफरचं काम करीत होती. तेव्हा चांपानेरच्या शासकांना आपली राजधानी अधिक बळकट करण्याची आवश्यकता वाटु लागली. म्हणून त्यांनी चांपानेर भोवती तटबंदी उभारली. तिच्याभोवती खंदक बांधला. इ. स. १५०८ मध्ये ही जामी मशिद बांधून पूर्ण झाली. आम्ही मशिद पहात होतो. प्रत्यक्ष मशिदीवर घुमट, घुमटांचं छत आहे. त्याच्या चार कोपऱ्यात, चार लहान मिनारही आहेत. आतल्या काही भागांवर कमळाची सुंदर नक्षी आहे. या सगळ्या बांधकामाची प्रमाणबद्धता वाखाणण्यासारखी आहे. याच्या दोन्ही बाजूस व्हरांडा आहे. मशिद असल्याने ती चांगली शाबूत राहिली आहे.

‘चांपानेर’ हे नाव कसं पडलं याबद्दल दोन प्रवाद आहे. पावागडचा डोंगर आणि त्याच्या आसपास एक प्रकारचा लालसर पिवळा दगड सापडतो. त्याचा रंग चाफ्याच्या फुलासारखा दिसतो. त्या दगडाचा वापर करुन वसविलेली नगरी म्हणून ती ‘चंपानगरी’ पुढे अपभ्रंश होऊन ते ‘चांपानेर’ झालं. तर दुसरी उपपत्ती अशी सांगितली जाते की, गुजरातचे शासक असलेल्या ‘चावडा’ राजवंशापैकी वनराज राजाचा मंत्री ‘चंपा’ याने ही नगरी वसविली. म्हणून हिचं नाव ‘चंपानगरी’ असं ठेवण्यात आलं. तर मागचा डोंगराला ‘पावागड’ संबोधण्यात येऊ लागलं. चंपानगरी वसविली गेली तेव्हाच पावागडाची ही निर्मिती झाली असावी. ही साधारण ८ व्या शतकातली गोष्ट आहे. पावागडाच्या सर्वात उंच जागी ‘कालिकामाता’ मंदिर आहे. हे देवीचं जागृत शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे ह्या देवीच्या दर्शनासाठी शेकडो वर्षांपासून भक्तगण जात असतात. १३ व्या शतकात ‘खिची राजपूत चौहानांनी’ पावागड चांपानेरवर कब्जा केला. तो इ. स. १४८४ पर्यंत होता. त्यावर्षी ‘महंमद बेगडा’ याने खिची चौहानांचा पराभव केला. पुढे वेळोवेळी चंपानगरीत आवश्यक ते बदल झाले. महंमद बेगडाने चंपानेरला राजधानीचा दर्जा दिला. त्याने अनेक इमारती उभारल्या जामी मशिदी प्रमाणेच ‘नगिना’, ‘केवडा’, ‘खजूरी’ आणि ‘शेहरी’ अशा अन्य चार मशिदींचाही निर्मितीही त्याच सुमारास झाली. पण जामी मशिदीचे ३० मीटर उंच मीनार पर्यटकांचे आकर्षण ठरलेले आहेत. पावागडावर ‘छासिया’ आणि ‘दुधिया’ तलाव, आहेत. पावागडावर जाण्यासाठी रोप वे ची सोय करण्यात आली आहे. इ. स. १५११ मध्ये महंमद बेगडाच्या निधनानंतर इ. स. १५३५ मध्ये हुमायुनाने गुजरातच्या सुलतानांचा पराभव केला. त्यानंतर चांपानेरचं महत्त्व कमी होत गेलं. ब्रिटीशकाळात तर इथे वाढलेल्या जंगलात चांपानेर आणि पावागडचे अनेक अवशेष बुडून गेले. चांपानेर, पावागडाचे उल्लेख संस्कृत आणि गुजराती वाड्.मयात आलेले आहेत. ‘गंगादास प्रताप विलास’ नाटकात तर अरबी – फारसी ग्रंथात ‘ऐने – अकबरी’, ‘मिरात-ए-सिकंदरी’, ‘झफर-उल-वालाह’ या ठिकाणांचे उल्लेख आले आहेत. पोर्तुगीझ प्रवासी दुआर्ते बरबोसाच्या’ प्रवास वर्णनातही चांपानेरचा उल्लेख आढळतो. त्याने इथल्या अनेक उध्वस्त इमारती दुर्लक्षित असल्याचं नमुद केलं आहे. पुढे इंग्रज कला अभ्यासक ‘जेम्स बर्गे स’ आणि ‘हेन्री कझिन्स’ यांनीही याठिकाणांना भेटी देऊन त्याची वैशिष्ट्ये नोंदवून ठेवली. त्याचा पाठपुरावा जर्मन कला अभ्यासक ‘हर्मान गोट्रझ’ यानेही केला. पण याठिकाणांना खरी उर्जितावस्था आली. ती १९६९ साली ‘पुरातत्व विभागाने केलेल्या व्यापक सर्वेक्षण आणि संवर्धन मोहिमेनंतर, त्यानंतर खऱ्या अर्थाने भारतीयांना याचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण लक्षात आलं. त्याचा अभ्यास सुरु झाला. पर्यटन स्थळ म्हणून त्याचा विकास करण्यात आला. त्याला जागतिक वारसा दर्जाही मिळाला.

अशी जागतिक वारसा दर्जा मिळालेली जवळपास ३६ हून अधिक ठिकाणं भारतात आहेत. त्यापैकी अगदी चुकवू नये अशी काही ठिकाणं म्हणजे कर्नाटकातलं ‘हलेबिडु’चं शिवमंदिर. ज्याला ‘होयसळेश्वर’ म्हणून ओळखलं जातं. होयसळांच्या राज्याची ‘हलेबिडू’ ही राजधानी होती. त्यावेळचं तिचं नाव होतं ‘द्वारसमुद्र’. ११ व्या शतकात बांधलेल्या ह्या मंदिराचं बांधकाम ८० वर्ष चालु होतं. म्हणजे ज्यांनी हे मंदिर उभारायला घेतलं. त्याचं आरेखन केलं. त्या शिल्पज्ञांना आश्रय, संरक्षण आणि पैसा पुरवला ते कोणीच कदाचित ते पूर्ण झालेलं मंदिर बघायला हयात नसतील. एक अजोड शिल्पं आपण घडवत आहोत. याची कल्पना तरी त्यांना असेल का? या मंदिरात १ से. मी. भाग असा नाही की जिथे कसलं कोरीवकाम नाही. भारतीय शिल्पकलेचा चरमोत्कर्ष हे मंदिर घडवण्यात झाला आहे. रामायण, महाभारत, पुराणे यातील प्रसंग या मंदिरात अक्षरशः जिवंत होऊन समोर येतात. प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी हे मंदिर बघावं आणि आपल्या समृद्ध वारशाचा सार्थ अभिमान जाणून भरुन पावावं.

अशीच ‘बेलूर’, ‘बेलवडी’, ‘सोमनाथपूर’ येथेही असलेली होयसळ शैलीतील मंदिरे आवर्जून बघावित अशीच आहेत. म्हैसूरच्या आसपास असणारी ही मंदिरं खूप आनंद देतात.

तंजावरचं बृहदिश्वराचं मंदिरही असंच भव्य आणि शिल्पसमृद्ध आहे. चोल राजांनी हजार वर्षांपूर्वी बांधलेले मंदिर बघून आपण थक्क होऊन जातो. ‘कोणार्कच’ सूर्यमंदिर, हंपीची ‘विरुपाक्ष’ आणि ‘विठ्ठल मंदिरे, पदक्कलचं मंदिरं ही अशीच काही जागतिक वारसा दर्जा मिळालेली मंदिरं. आवर्जून पहावीत अशी.

मिलिंद आमडेकर

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..