नवीन लेखन...

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग- १

प्रकरण १ 

अंगणात बसलेला चंदर काड्या जमवून त्याची बैल-गाडी करीत होता . त्याचे वडील- बापू वाड्याकडे निघाले आहेत हे पाहून आपला खेळ थांबवीत तो म्हणाला..
” बापू, मी येतो की तुज्या संग वाड्यात , एकट्याला निस्त बसून लई कंटाळा येतो बघ…!
चंदरच्या रडवेल्या चेहेऱ्याकडे पाहून बापू म्हणाला-
बर बापा, चल , पण तिथे चुपचाप बसून रहायचं .
रस्त्याने जातांना शाळेकडे जाणाऱ्या पोरांना पाहून चंदर म्हणाला -,
बापू , मी मोठा झालो , आता मला शाळात पाठिव की , मी घरी थांबणार नाही ,सांगून ठेवतो तुला !
चंदरची समजूत घालीत बापू म्हणाला ,
आर चंदर , तू तर लहान हायीस रं, आपल्या गावात शाळा तरी आहे का ? ही पोरं पायी-पायी चालत चालत दुसऱ्या गावातल्या शाळेत जातात , हे ठावं नाही का तुला ?

मग, काय झालं ? मी बी जातो की त्यांच्या संग, चंदरचा उत्साह कमी होत नव्हता .
बारक्या चंदरकडे पाहून बापू मनाशी म्हणत होता,-
शिकन्याचं एवढं वेड या पोराच्या मनात कसं काय आहे ? कळतच नाही !
शाळेत जातो असंच म्हणत रहाताय !
आपल्या घरात तर समदा अडाण्याचा बाजार, त्यात ह्यो ज्ञानेश्वर आला म्हणायचं की काय ? शेतावर राबणाऱ्या आपल्या सारख्या गडी -माणसाने पोराला शिकवायचं कुठून ?
त्यासाठी लागणारा पै-पैसा कसा येणार आपल्या जवळ ?
आपले मालक जे धान्यधुन्य देतात त्यावर आपलं घर चालतंय, तवा या चंदर ला शिकवायचं ? कसं जमायचं हे ?

देवा , माज्या पोराच्या मनात शिकायचं आहे, तवा तूच एक हायस आमच्या सारख्या गरिबांचा वाली.
विचारांच्या नादात बापू वाड्यासमोर आला . आतमध्ये जाऊन बैठकीत बसणं बरं दिसलं नसतं . बिनकामाचं कुणी येऊन बसलेलं मालकांना आवडतं नसायचं .
बापूने चंदरच्या हाताला धरून आत नेले, बैठकीत भरपूर माणसे बसलेली दिसत होती . एका कोपऱ्यात चंदर आणि बापू उभे राहिले .

वाड्यावरची बैठक म्हणजे सगळ्या गावासाठीची निवाड्याची जागा. एक वेळ चावडीवरच्या बैठकीत काही समेट होणार नाही ,पण मालकांच्या बैठकीत मात्र सगळा तिढा चटकन सुटायचा.
आजही काही विशेष होतं म्हणून बैठक भरून गेलेली दिसत होती.
बसलेल्यांना उद्देशून रावसाहेब म्हणू लागले –
“मंडळी , एका चांगल्या गोष्टीबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून तुम्हाला इथं बोलावून घेतलय. “आपल्या गावात शाळा नाही “, ही बाब माझ्या मनाला डाचत आहे.
आपल्या गावच्या पोरांना दुसऱ्या गावाला पायी चालत जावे लागते, पोरांना किती त्रास होतो आहे, हे सर्वांना माहितच आहे.

हे सर्व लक्षात घेऊन पुढील वर्षापासून आपल्या गावात शाळा सुरु व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे . त्यासाठी लागणारी सर्व ती मदत गावकऱ्यांनी करावी अशी माझी विनंती आहे.

बैठीकीत असलेल्या चार शहाण्या-सुरत्या माणसांनी रावसाहेबांची ही कल्पना लगेच उचलून धरली. गावकऱ्यांच्या मनात आल्यावर गावाचे काम कसे आडून राहणार ?

शाळेसाठी लागेल ती मदत करण्याचे सर्वांनी मोठ्या आनंदाने कबुल केले . सारा गावं आता आपल्या पाठीशी असणार हे कळून आल्यामुळे रावसाहेबांना फार समाधान वाटत होते.

जमलेली मंडळी निघून गेल्यावर ,
समोर उभ्या असलेल्या बापूला ते म्हणाले , बापू “उद्या गावातील प्रत्येक घरात जायचं ,आणि शाळेबद्दल सांगायचं, आपापल्या पोरांना शाळेत पाठवलं पाहिजे हे देखील सांगायचे “,
रावसाहेबांचा निरोप घेऊन बापू आणि चंदर घराकडे निघाले .. चंदरच्या चेहेऱ्यावर आनंद नाचत होता .. तो म्हणाला -,
बापू , आता आपल्या गावातच शाळा सुरु होणार की , तुला विचारायची बी गरज न्हाई , मी माझा आपला शाळेत जाईन “..!

चंदरच्या पाठीवर हात ठेवीत बापू म्हणाला ,-
चंदर -तू लई खुशीत हायस , पर, आपल्या गावातील मंडळींचं तुला तुला ठावं न्हाई , आरं, आपल्या गावात शाळा येईल हे खरं , पर
त्यात बसाया पोरं तर आली पायजेत की न्हाई ?
का बरं ? कशापायी येणार न्हाईत पोरं ?
चंदरने घाबराघुबरा होऊन बापूला विचारले .
हे बघ – चंदर – आरं, शेतात कामं कराया पोरं हाताशी लागतात की , अन गायी, म्हशी , शेळ्या -मेंढरे चरायला कुणी रं जायचं माळावर ?
पोरं जर शाळत जाऊन बसली तर कामं कोण करणार ? आई-बापाचा समदा खोळम्बाच हुईल की !.
बापूचा खुलासा ऐकल्यावर चंदर म्हणाला , बापू ,तू तर आताच समद्या गोष्टींचा नन्नाचा पाढा लावला की रं. ते काही न्हाई ,
आता मालकांनी सांगितल्या प्रमानं आपण साऱ्यांच्या घरी जाऊन सांगू, मग ठरीव की सगळं .
बरं बापा, होऊ दे तुज्या मनासारखं ,
चंदरची समजूत घालीत बापू आपल्या घरात शिरला .

भल्या पहाटेच चंदरची झोप झाली होती .काल रात्रभर त्याच्या सपनात शाळाच येत होती , तवा सोप कशी लागणार ?
चंदर, आईला म्हणाला –
आये , न्याहारी दे अदुगर,
आज लई काम हाय माज्या मागं ,
चंदरच्या गडबडीकडे कौतुकाने पहात आई त्याला म्हणाली ..
आग बाई – अस कोनचं काम लागलंय रे बाबा तुज्यामाग ? सांग तरी मला ,
दुध-भाकरीचा कुस्करा खातखात चंदर आईला सांगू लागला –
आये , काल रावसाहेबांनी मला आणि आपल्या बापूला एक मोठ्ठं काम सांगितलय , गावातल्या समद्यांच्या घरी जाऊन मालकांचा निरोप द्यायचा की , आपल्या गावातच आता शाळा सुरु होणार आहे , तरी आपापल्या पोरांना शाळेत पाठवा ! ,
न्याहरी आटोपून लगेच बापू आणि चंदर रावसाहेबांनी सांगितलेल्या कामगिरीवर निघाले . सकाळच्या वेळी घरातून प्रत्येकजण दिवसभराच्या कामाला लागण्याच्या तयारीत होते. कुणाला शेताकडे जाण्याची घाई होती तर कुणाला काही तरी कामासाठी म्हणून मोठ्या शहरात जायचं होत .
प्रत्येक घरात जाऊन बापू त्यांना रावसाहेब मालकांचा निरोप सांगत होता . शाळेची बातमी एकूण सर्वांना आनंद होत होता. पण आपल्या पोराला शाळेत पाठवतो ” हे मात्र कुणीच कबुल करीत नव्हते .
“अदुगर शाळा सुरु तर होऊ द्या, मग ठरवू की , आमच्या पोराला शाळात पाठवायचं की नाही . हा असा एकच निरोप सगळ्या घरातून मिळत होता .
सकाळी मोठ्या आनंदाने घराबाहेर पडलेल्या चंदरचा चेहेरा हे सगळ एकूण आता पार उतरून गेला होता . त्याच्या बापूचा अंदाजच शेवटी खरा ठरला होता .
“गावातल्या मंडळीच काही खरं नाही चंदर , शाळेच नुस्त बोलतील, पण करणार काहीच नाही.”!

गावात येणारी शाळा यामुळे जर आलीच नाही तर ?
आपल्याला मग शाळेत जायला मिळणार नाही.” ,
या कल्पनेने चंदरच्या डोळ्यात पाणी जमा झालयं “, हे बापूला दिसत होतं .

सगळ्या गावात सांगून झाल्यावर , बापू आणि चंदर रावसाहेबांच्या वाड्यावर आले. आत आल्यावर , त्यांनी विचारले –
काय बापू , विचारलेस का रे सगळ्यांना ? सगळीजण खुश झाली असतील नाही ?
काय उत्तर द्यावे ?
हाच प्रश्न बापूला पडला होता , खाली मान घालून तो चुपचाप उभा राहिला . मग , त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या चंदरला त्यांनी विचारले ,
चंदर , तू होतास ना रे बापू बरोबर , तूच सांग , काय म्हणाले गावातले लोक ?
मालक – तुमचा निरोप आम्ही समद्यांना सांगितला . शाळा सुरु होणार म्हणून सारे खुश हायेत ,
पोरांना शाळेत पाठवायचं , ते नंतर ठरवू , असे म्हणले सारेजण .
हे सारे ऐकून रावसाहेब गंभीर झाले .

“आपल्या प्रयत्नांना सहजासहजी यश मिळणार नाहीये , याची त्यांना कल्पना आली.
मग ते म्हणाले –
चंदर , तू तरी येणार आहेस की नाही आपल्या शाळेत ?
बघ , तुझ्या एकट्यासाठी आपण आपल्या गावात शाळा सुरु करू या .
रावसाहेबांचे हे शब्द ऐकून चंदरने आनंदाने जागेवरच उडी मारली . ”
आपल्या एकट्यासाठी शाळा ? मग तर मजाच मज्जा , मोठ्या खुशीत तो म्हणाला ,
व्हय -व्हय .. मी तर कवा पासून बापूला म्हणतोय की , मला शाळात पाठव, पर ह्यो बापूच न्हाई म्हणतो , मनातलं मोकळेपणाने सांगून टाकल्यावर चंदरला बरे वाटले .

रावसाहेब म्हणाले – बापू , आता तू मात्र हयगय करायची नाहीस. चंदरला शाळेत पाठवायचं.
हे ऐकतांना आपल्या बापुची मान नंदी — बैलासारखी बुगूबूगु डोलत आहे हे पाहून चंदरला खुसूखुसू हसू येत होतं.

मालक म्हणाले- बापू , माझा निरोप आल्यावर वाड्यावर यायचं आणि शाळेच्या तयारीला लागायचं , समजलं ?
” हो मालक येतो की- “,असे म्हणत , बापू आणि चंदर घराकडे निघाले .

आता चंदर मोठ्या खुशीत होता , त्याच्या डोळ्यासमोर त्याची शाळा दिसत होती , शिकवणारे गुरुजी त्याला दिसत होते.

चंदर मनाशी प्रार्थना करू लागला..

देवा, माज्या गावात शाळा लवकर येऊ दे …!

(क्रमश:)..

— अरुण वि.देशपांडे

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..