नवीन लेखन...

टेबलटेनिस चॅम्पियन ममता प्रभू

ममता प्रभू… टेबल टेनिसपटू नेहमीच्या ग्लॅमरस छायाचित्रणापेक्षा एक वेगळं छायाचित्रण… तिची खेळातली ऊर्जा थोडय़ा वेगळय़ा पद्धतीने चित्रित केली…

वयाच्या आठव्या वर्षी सुरू झालेला टेबल टेनिसचा खेळ अगदी सहज सोपा करत कॉमन वेल्थ स्पर्धेत रौप्यपदक, साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक, दहा वेळा महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिपचा विक्रम आणि अशा अनेक स्पर्धांत बाजी मारत ममता प्रभू या जिद्दी खेळाडूने टेबल टेनिसच्या खेळात आपला वेगळा दराराच निर्माण केला. तिच्या या खेळाचा सन्मान ‘शिवछत्रपती’ या मानाच्या पुरस्कार देऊन करण्यातदेखील आला. मात्र 2012 साली वैयक्तिक कारणाने तिच्या या खेळाला अल्पविराम लागला. तिचा खेळ थांबला, मात्र ती खचली मुळीच नाही. 2017 ला पुन्हा जोमाने सुरुवात केली अन् खेळात कमबॅक करत पुन्हा महाराष्ट्र राज्य चॅम्पिअनशिप पटकावली. ममता प्रभूचा हा जिल्हास्तरीय खेळ ते आंतरराष्ट्रीय खेळातला प्रवास थक्क करणारा असाच आहे.

या तिच्या पुरस्कारांसोबत तिच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला तो नवी दिल्ली इथे झालेल्या 2010 कॉमन वेल्थ गेम्समध्ये तिने पटकावलेल्या रौप्यपदकामुळे. तिच्या या कामगिरीनंतर तिचे देशभरातून कौतुक करण्यात आले. अनेक स्पर्धा सहज सोप्या करत त्या सहज खिशात घालत ममताने खेळावर प्रभुत्व मिळवले असतानाच 2012 साली तिला हा खेळ वैयक्तिक कारणाने थांबवावा लागला. एक एक करत पाच वर्षे उलटली. खेळाचा सराव तुटला. शरीराने तिचा हा खेळ थांबला खरा, मात्र विचारांनी हा खेळ तिच्या मनात सतत सुरूच ठेवला. अखेर 2017 साली पुन्हा खेळात उतरण्याचा ममताने निर्णय घेतला. आणि त्याविषयी तिचे गुरू कमलेश मेहता यांना तिने सांगितले. कमलेश मेहता यांनी तिला आशीर्वाद देत तिला पाठबळ दिले. त्यांच्या सांगण्यावरूनच ममता गुरू शैलजा गोहाड यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास रुजू झाली. शैलजा गोहाड यांच्या बुस्टर्स अकादमीत तिने आपला सराव सुरू केला. 1995 साली ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू झालेल्या बुस्टर्स अकादमीने आजवर अनेक तगडे खेळाडू दिले आहेत. प्रशिक्षिका शैलजा गोहाड यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर 500 हून अधिक राष्ट्रीय पदकांवर खेळाडूंनी आपले नाव कोरले आहे. याच गुरू शैलजा गोहाड यांनी ममताने कमबॅक केल्यानंतर दोन दिवस तिचा खेळ बघितला अन् अगदी तिसऱयाच दिवशी तिला पूर्वीसारखा खेळ खेळण्यास पाठबळ दिले. पाच वर्षांच्या काळानंतर पुन्हा खेळात रुजू झालेल्या ममताने पुन्हा शून्यातून खेळाचा श्रीगणेशा केला अन् अथक मेहनतीने स्पर्धा खेळासाठी स्वतःला तयार केले.

ममताच्या या खेळाने पुन्हा अगदी वर्षभरातच राष्ट्रीय स्तर गाठले. मुंबई जिल्हास्तरीय स्पर्धा ती जिंकली. पुढे 10 वेळा चॅम्पियनशिप पटकावण्याचा विक्रम असलेली स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिप तिने पुन्हा नव्या ताकदीने जिंकली. या स्पर्धेत दिव्या देशपांडे, सिन्होरा डिसोजा अशा मातब्बर खेळाडूंना मागे टाकत तिने या स्पर्धेवर आपले नाव कोरले. या वर्षी ममताने मौमा दाससारख्या खेळाडूला मागे टाकत टॉप 16 खेळाडूंच्या यादीत नाव कमावले. हिंदुस्थानातल्या टॉप 8 खेळाडूंच्या यादीत नाव कमावण्याचा वेद ध्यासच ममताने घेतला असून या वर्षाच्या अंती हे तिला शक्य होईल असे तिचे लक्ष्य आहे.

टेबल टेनिस अंगात भिनलेल्या या हुरहून्नरी कलाकाराचा एक वेगळा फोटो मला हवा होता. टेबल टेनिस म्हटले की, एकदम समोर येते ते या खेळाची रॅकेट, बॉल आणि त्याचे टेबल. मला ममताचा खेळतानाचा फोटो काढायचा नव्हता. ममता ठरल्याप्रमाणे इन्स्टिटय़ूटमधल्या स्टुडिओत आली. आधी तिचे काही पोट्रेट मी काढले. सुरुवातीला ममताच्या चेहऱयावर थोडीशी भीती वाटत होती. कॅमेरासमोर थोडीशी ती घाबरलीये हे ओळखून मी तिचे दोन-तीन वेगळय़ा पोझेसमधले शूट केले. यातून ती खुलत गेली आणि मग सरतेशेवटी मला हवा असलेल्या फोटोबाबत मी तिला सांगितले. नेहमी खेळताना एका वेगळय़ा एनर्जीने दिसणारी ममता मला दाखवायची नव्हती. हसरी, शांत ममता मला कॅमेऱयात टिपायची होती. यालाच साजेसे असे शूट आम्ही ठरवले आणि ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटोंची एक सिरीज मला कॅमेराबद्ध करता आली.

ममताचा टेबल टेनिस विश्वातला प्रवास जिद्दीचा, चिकाटीचा असाच सांगता येईल. तिला तिच्या घरातून मिळालेले पाठबळ, दोन्ही गुरूंनी दिलेली शिकावण, तसेच देना बँकेने वेळोवेळी केलेली आर्थिक मदत यामुळे तिचा हा प्रवास सोपा झाल्याचे ती मानते. कलेला, खेळाला वय नसते असे म्हणतात, ममताने आपल्या या प्रवासाद्वारे नव्या पिढीसमोर एक आदर्शच घालून देत नव्या ताकदीने या खेळावर पुन्हा पकड मिळवण्याचा वेडा ध्यासच घेतला आहे.

— धनेश पाटील
dhanauimages@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..