नवीन लेखन...

चांदणे तुझ्या स्मरणाचे

कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे सरांच्या सहवासातील काही संस्मरणीय क्षण

मा. कवी ग्रेस, ह्यांची नि माझी पहिली समक्ष भेट झाली, तो दिवस होता १२ ऑगस्ट २००३ ! पुण्यातील प्रभात रोडवरील स्वरूप हॉटेलमध्ये !

“दुपारी साडेतीन वाजता ग्रेस सरांना भेटा”, असा मला मुंबईहून मा. मंगेशकर ह्यांच्या घरून फोन आला ! त्या भेटीचे निमित्त म्हणजे, मा. पंडित हृदयनाथजी मंगेशकर ह्यांना कोल्हापूर येथे करवीरपीठाच्या शंकराचार्यांच्या शुभहस्ते “भावगंधर्व” ही पदवी बहाल करावयाचा समारंभ होणार होता. त्या सोहळ्यानिमित्त प्रकाशित होणा-या गौरवग्रंथाकरिता कवी ग्रेस सर लेख देणार होते !

आमच्या प्रथम समक्ष भेटीमध्येच मनमोकळ्या सुसंवादाचे रुपांतर, आपुलकीच्या स्नेहात झाले. अन् ते अगदी अखेरच्या क्षणापर्यंत तसेच अबाधित राहिले !
ते मला म्हणाले, “दरवर्षी आपण, दहा मे ह्या दिवशी माझ्या वाढदिवसाला, न चुकता शुभेच्छापत्र पाठविता, त्याचे मला अप्रूप वाटते. आज आपली या निमित्ताने समक्ष पहिली भेट होत आहे”!

“भयाण गारव्यातही, तुझ्या घरात ये सती | चंद्रीकाच मागते, शिवालयात सद्गती”, हे शीर्षक असलेला ग्रेस सरांचा अभ्यासपूर्ण लेख त्यांनी माझ्याकडे सुपूर्त केला ! “हृदयांतरी ” हे शीर्षक असलेल्या गौरवग्रंथामध्ये सदर लेख प्रसिद्ध झाला होता.

पुढे, पंडित हृदयनाथजी मंगेशकर ह्यांच्या विविध ठिकाणांच्या कार्यक्रमांच्यावेळी ग्रेस सरांची आणि माझी वरचेवर भेट होऊ लागली. ग्रेस सरांचा चाहता वर्गही आवर्जून अश्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचा !

“ती गेली तेव्हां पाउस निनादात होता, भय इथले संपत नाही” ही लोकप्रिय गाणी सादर झाल्याशिवाय कार्यक्रमाची पूर्तता व्हायची नाही आणि एके दिवशी, ग्रेस सरांना दुर्धर व्याधीने ग्रासल्याची अशुभ वार्ता कानावर आली. विश्वास बसत नव्हता, पण सत्य समोरच उभे ठाकले होते.

पंडित हृदयनाथजी आणि ग्रेस सरांचा लोभ सर्वश्रुत आहेच ! पुण्याच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात” ग्रेस सर दाखल झाले. त्या व्याधीग्रस्त अवस्थेमध्येही ग्रेस सर, त्यांच्या दूरदूरहून आलेल्या चाहत्यांना आवर्जून भेटायचे. विविध कार्यक्रमांमध्ये रमायचे, सहभागी व्हायचे. त्या सात महिन्याच्या काळात मी हे जवळून बघत होतो. त्यांना भेटण्यासाठी जवळ जवळ रोज, मी दवाखान्यात जात होतो. माझा त्यांच्याशी नित्याचा वार्तालाप होत असे.
भारतीय वायुसेनेच्या इतिहासातील पहिले काव्य मी लिहिले होते. ते ध्वनिमुद्रित गाणे, भारत देशाला अर्पण करण्याचा सोहळा पुण्याच्या लोहोगाव विमान तळावरील वायुसेनेच्या कार्यालयात संपन्न झाला होता. एअर चिफ मार्शल प्रदीप व्ही. नाईक सरांनी त्याचा गौरव केला, त्याची बातमी दुसरे दिवशी सर्व वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती ! मी रोजच्या सारखा संध्याकाळी दवाखान्यात गेलो, तर, उमद्या मनाच्या ग्रेससरांनी, माझ्याशी हस्तांदोलन करून, माझं मोठ्या जिव्हाळ्याने अभिनंदन केलं होतं !

अश्याच एका संध्याकाळी, पुण्यामध्ये मुसळधार पाउस, सुरु झाला. तो दिवस होता, १५ ऑक्टोबर २०११ ! ग्रेस सर मला म्हणाले, “चिंचोरे सर, माझे काम करणार कां ?” मी म्हणालो, “सर असे काय विचारता, सांगाना, काय हवय”? ग्रेस सर म्हणाले, “बाहेर विजांचा गडगडाट सुरु आहे, धुव्वाधार पडणारा तो पाउस मला पहायचा आहे. लिफ्ट जवळील कॉरीडॉरमध्ये मला घेऊन चलता कां ?” मी तेथील रुग्ण्सेविकांची अनुमती घेतली. झालं, ग्रेस सरांनी आधी माझा हात धरला, आणि नंतर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, ते व्ह-यांड्यामध्ये हळू हळू चालत आले.

कोसळणारा पाउस पाहून, ग्रेस सर भान हरखून गेले. पावसावर बोलले. बराच वेळ गेला, अन् मग म्हणाले, “चला आता रुममध्ये परत जाऊ”, ग्रेस सरांच्या स्नेहाने मी तर चिंब भिजलो होतो . ग्रेस सरांबरोबरचे असे अनेक सुखद क्षण मला अनुभवायाला मिळाले.

एके दिवशी संध्याकाळी मी त्यांना भेटायला जाताच, ग्रेस सर म्हणाले, “अहो, पंडितजींच्यावर मी लिहिलेला तो लेख मला द्याल कां, उद्या दुपारी एक प्रकाशक येणार आहेत. त्यांना तो लेख द्यायचा आहे.” मी म्हणालो, “सर आत्ता अर्ध्यातासात घरी जाऊन तो लेख घेऊन येतो”, तसे सर म्हणाले, “अहो, आत्ता पुन्हा हेलपाटा नका घेऊ, उद्या आणा”.

दुस-या दिवशी, मी दवाखान्यात जाताच, सरांच्या हाती, त्या लेखाची झेरॉक्स प्रत दिली. त्यांना केवढा आनंद झाला. समोरच बसलेल्या प्रकाशकांना त्यांनी तो लेख सुपूर्द केला अन् माझ्याविषयी, त्यांना काही सांगितलं !

असाच एक प्रसंग, रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०११ चा ! निमित्त होतं, पंडित हृदयनाथजींच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या एका घरगुती कार्यक्रमाला, मी मुंबई येथे गेलो होतो. दुस-या दिवशी मी जेव्हां दवाखान्यात गेलो, तेव्हां, ग्रेस सर अधिरतेने मला म्हणाले, “मला आधी कालच्या कार्यक्रमाचे साध्यंत वर्णन सांगा.” ते सर्व ऐकतांना, त्यांच्या चेह-यावर, आनंदाचे भाव तरळले होते !

मास्टर दीनानाथांच्या जयंतीनिमित्त, मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या “दीनायन कलापर्व”ने संगीतकार मा. मीनाताई मंगेशकर-खडीकर, ह्यांचा ७ जानेवारी २०१२ रोजी “दशांगुळे उरला” हा कार्यक्रम आयोजित केला होता ! दुपारपासूनच ग्रेस सरांनी मला सांगून ठेवलं होतं, “मला तुम्ही प्रेक्षागृहात घेऊन चला ! मला हा कार्यक्रम समोरून अनुभवायचा आहे.” वास्तविक, सरांच्या रुममध्ये असलेल्या टी.व्ही.वरून त्यांना कार्यक्रम बघता आला असता. पण त्यांनी हट्टच धरला. अखेरीस, माझ्या खांद्यावर हात ठेवून ग्रेस सर प्रेक्षागृहामध्ये आले. आम्ही अगदी पुढच्या रांगेमध्ये शेजारी-शेजारी बसलो होतो. मीनाताई ह्यांच्या वक्तव्याला दाद देत त्यांनी कार्यक्रम पाहिला.

“ओल्या वेळूची बासरी” ह्या ग्रेस सरांच्या ललितबंध संग्रहाचे प्रकाशन, मंगळवार, दिनांक १० जानेवारी २०१२ रोजी झाले. हा प्रकाशन सोहळा, “दीनायन कलामंच” आणि पॉपुलर प्रकाशन ने, आयोजित केला होता. ग्रेस सरांच्याच पुस्तकाचे प्रकाशन होत असतांना, सरांनी मंचावर बसण्यास नकार दिला . “प्रेक्षकांमध्येच बसून मी तो कार्यक्रम बघणार”, असं त्यांनी आवर्जून सांगितलं. पंडित हृदयनाथ ह्यांच्या हस्ते प्रकाशन झालं . डॉक्टर धनंजय केळकर, ह्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले . पॉप्यूलरचे प्रकाशक रामदास भटकळ, ह्यांची चित्र फीत दाखविण्यात आली. ग्रेस सरांना नामांकित असे कितीतरी विविध पुरस्कार लाभले, पण सर होते, तसेच राहिले. निगर्वी, निर्मळ !

रविवार दिनांक २५ मार्च २०१२ रोजी संध्याकाळी, ग्रेस सरांना भेटायला, मी दवाखान्यात गेलो तेव्हां माझा जीव उडून गेला, सा-या रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. सोमवारी २६ मार्चला ग्रेस सरांना देवाज्ञा झाली. आजही त्या प्रदीर्घ आठवणीचा पट डोळ्यासमोर फेर धरू लागतो अन् मन सुन्न होतं .
आज दहा मे, ग्रेस सरांची जयंती ! त्यांच्याच लेखणीतून प्रकटलेले वास्तव मनाला सांगत आहे, “भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते” !

— उपेंद्र चिंचोरे

ऊपेंद्र चिंचोरे
About ऊपेंद्र चिंचोरे 14 Articles
श्री उपेंद्र चिंचोरे हे विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा आहे. त्यांचे सध्या वास्तव्य पुणे येथे आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..