भाग-३ रा
पंचायतीचं ऑफिस दिसू लागलं तेंव्हा चंदर म्हणाला ,
गुरुजी , आपली शाळा आली ” !,
मग चंदर त्यांना पंचायती जवळ घेऊन गेला .
बापू त्यांच्या अगोदरच तिथे पोंचलेला होता , त्याच्या सोबत वाड्यावरचे तीन-चार गडी –माणसे आलेली होती.
तीन खोल्या असलेली ही जागा आता या पुढे मात्र “गुरुजीची शाळा “, आणि गुरुजींचे घर “, म्हणून ओळखली जाणार होती. इतके दिवस या खोल्यांमध्ये शेतीचा माल -टाल साठवून ठेवलेला असायचा. बी-बियानांची रिकामी पोती, खताच्या पिशव्या , फवारणीच्या औषधांचे रिकामे डबे आणि, असाच कामाचा आणि बिनकामाचा खूप पसारा पडून होता . गडी-माणसांच्या मदतीने बापूने हा सगळा बारदाना आणि पसारा आवरून ठेवण्याचे काम सुरु केले ,नंतर बाहेर उभ्या असलेल्या बैलगाडीत हे सगळे सामान आणून टाकतांना त्यातील थोडेसे
रिकामे झालेले पोते , आणि पिशव्या असे सामान पुढे काही ना उपयोगात येतील या हिशेबाने ते बाजूला ठेवीत गुरुजी म्हणाले,
बापू – आता पाण्यासाठी एक घागर , आणि एक बकेट आणून द्या ,थोडी भांडी ही लागतील, तसेच जवळच्या किराणा दुकानदाराला सांगून ठेवा , मला जे काही सामान लागेल ते देत जा,
मी पैसे देत जाईन. एव्हढ करा आता म्हंज आजच्या पुरते सगळं जमल म्हणायचं .
या वर बापू म्हणाला –
“गुरुजी , अवो – आता तर तुमचा संसार सुरु व्हणार, नव्या शाळेचा प्रपंच बी मांडायचं तुम्हाला. तवा कसं व्हणार वो तुमचं ? मला तर घोर लागलाय .
हे ऐकून गुरुजी म्हणाले-
“बापू, आता जसं होईल तसं, एकदा उखळात डोकं तर घातलाय आपणं , तेंव्हा जे होईल ते पाहू ..!
गुरुजी हसत हसत म्हणाले खरे ..
पण मनात मात्र त्यांना खूप काळजी वाटत होती …
या गावात आपलं ठाक ठीक चालेल की नाही ?
या विचारातच गुरुजी आणि बापूने सोबतच्या गडी -माणसांच्या मदतीने घर नीटआणि व्यवस्थित लावत ,सगळीकडे एकवार पाहून घेतले .
त्यांनी चंदरला विचारले – काय रे , कसं वाटतंय गुरुजींच घर ?
काय उत्तर द्यावे ? चंदरला काही सुचले नाही .. कारण ,
घर इतक छान ,स्वच्छ ठेवता येतं असतं ,” ही गोष्टच आज पहिल्यांदा गुरुजीमुळे त्याला कळाली होती .
घराचे तर झाले, मग त्याने मनातला प्रश्न विचारून टाकला –
गुरुजी – आपली शाळा कुठे आहे ?,
त्याचा प्रश्न ऐकून घेत गुरुजी म्हणाले..
अरे बाबा -, आता तर कुठे माझं घर व्यवस्थित लागलाय , थोड्या वेळाने जेवण-खान करून ,आराम करून दुपारी वाड्यावर जाऊ , रावसाहेबांशी बोलतो मी ,
मग ठरवू की आपल्या शाळेबद्दल .
गुरुजींच्या खुलाशावर चंदरने मान डोलावली. “गुरुजी शाळे बद्दलच काई विसरले नाहीत , लक्षात आहे त्यांच्या , याचे समाधान त्याला जास्त वाटत होते ..
स्वतहाचे जेवण तयार करण्याच्या गडबडीत गुरुजी दिसले तेंव्हा चंदर म्हणाला –
अवो गुरुजी – तुमी कशापायी करता हे सगळं !, आमच्या घरून आणतो की मी ,
आत्ता जाऊन घेऊन येतो मी , तुमी आता काय बी करू नका .
त्याला थांबवीत गुरुजी म्हणाले , नको , काही आणायचं नाही..
हे बघ चंदर , एक दिवसाचा प्रश्न आहे का हा ?,
आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही “, हे लक्षात ठेवून , आपण वागायचे असते !.
आणि, मला सगळा स्वयंपाक करता येतो , माझ कोणताही काम अजिबात अडणार नाही , तेंव्हा तू माझ्या खाण्यापिण्याची काळजी अजिबात करायची नाही.!
थोड्यावेळाने ते चंदरला सोबत घेऊन जेवण करण्यास बसले , जेवतांना गुरुजीनी विचारले –
चंदर – ,समजा आपली शाळा सुरु झाली तर , गावातून किती मुलं येतील रे ?” ,
चंदर सांगू लागला – गुरुजी , आमच्या गावातील पोरांना कशाची आलीया शाळा ?
मोठ्या घरची पोरं जातात दुसऱ्या गावच्या शाळेत, आत्ता बस गाडी सुरु झालीय ,
त्या अदूगर पायी चालत जायची ही पोरं शाळेला ..
गुरुजी – आमच्या पोरांच्या हातात काही नाही , फक्त कामं मात्र हायेत,
गायी -म्हशीला नदीवर धुवायला न्याच, शेळ्या -बकऱ्या घेऊन डोंगरावर , माळावर जायचं ,हेच आमचं काम हाय नेमीचं,
शाळेचं नाव सुद्धा कधी घरात निगत नाही..
गुरुजी , “आपल्या गावात जर शाळा असती तर मी बी पाचवीत बसलो असतो ..!
चंदर च्या मनातील शाळेबद्दलची ओढ पाहून आशेचा एक तरी किरण दिसल्याचे समाधान गुरुजींना मिळत होते . “एकाच्या ओढीनी दुसरा नक्कीच शाळेकडे येईल ही कल्पना त्यांच्या मनाला अधिक उत्साह देत होती.
“पुढील जून महिन्यात शाळा सुरु करण्यापूर्वी गावातील लोकांची मने वळवणे अधिक आवशयक आहे गुरुजी ” !,
रावसाहेबांचे शब्द चंदरच्या बोलण्यावरून गुरुजींना पटत होते.
अज्ञानचा फार मोठा अंधार या गावावर आणि लोकांच्या मनावर पसरलेला आहे हेच खरे ! “,
आपण समजलो तितके हे काम मुळीच सोपे नाही. या गावासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार, चिकाटीने प्रयत्न करावे लागणार “, याची जाणीव गुरुजींना होऊ लागली.
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , आगरकर , साने गुरुजी या थोर पुरुषांनी आयुष्यभर शिक्षणाचे महत्व लोकांना सांगितले. आपले आयुष्य लोकांचे कल्याण व्हावे म्हणून खर्च केले.
अशा या महान पुरुषांचे कार्य “, ही आपली प्रेरणा आहे.
या गावातील ही नवी पहाट जणू गुरुजींना धीर देत म्हणत होती ..
” प्रयत्न कर , धीर सोडायचा नसतो ,
केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे !, समर्थांचे वचन’, गुरुजींना आठवत होते.
गुरुजींची मनोदेवता त्यांना म्हणत होती –
“हे माणसा ,तू नव्या कामाला सुरुवात करणार आहेस , इथली माणसं झोपेचं सोंग घेऊन पडलेली आहेत , त्यामुळे खरोखर झोपी गेलेल्यांना जागं करून उठवणे सोपं असते “,
पण, झोपेचं ढोंग करणाऱ्याला जागं करणं अवघड असतं “.
शिक्षणाचं -ज्ञानदानाच कार्य हे पुण्य-कर्म असतं . चांगलं कार्य करणं हे एखाद्या कठोर व्रतासारख असतं , ज्याच फल ही तेवढच रसाळ असतं .
या विचारांनी गुरुजींच्या तरुण मनाला उमेद आली. यापुढे कुठल्याही प्रसंगाने आपल्या निश्चयापासून ढळणे नाही”, हे त्यांनी ठरवले .
शेजारी बसलेल्या चंदर कडे पाहून त्यांना वाटले – या पोरामध्ये काही तरी वेगळे असे नक्कीच आहे . या मातीच्या गोळ्याला नेमका आकार आपण दिला तर एक चांगली आकृती आपल्या हातून घडू शकेल.
या एकलव्यासाठी आपण द्रोणाचार्य व्हायचे”,
चंदरला घरी जाण्याचे सांगून गुरुजी रावसाहेबांकडे संध्याकाळी जाण्याचे ठरवून , आराम करीत पडले खरे ,
पण मनात हाच विचार सारखा चालू होता की –
शाळेचे कसे होईल ? ….
क्रमश:
— अरुण वि.देशपांडे -पुणे
९८५०१७७३४२
Leave a Reply