नवीन लेखन...

चंदा रणदिवे – लक्षाधीश रंगकर्मी

ठाणे रंगयात्रामधील डॉ. मुरलीधर गोडे यांचा लेख.


त्यांचं खरं नाव भालचंद्र रणदिवे. पण हे नाव त्यांची ओळख बनू शकलं नाही. सर्व रंगकर्मी व नाट्यरसिक यांच्या लेखी ‘चंदा’ रणदिवे हीच त्याची नाममुद्रा ठसलेली होती.

करवीरनगरी ही त्यांची जन्मभूमी असली तरी ठाणेनगरी हीच त्यांची कर्मभूमी होती.

चंदा रणदिवे मुंबई विद्यापीठातून बी.एस्.सी. झाले, बी.एड्. ही झाले. शिक्षकाची नोकरी पत्करली. पण नाटक हाच त्यांचा ‘डी.एन.ए’ होता. बालपणापासून ते अखेरच्या घटकेपर्यंत नाटक हाच त्यांचा ध्यास होता, श्वास होता. ते सर्वार्थाने व सर्वांगाने रंगधर्मी आणि रंगकर्मी होते.

एकोणीसशे पन्नासच्या दशकाचा उत्तरार्ध हा एकूणच मराठी रंगभूमीचा कायापालट करणारा काळ होता. नवनवीन आशय, विषय आणि सादरीकरणातले वैविध्य यांच्या योगाने मराठी रंगभूमीवर नवचैतन्याचे वारे वाहू लागले होते. या काळात चंदा रणदिवे यांनी वयाची पंचविशी नुकतीच ओलांडली होती. नाटकांचं वेड तर नसानसांत भिनलेलं. शालेय जीवनात भाऊ कमलाकर आणि बहीण तारा यांच्या नाटकातील भूमिकांनी ते प्रभावित झाले. दत्तोपंत आंग्रे या दिग्गज अभिनेत्याचे दिग्दर्शन जवळून पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले.

नाट्यकलेचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या चंदा यांच्या व्यक्तिमत्त्वाला फुलण्यासाठी ‘आर्य क्रीडा मंडळ’ आणि तेथील त्यांच्या अध्यक्षतेखालील ‘कलायतन’ ही संस्था कारणीभूत ठरली. तिथे अनेक एकांकिका व नाटके सादर करण्याची संधी त्यांना मिळाली. नट आणि दिग्दर्शक म्हणून इथेच त्यांची जोमदार जडणघडण झाली. ‘पांडव प्रताप’, ‘विठ्ठल तो आला आला’, ‘एका ओल्या रात्री’, ‘घुबड’, ‘ब्रह्मचारी यक्ष’ यासारख्या एकांकिकांनी रसिकांना नवीन कलात्मक आनंद दिला. तसेच ‘तोतयाचे बंड’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘साष्टांग नमस्कार’, ‘प्रेमा तुझा रंग कसा?, ‘जिद्द’, ‘रत्नदीप’ या नाटकांचे दिग्दर्शन करून व त्यात भूमिकाही करून त्यांनी ठाणेकरांना अस्सल नाट्य अविष्काराचा प्रत्यय दिला.

चंदा रणदिवे एकांकिका व नाटके ज्या काळात बसवत होते, तेव्हा नायिका म्हणून भूमिका करण्यास मुली मिळणे कठीण होते. परंतु चंदा यांना ही अडचण कधीच आली नाही. कारण त्यांचे चोख व निखळ चारित्र्य! त्यांच्याविषयी सर्वांना गाढ विश्वास होता. चंदा दिवेकर, मीना प्रधान, मंगल फणसे, शालिनी राजे, सुनंदा कर्णिक, लता सावंत, उषा गुप्ते. अशा असंख्य हिरॉईन्स चंदा यांच्या नाटकातून घडल्या.

याशिवाय चंदा रणदिवे यांनी एस.टी. कार्यालयासाठी गणपती उत्सवासाठी, सी.के.पी. क्लबसाठी व इतर संस्थांसाठीही अनेक नाटके दिग्दर्शित केली. अरविंद देशपांडे, कमलाकर सारंग यांनी त्यांना भारतीय विद्याभवनात नेले. विजया मेहता आणि दामू केंकरे यांच्याशी त्यांची गाठभेट तेथेच झाली.नाटकाच्या संहितेचा, भूमिकांचा, नेपथ्याचा, प्रकाशयोजनेचा आणि अभिनयाचा विचार स्वतंत्रपणे व वेगळेपणाने कसा करायचा हे चंदा यांना या सर्वांच्या सान्निध्यात नव्याने जाणवले.

दिग्दर्शन व अभिनयाप्रमाणेच चंदा रणदिवे यांना नाट्यलेखनाचाही छंद होता. राजा गोसावी यांच्याशी त्यांचा उत्तम स्नेहबंध होता. त्यांच्याच आग्रहावरून चंदा यांनी तीन नाटकांचे लेखन केले. ‘लग्न होऊन ब्रह्मचारी’, ‘माकडाच्या हाती कोलीत’ व ‘दोघे एका खोलीत? बोंबला’. या नाटकांचे दिग्दर्शनही चंदा यांचेच होते व त्यात त्यांनी भूमिकाही केल्या होत्या. त्यांच्याबरोबर राजा गोसावी, चित्रपट कलावंत नीलम आणि वसंत शिंदे हे कलाकार होते. ‘माकडाच्या हातात कोलीत’ या नाटकाच्या नायिका होत्या नयना आपटे.

चंदा रणदिवे यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नाटके असो किंवा इतर काहीही कार्यक्रम असो, तो सुविहितच व्हायला हवा हा त्यांचा ध्यास असायचा. कार्यक्रम नेटका व्हावा म्हणून मेहनत किती? तर पडेल तेवढी! किंबहुना कांकणभर जास्तच. शंभरच्या जपासाठी आपण एकशेआठ मण्यांची माळ ओढतो ना, तशी! Aim at Excellence हा त्यांचा स्थायिभावच. अर्थात याची दुसरी बाजू म्हणजे Zero Tolerance. त्यामुळे गडबड, गोंधळ, गफलत यांना परवानगीच नाही. या दृष्टीनं चंदा रणदिवे म्हणजे नाट्यकर्मातील उग्र व कडक दैवतच होतं.

त्यांनी आपल्या कलाविष्काराला एकाच परिघात कधी कोंडून ठेवलं नाही. नाटकं बसवली, लोकनाट्य केली, दूरदर्शनसाठी असंख्य कार्यक्रम केले. दिग्दर्शन, अभिनय यांच्या बरोबरीने लेखनही केलं.

जवळपास सहा दशकं चंदा रणदिवे नाट्यकर्मात सातत्याने योगदान करीत राहिले. ठाण्याच्या रंगभूमीच्या चढत्या आलेखात त्यांचा वाटा सिंहाचा आहे. नाटक म्हटलं की त्यांच्या नसानसांत चैतन्य उसळू लागायचं. शाळेतल्या मुलांचा गट असो, एखादा गल्लीतला नाट्यसंघ असो, अर्धशिक्षित कामगारांचा गट असो किंवा एखाद्या कुग्रामातील हौशे-नवशे नट असोत, सर्वांना सारख्याच प्रेमाने (आणि हो, सारख्याच कडकपणानेही) मार्गदर्शन करायला ते सतत तत्पर असत.
१९९४ साली म्हणजे वयाच्या ६५-६६ व्या वर्षी रायगड जिह्यातील गोरेगांव येथील हौशी नाट्य कलाकारांसाठी आणि १९९५-९६ साली रायगड जिह्याच्या साक्षरता अभियानासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्या उत्साहाने ते तळे या गावाहून वरचेवर येत होते, तो उत्साह तरुणांनाही लाजवणारा होता. कुठल्याही अडीअडचणींचा, अडथळ्यांचा सामना करत, अविश्रांत कोसळणारा, कधीही न आटणाऱ्या उत्साहाचा मूर्तिमंत धबधबा म्हणजे चंदा रणदिवे. त्यामुळे कोणत्याही कलाकृतीसाठी चंदा यांचा स्पर्श म्हणजे परिसस्पर्श ठरत असे. तेव्हा अर्थातच नाट्यस्पर्धांतील पारितोषिके, विविध पुरस्कार व गौरव यांचा वर्षाव झाला नसता तरच नवल! नमुन्यादाखल सांगायचं तर-

1) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईतर्फे १९९९ चा उत्कृष्ट नाटककार पुरस्कार.

2) ८१ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात जीवनगौरव पुरस्कार – २००६.

3) ठाणे महानगरपालिका बुजुर्ग नाट्यकर्मी पुरस्कार, ठाणे भूषण पुरस्कार.

चंदा रणदिवे रंगकर्मी असले तरी त्यांचा गाभा हा शिक्षकाचा होता. कार्यक्रम बसवताना, शासकीय नाट्यशिबिरात मार्गदर्शन करताना, नाट्यस्पर्धेचे परिक्षक म्हणून स्पर्धकांशी गप्पा मारताना त्यांच्यातील शिक्षकच कायम कार्यरत असायचा. मौज म्हणजे एका अर्थानं ते जुन्या काळचे कर्मठ रंगकर्मी असूनही नवीन लोकांशी देखील त्यांची पत्रिका छान जुळायची!

अशा या ‘रंगकर्मी शिक्षक’ असलेल्या चंदा यांची शिष्यसंपदा किती असेल? मला वाटतं लाखातच मोजदाद करावी लागेल. म्हणूनच त्यांचं वर्णन ‘लक्षाधीश’ रंगकर्मी असं करणंच यथोचित ठरेल असं मला वाटतं!

— डॉ. मुरलीधर गोडे – 9869653711.

(साभार – ठाणे रंगयात्रा २०१६)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..