साधारण 50 वर्षांपूर्वी बँक ऑफ बडोदाच्या झवेरी बाजार शाखेत कृष्णादवाला म्हणून प्रमुख प्रबंधक होते. बँकिंग लॉपेक्षा प्रॅक्टीसमध्ये हुशार होते. क्लार्क वर्गात त्यांचा दरारा बरोबर आदरही होता. कोण कामसू, कोण कामचोर ते बरोबर हेरायचे. बँकेतील प्रत्येक विभागाचे त्यांना पूर्ण ज्ञान होते. बुक बॅलंसिंगमध्ये त्यांचा हातखंडा होता.
रोख (कॅश) विभागातसुद्धा त्यांचे लक्ष असे. रोज संध्याकाळी शाखा बंद झाल्यावर ते जातीने कॅश (नोटांची बंडले) तपासत. कृष्णादवाला यांची कॅश तपासण्याची वेगळीच पद्धत होती. तेव्हा हजाराच्या तपकिरी मोठ्या नोटा होत्या. प्रथम त्या मोजत नंतर शंभराच्या नोटांच्या रिंग (10 चे बंडल) तपासत असताना एकदम एक बंडल उचलत त्यातल्या त्यांच्या मनातील थोड्या नोटा दुमडून ठेवत व उरलेल्या नोटा कॅशियरला मोजायला सांगत. त्यांनी दुमडलेल्या नोटा व कॅशियरने मोजलेल्या नोटा 100 झाल्यावर बाजूला ठेवत. अशारीतीने कुठचीही दोनचार बंडले मोजत व नंतर टाळेबंद कॅश जुळवून कॅशियरबरोबर सेफडिपॉझिट व्हॉल्टमध्ये कॅश ट्रंक ठेवत असत.
असेच दुसरे उदाहरण मला आठवते. एकदा कॅश क्लार्कला दिवसअखेर कॅश मोजताना 200/- रुपये (त्या काळात मोठी रक्कम) कमी आले. संध्याकाळी स्वतः कृष्णादवाला रोख विभागात कॅश चेक करायला आले. त्यांना ही गोष्ट कळली, लगेच कॅश लेजर अक्षरशः वरून खाली नजर मारत 2 मिनिटात बेरीज पाहिली व नंतर सगळे कॅशचेक उलटेसुलटे करून पाहिले व त्या नवीन कॅशियरला ओरडले, चेकच्या मागे किती नोटा दिल्या त्या लिहिल्या का नाही? सगळी कॅश चेक करताना 22000/- हजाराचा एक चेक दिसला व विचारले, ‘ह्या चेकचे पेमेंट तू कसे केलेस का सांग.’ तो कॅशियर म्हणाला, ‘100 ची दोन बंडले दिली व 20 सुट्या 100 च्या दिल्या.’ कृष्णादवाला यांना संशय आला. त्यांनी खातेदाराला फोन केला. खातेदाराचे बरेच वर्षे बॅकेत खाते होते. त्याला विचारले, ‘हसमुखभाई, तू आज 22000/- हजार कॅश काढले ते बरोबर होते का?’ तो म्हणाला, ‘मी पैसे आणल्यावर तसेच ठेवले आहेत बघतो.’ कृष्णादवाला म्हणाले, ‘तू फक्त सुट्या नोटा किती आहेत ते मोजून सांग.’ खातेदाराने पैसे मोजल्यावर त्या 100 च्या 22 नोटा होत्या. मॅनेजर म्हणाले, ‘ठीक आहे. त्यात 100 च्या दोन नोटा जास्त दिल्या गेल्या आहेत. त्या पाठवून दे.’ कृष्णादवाला यांनी आपल्याकडील 200/- रुपये भरले, बाकीची कॅश मोजून ठेवून दिली. याला म्हणतात चाणाक्षपणा. 22000/- म्हटल्यावर वरच्या 20 नोटा ऐवजी 22 नोटा दिल्या असणार, हे बरोबर ताडले. कृष्णादवाला जेव्हा निवृत्त झाले तेव्हा त्यांचा मोठा सत्कार स्टाफने केला. तेव्हा ते भाषणात म्हणाले, ‘बॅकेत काम करताना चूक झाली, तर ती सुधारता येते, माफ होते, पण चूक जर जाणूनबूजून हलगर्जीपणे स्वतःच्या फायद्या करता आढळली, तर त्याला माफी नसते, तो घोटाळा ठरतो.’
-श्रीनिवास डोंगरे
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply